Headlines

Mumbai Local : CSMT फास्ट लोकलच्या लेडीज फर्स्ट क्लासमध्ये डाऊन मारण्यावरुन वाद, महिलेने सहप्रवाशांवर पेपर स्प्रे फवारल्याने गोंधळ


Kalyan CSMT Local Woman Pepper Spray : कल्याणहून सकाळी ८.३३ वाजता निघालेल्या सीएसएमटी फास्ट लोकलमध्ये महिलांच्या फर्स्ट क्लास डब्यात वाद झाला. यावेळी एका महिलेने सहप्रवशांवर पेपर स्प्रे फवारल्याची घटना घडली.

Mumbai Local CST Fast First Class Paper Spray Maharashtra Times
फोटो : AI(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक कारणांमुळे दोन प्रवाशांना जीव गमवावा लागल्याच्या घटनांनंतरही प्रवाशांमधील क्रोधाग्नी शांत झालेला नाही. लोकलमध्ये प्रवाशांचा संताप अनावर होऊन हाणामारीच्या घटनांची मालिका कायम आहे. हाणामारी, सहप्रवाशावर पेपर स्प्रे फवारणी, हातात काठी घेऊन प्रवाशांमध्ये दहशत पसरवणे, अशा तीन घटना गुरुवारी उघडकीस आल्या. तर, हाणामारीच्या चौथ्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, तो नेमका कुठला, याचा शोध सुरू आहे.

महिला डब्यात पेपर स्प्रे

कल्याणहून सकाळी ८.३३ वाजता निघालेल्या सीएसएमटी लोकलमध्ये महिलांच्या फर्स्ट क्लास डब्यात पेपर स्प्रे फवारणीची घटना घडली. डोंबिवलीहून आधी कल्याण आणि त्याच लोकलने सीएसएमटी गाठणे, असा प्रवास हेच या वादाचे कारण ठरले. कल्याणहून ८.३३ च्या सीएसएमटी लोकलमध्ये डोंबिवलीतून काही महिला प्रवाशांनी महिला डब्यात प्रवेश केला. या जलद लोकलमध्ये प्रवेश करण्यासाठी कल्याणमध्ये महिला रांग लावतात. साडेआठ वाजताच्या सुमारास लोकल फलाटावर दाखल झाल्यावर रांगेतील महिलांनी डब्यात प्रवेश केला आणि डोंबिवलीपासून बसून असलेल्या चार महिलांना उठण्यास सांगितले. यामुळे डोंबिवली आणि कल्याणच्या समुहांमध्ये वाद सुरु झाला.

डोंबिवली समूहातील एका महिलेने पिशवीतील पेपर स्प्रे अन्य महिला प्रवाशांच्या चेहऱ्यावर फवारल्याने डब्यात गोंधळ उडाला. काही प्रवाशांनी १५१२ रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाइनवर संपर्क केला. ठाणे स्थानकात पोलिस येण्यापूर्वीच लोकल निघून गेली. दोन्ही समूह सीएसएमटी येथे उतरताच रेल्वे सुरक्षा दलासह रेल्वे पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. परस्पर तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच महिला प्रवाशांनी परस्पर सामंजस्याने वाद सोडवला. एकमेकींना सॉरी म्हणत वादावर पडदा टाकला, याची नोंद सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाण्यात आहे.
Maharashtra TimesCrime News : मुलाच्या व्यसनापायी 150 कोटींच्या मालकाचा जीव गेला, जेवणानंतर धक्कादायक प्रकार; आठ वर्ष कुटुंबाने लपवलेलं सिक्रेटही समोर

मालडब्यात झोपण्यावरुन हल्ला

दरम्यान, लोकलमध्ये जीवितहानीच्या घटनांनंतरही प्रवाशांमध्ये अद्याप रेल्वे सुरक्षा यंत्रणांचा धाक दिसत नाही. उलट, लोकलमधील प्रवास आता अधिक असुरक्षित होत असल्याची भावना सर्वसामान्य प्रवाशांमध्ये बळावत आहे. परळ ते अंबरनाथदरम्यान धावणाऱ्या लोकलच्या मालडब्यातून प्रवास करणाऱ्या एका तरुणाला डोंबिवली-ठाकुर्लीदरम्यान एका तरुणाने बेदम मारहाण केली. प्रितेश कनोजिया असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो घाटकोपरमध्ये चढला होता. डोंबिवलीला लोकल रिकामी झाल्याने मालडब्याच्या आसनावर प्रितेश झोपला होता.

डोंबिवलीत राजू वाघे आणि साहिल खंदारे यांनी मालडब्यात प्रवेश करून प्रितेशला उठून बसण्यास सांगितले आणि त्यावरून तिघांमध्ये वाद सुरू झाला. रागाच्या भरात राजू वाघेने हातातील कडे काढून प्रितेशच्या डोक्यात घातले. दरम्यान, लोकल ठाकुर्ली स्थानकात आल्यावर काही अनोळखी मुलांनीही मालडब्यात प्रवेश करून राजूला लाथाबुक्यांनी मारहाण सुरू केली. कल्याण रेल्वे स्थानकातील पोलिस शिपाई मंगेश भोर यांनी जखमी प्रितेश आणि राजूला रुग्णालयात दाखल केले.

Vijay Wadettiwar | नागपुरातून विजय वडेट्टीवार यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

कुर्ला स्टेशनवर फांदी नाचवणारा तरुण ताब्यात

तिसऱ्या घटनेत कुर्ला रेल्वे स्थानकात हातात फांदी घेऊन फलाटांवरील प्रवाशांमध्ये दहशत माजवणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. कुर्ला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर बुधवारी रात्री ९.२० मिनिटांनी आरोपी साजिद अब्दुल करीम चौधरी झाडाची फांदी घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करून धावत असल्याचे दिसून आले. फलाटावरील पोलिसांनी शिट्टी वाजवून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत तो धावतच सुटला. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. साजिद हा कल्याणच्या बैल बाजार येथे राहणारा आहे.
Maharashtra TimesCrime News : पार्टीत मित्रांमुळे प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत, डॉक्टर म्हणाले ‘बाप’ बनणं कठीण, 27 वर्षीय तरुणाचा चटका लावणारा अंत

‘मशीन निकाल, मशीन निकाल’

मुंबई लोकलच्या डब्यात तीन ते चार तरुणांमध्ये हाणामारी सुरू असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. हाणामारीदरम्यान शिवीगाळ करत एक तरुण ‘मशीन निकाल, मशीन निकाल,’ असे सहप्रवाशाला सांगत असल्याचे दिसत आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे दोन्हींकडे या व्हिडीओबाबत विचारले असता सदरचा व्हिडीओ आमच्या लोकलमधील नाही, असा दावा त्यांनी आहे. यामुळे लोकलमधील प्रवाशांची सुरक्षा कोणाची जबादारी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.