Gold Silver Rate Drop: यंदाचा आठवडा सोने आणि चांदीच्या खरेदीदारांसाठी दिलासादायक ठरला आहे. 13 जुलै ते 17 जुलै 2026 या दरम्यान, सोन्याची किंमत तब्बल 3,000 रुपये प्रति 10 ग्रॅमनी कमी झाली आहे तर, चांदीचा दरही जवळपास 7,000 ते 7,300 रुपये किलोनी घसरली आहे. पण आता पुढील आठवडा सोन्या-चांदीसाठी निर्णायक असेल, कारण पुढील आठवड्यात फेडरल रिझर्व्ह व्याज दरांबद्दल आपली भूमिका स्पष्ट करेल.

सोन्या-चांदीची किंमत वाढणार की घसरण सुरू राहणार?
सोने आणि चांदीच्या बाजारातील हालचालींबद्दल सध्या संभ्रमाचे वातावरण असून आता चालू आठवड्यातील स्वस्ताईनंतर पुढील आठवड्यातही दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत लक्षणीय चढ-उतार होऊ शकतात. पण सध्या सोने आणि चांदीचा कल किंचित घसरणीकडे झुकल्याचं दिसत आहे.
सोन्याबद्दल महत्त्वाचे फॅक्टर्स
क्रूडची किंमत सतत वाढत राहिली, डॉलर मजबूत होत गेला आणि अमेरिकेत व्याजदर वाढीची शक्यता आणखी बळावली तर सोन्याची किंमत आणखी घसरणीचा अंदाज आहे. याउलट अमेरिका-इराण तणाव कमी झाला, तेलाची किंमत स्वस्त झाली आणि अमेरिकन बाँड यील्ड कमी झाल्यास सोन्या-चांदीचे दर पुन्हा तेजीची उभारी घेऊ शकतात. 17 जुलैच्या किमती शुक्रवारच्या दुपारच्या ट्रेडिंग सत्रातील असून आंतरराष्ट्रीय बाजाराचा अंतिम साप्ताहिक बंद भारतीय वेळेनुसार रात्री उशिरा होईल.
सोने-चांदीचे सध्याचे दर किती?
शुक्रवारी सकाळी MCX वर ऑगस्ट सोन्याचा भाव 277 रुपयांनी वधारले आणि 1,40,725 रुपयांवर व्यापार करत आहेत तर, सप्टेंबर चांदीचे फ्युचर्स 573 रुपयांनी घसरून 2,15,440 रुपयांवर व्यवहार करत होते. मात्र, याउलट आठव्याभरात सोन्याचा भाव सुमारे 3000 रुपये आणि चांदीचा भाव सुमारे 7000 ते 7300 रुपयांनी स्वस्त झाला आहे. लक्षात घ्या की वेगवेगळ्या वेळी होणाऱ्या भावातील बदलांमुळे दिवसाखेरीस या आकडेवारीत किंचित फरक असू शकतो.
सोन्या-चांदीकडे गुंतवणूकदारांची पाठ
युद्धाचा धोका वाढल्यास गुंतवणूकदार सहसा सोने खरेदीकडे धावतात पण, यावेळी परिस्थिती उलट आहे. क्रूडच्या दरवाढीमुळे जागतिक चलनवाढ वाढण्याची बाजारात भीती पसरली. चलनवाढ झाल्यास अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदर ‘स्थिर’ ठेवू शकते किंवा आणखी वाढवू शकते. अशा परिस्थितीत, सोन्यावर व्याजर मिळत नसल्यामुळे उच्च व्याजदराच्या वातावरणात चमक फिकी पडते.
युद्धात सोनं महागते मग, यंदा उलटफेर का?
युद्ध, आर्थिक संकट किंवा शेअर बाजारातील मोठ्या घसरणीत सामान्यतः पैसा वाचवण्यासाठी लोक सोनं खरेदी करतात, पण यंदा बाजारातील भावना पूर्णपणे बदलली. पश्चिम आशियातील युद्धामुळे होर्मुझमधील वाहतुकीत अडथळा आला परिणामी, तेलाच्या किमती भडकल्या. या वाढत्या तेलाच्या किमतींमुळे महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे, वाढत्या महागाईची लगाम खेचण्यासाठी फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवण्याची शक्यता बळावली. व्याजदर वाढीमुळे बँक ठेवी आणि अमेरिकी बाँड्सवरील परतावा वाढतो तर, सोन्यावर सोन्यावर कोणतेही व्याज मिळत नाही, त्यामुळे गोल्डमधून पैसे काढून व्याज देणाऱ्या पर्यायांकडे लोक वळू लागले.
अमेरिकेत व्याजदर वाढीची शक्यता
शुक्रवारपर्यंत डिसेंबरमध्ये अमेरिकेच्या व्याजदरात वाढ होण्याची 73% शक्यता व्यापारी गृहीत धरून आहेत. फेडरल रिझर्व्हच्या लॉरी लोगन यांनी व्याजदर वाढवण्याचे आवाहन केले, तर उपाध्यक्ष फिलिप जेफरसन यांनीही महागाईवर लगाम न लागल्यास व्याजदर वाढवण्यास तयार असल्याचे म्हटले. दुसरीकडे, सध्या तेलाच्या किमती, महागाई आणि व्याजदर यांसारख्या बाजाराच्या सर्वात मोठ्या चिंता युद्धापेक्षाही अधिक गंभीर मुद्दे बनले आहेत.
पुढील आठवड्यातील महत्त्वाचे फॅक्टर्स
पुढच्या आठवड्यात अमेरिकेतून महागाईची मोठी आकडेवारी येणार नाही, पण काही महत्त्वाचे अहवाल सोने-चांदीच्या हालचालींवर परिणाम करू शकतात. सोमवार, 20 जुलै रोजी, अमेरिकेचे प्रमुख आर्थिक निर्देशक प्रसिद्ध केले जातील, तर नवीन बेरोजगारी भत्त्यांची आकडेवारी 23 जुलै रोजी आणि PMI आकडेवारी 24 जुलै रोजी प्रसिद्ध केली जाईल. तसेच याच दिवशी नवीन घरांच्या विक्रीचे आकडेही समोर येतील.
फेडरल रिझर्व्हची बैठक कधी होणार
यानंतर 28 आणि 29 जुलै रोजी अमेरिकी फेडरल रिझर्व्हची बैठक होईल. त्यामुळे बाजार पुढच्या आठवड्यात कंबर कसून फेड रिझर्व्हच्या बैठकीसाठी तयारी करतील. फेड 28-29 जुलै रोजी बैठक होणार असून त्यामधील फेड अध्यक्षांच्या वक्तव्याकडे बाजारातील गुंतवणूकदार बारीक लक्ष ठेवून असतील.

