Headlines

90 Years Of Akashvani: ज्योत अजून तेवत आहे… – 90 years of akashvani- the journey of all india radio


-उमा दीक्षित

‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या आकाशवाणीच्या ब्रीदवाक्याने भारलेली असतात इथली माणसं. ब्रीदवाक्य सांगतं तसं करण्यासाठी इथले निर्माते धडपडत असतात. मग कृषी, युववाणी, वनिता मंडळ, वृत्त, बालदरबार, विज्ञान असे जे विभाग आहेत, त्यातून ज्ञान आणि मनोरंजन हे तर साधतंच; पण सगळ्यात महत्त्वाचं काय घडतं, तर ते म्हणजे सर्वसामान्यांची हौसलाअफझाई. आपल्या भाषेत, आपल्यासाठी बोलणारं कोणी आहे, हा दिलासा देणारी हौसलाअफझाई.
खासगी वाहिन्या, समाजमाध्यमांतली नित्यनेमाने उगवणारी प्रसारणं या सगळ्यांना नव्याने तोंड देत, आपल्या विलक्षण आत्मतेजाने आकाशवाणी आजही खंबीर उभी आहे.

समाजात ज्या ज्या विषयांवर जागृतीची गरज आहे, तिथे तिथे आकाशवाणीने नेहमीच आपली कामगिरी चोख बजावली आहे. कुटुंब नियोजन, साक्षरता, शिक्षण, मानसिक आणि शारीरिक आरोग्य, विज्ञान, अर्थ अशा अनेक विषयांवर आकाशवाणी निरंतर जनजागृती करते आहे.

श्रोत्यांचं प्रबोधन आणि मनोरंजन करण्यासाठी कलाकार, तज्ज्ञ मंडळी, लेखक, सुधारक, वैज्ञानिक, प्रज्ञावंत यांना आकाशवाणीचं हे व्यासपीठ आवडतं. इथे बोललेल्या शब्दाचं मोल त्यांना कळतं. इथे सादर केलेल्या कलेचा आनंद त्यांच्यासाठी वेगळा असतो. एकाच वेळी लाखो श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याची अद्भुत संधी त्यांना मिळते आणि त्याचं महत्त्व त्यांना माहीत असतं.
आकाशवाणीच्या एखाद्या स्टुडिओत शिक्षणतज्ज्ञ डॉ. रमेश पानसे असतील, तर आणखी एखाद्या स्टुडिओत गुलजारसाहेब असतील, तर आणखी एखाद्या स्टुडिओत पं. हरिप्रसाद चौरसिया असतील. कितीतरी मोठे कलाकार आकाशवाणीत त्यांची कशी सुरुवात झाली होती, याच्या आठवणीत रमलेले असतात.

श्रुतीताई म्हणजे विदुषी श्रुती सडोलीकर-काटकर एकदा सांगत होत्या — कधीतरी विमानतळावर उस्ताद झाकीर हुसेन खानसाहेब भेटले, तेव्हा लहानपणी दोघे ‘गंमत-जंमत’ कार्यक्रमात कसे सहभागी होत असत, म्हणजे गायला छोटी श्रुती आणि तबल्यावर छोटे उस्तादजी, अशी आनंदाची आठवण निघाली. सई परांजपे आकाशवाणीत येतात तेव्हा, ‘मला माहेरी आल्यासारखं वाटतं,’ असं आवर्जून म्हणतात.

मराठी माणसाच्या मनात रुजलेली कितीतरी भावगीतं मुळात आकाशवाणीत ध्वनिमुद्रित झाली होती. आकाशवाणीत संगीतकार कानू घोष यांच्या संगीतात भारतातल्या विविध भाषांमध्ये ध्वनिमुद्रित झालेली देशभक्तिपर गाणी हा एक राष्ट्रीय ऐवज आहे.
देशभरात कार्यरत असलेली आकाशवाणीची ४२० केंद्रं, लोकल रेडिओ स्टेशन्स, एफएम वाहिन्या यांवर निरंतर हा लोकजागर सुरू असतो.

काळानुरूप आकाशवाणीच्या तंत्रज्ञानातही बदल, सुधारणा होत गेल्या. नव्वदच्या दशकात स्पूलवर ध्वनिमुद्रण होत असे. चार-चार मशिन्सवर ही स्पूल लावून आम्ही अक्षरशः कसरत करून संकलन करत असू. तो काळही अफलातून होता.
आकाशवाणी मुंबई केंद्राच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या एनपी स्टुडिओत एका दिवशी आकाशवाणीचे कर्मचारी असलेले ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर पंडित सहा-सहा गाण्यांचं ध्वनिमुद्रण करत असत. पं. सुरेश वाडकर, शाहीर साबळे, रंजना जोगळेकर, उत्तरा केळकर दिवस-दिवसभर स्टुडिओत असत.

‘लोकगीतगंगा’ असा नवीन कार्यक्रम सुरू करायचा होता. कविवर्य वसंत बापट आले होते. प्रभाकर पंडितजींनी आकाशवाणीच्या कॅन्टीनमध्ये बसल्या-बसल्या त्यांच्याकडून ‘लोकगीतगंगा’चं शीर्षकगीत लिहून घेतलं होतं. कवी, लेखक, कलाकार मंडळींचा सांस्कृतिक अड्डा म्हणजे आकाशवाणीचं केंद्र असे.

लाड स्मृती व्याख्यानमाला, सरदार वल्लभभाई पटेल व्याख्यानमाला यांसारख्या व्याख्यानमालांमध्ये अभ्यासू व्यक्तींना निमंत्रित करून एक चिंतनशील ऐवज श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर होत असतं.
आकाशवाणी संगीत संमेलन हे तर खूप प्रतिष्ठेचं प्रसारण. एका शहरातल्या आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त गायकाला दुसऱ्या एखाद्या शहरातल्या आकाशवाणी केंद्रावर निमंत्रण असतं. प्रत्येक केंद्रावर सभागृहात निमंत्रित श्रोत्यांसमोर हे संगीत संमेलन एकाच दिवशी, एकाच वेळी संपूर्ण भारतात सादर होत असतं.

राष्ट्रीय नभोनाट्याचं प्रसारणही असंच. एका भाषेतलं नभोनाट्य भारतातल्या विविध भाषांमध्ये अनुवादित होऊन, प्रत्येक केंद्रावर त्या त्या भाषेत प्रसारित होत असतं. विविधतेत एकतेचा माध्यमातला इतका सुंदर प्रकार दुसरा नसेल.

अभिवाचन आता ठिकठिकाणी होत असतं; पण वाचिक अभिनयाचा मूळ स्रोत आकाशवाणी आहे, हे विसरून चालणार नाही. श्रुतिका हा आकाशवाणीने दिलेला सहज संवादाचा सुंदर फॉरमॅट आहे. आता समाजमाध्यमांवर असंख्य पॉडकास्ट्स दिसतात; तीही आकाशवाणीचीच देणगी आहे. आता इन्फ्लुएन्सर्सचा बोलबाला आहे; आकाशवाणीचे निवेदक आणि सादरकर्ते इन्फ्लुएन्सर्सच तर आहेत.

आकाशवाणीच्या अर्काइव्ह्जमध्ये तर अक्षरशः खजिना आहे. ‘वीज म्हणाली धरतीला’ हे मूळ संचातलं नाटक आकाशवाणीच्या संग्रहालयात उत्तम ध्वनिमुद्रण गुणवत्तेसह आजही उपलब्ध आहे. अशी असंख्य नाटकं, दिग्गज लोकांच्या मुलाखती, हजारोंच्या संख्येने असलेली संगीताची ध्वनिमुद्रणं असं धन आकाशवाणीच्या संग्रहात आहे.

आकाशवाणीचे कार्यक्रम आता ‘ News On Air ’ या ॲपवर जगभरात कुठेही ऐकता येतात. दुबईतली आमची तरुण श्रोता मैत्रीण सांगते, आकाशवाणीचे कार्यक्रम दुबईत ऐकताना मला मुंबईत आपल्या घरी असल्यासारखं वाटतं. कोकणातले एक श्रोते तर आपल्या शेतात स्पीकर लावून सगळ्या कामकऱ्यांना आकाशवाणी ऐकायला लावत असत.
‘WAVES’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता येतात.

आता आकाशवाणीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ध्वनिमुद्रण आणि प्रसारण, दोन्हींमध्ये होतो आहे. पण आकाशवाणीच्या मूळ कार्यक्रमांचा गाभा बदललेला नाही. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आकाशवाणीत नोकरीसाठी आलेल्या तरुण पिढीतही या अशा निर्मितीक्षमतेची बीजं रुजली आहेत.

आकाशवाणी जळगावचा आमचा निर्माता ज्ञानेश्वर बोबडे सांगतो, “आकाशवाणी जीवनानुभव देते.” छत्रपती संभाजीनगर आकाशवाणीचा निर्माता सुजीत बनसोडे सांगतो, “लोककल्याणकारी विद्वत्तेचा आवाज मला लोकांपर्यंत आकाशवाणीतूनच पोहोचवता येतो.”
शेवटच्या माणसापर्यंत आकाशवाणी पोहोचते आहे, हे खरं आहे; पण त्याच्यापर्यंत काय पोहोचवायचं, याची संवेदनशीलता या तरुण निर्मात्यांमध्ये आहे.

या सगळ्याचा एक अतूट बंध म्हणजे आमचे श्रोते.
या श्रोत्यांना आकाशवाणी आपलं घर वाटतं. कोविड काळात ‘वनिता मंडळ’ कार्यक्रम दोन महिने बंद होता. सुरू करताना श्रोत्यांना सांगण्यासाठी आम्ही एक डायल-इन केला. पहिला फोन डोंबिवलीच्या एका श्रोता मैत्रिणीचा होता. ती म्हणाली, “ताई, आज माझ्या घराला घरपण आलं.”

अशाच एका डायल-इनमध्ये पहिला फोन आला. तिकडून ती म्हणाली, ‘पोळ्या करताना कंटाळा येतो, ताई. तुमचा कार्यक्रम ऐकताना पोळ्या कशा होऊन जातात, कळत नाही.’ तर शेवटचा फोन आला, ‘तुमचा कार्यक्रम ऐकताना जगणं सुसह्य होतं.’ आवाज भरून आला होता तिचा.
बस, अजून काय हवं…
माध्यमांच्या झगमगाटात आकाशवाणीची ही अंतरंग उजळून टाकणारी ज्योत अजूनही तेवत आहे…
शांत, स्निग्ध…

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत