Headlines

7 Foot Crocodile Found Inside Gujarat Home Bathroom Video goes Viral | घराच्या बाथरूममध्ये शिरली ७ फुटांची मगर, कुत्र्याच्या भुंकण्यामुळे वाचला जीव, गुजरातमधील व्हिडीओ व्हायरल


Viral Crocodile Video: गुजरातच्या आनंद जिल्ह्यात एका घराच्या बाथरूममध्ये ७ फूट लांबीची मगर शिरल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वनविभागाने तब्बल तासभराच्या प्रयत्नांनंतर त्या मगरीला पकडण्यात यश मिळवलं.

Gujarat Crocodile
(फोटो सौजन्य – @zingabad/x.com)
मगर ही अत्यंत शक्तिशाली आणि खतरनाक शिकारी आहे. मगरीचे दात आणि जबडा अत्यंत मजबूत असतात. ती एकदा हल्ला केला की मग शिकार सहजासहजी सोडत नाही. त्यामुळे प्राणी तज्ज्ञसुद्धा मगरीपासून चार हात लांब राहण्याचाच सल्ला देतात. पण विचार करा, हा खतरनाक शिकारी अचानक तुमच्या घरात शिरला तर तुमची काय अवस्था होईल? होय, असाच काहीसा प्रकार गुजरातमधील आनंद जिल्ह्यात घडला आहे. ७ फूट लांबीची मगर चक्क घराच्या बाथरूममध्ये शिरली. हा थरारक व्हिडीओ पाहून तुम्हीही चकित व्हाल.

अन् बाथरूममध्ये दिसली ७ फुटांची मगर

हा व्हिडीओ @zingabad या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. घडलं असं की, बलाभाई चौहान आणि त्यांचे कुटुंबीय रात्री शांतपणे झोपले होते. दरम्यान, मध्यरात्री अचानक त्यांचा पाळीव कुत्रा जोरजोरात भुंकू लागला. हे भुंकणं काही साधंसुधं नव्हतं. जणू तो कोणाला तरी पळवून लावण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे कुत्र्याच्या भुंकण्यामुळे कुटुंबीयांना जाग आली. त्यांना आधी वाटलं की, घरात चोर शिरला असून कुत्र्याने त्याला बाथरूममध्ये अडकवून ठेवलं आहे. पण बाथरूममध्ये बसलेली महाकाय मगर पाहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

संपूर्ण कुटुंब भीतीने थरथरत होतं. आरडाओरडा सुरू झाला. त्यांचा आवाज ऐकून शेजारीही घटनास्थळी जमा झाले. दरम्यान, त्यांनी वनविभागाला फोन करून मगरीबाबत माहिती दिली.

मगरीला कसं पकडलं?

माहिती मिळताच वनरक्षक निलेश भरवाड, मनीष प्रजापती, दया फाउंडेशनचे अध्यक्ष नितेश चौहान आणि स्वयंसेवक तुषार राणा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी यशस्वीरित्या मगरीचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. जवळपास एक तास ते मगरीला पकडण्याचा प्रयत्न करत होते. मगर तब्बल ७ फूट लांबीची होती. शिवाय, ती स्वतःही घाबरलेली असल्यामुळे तिला पकडणं खूप कठीण जात होतं. अखेर तासभराच्या संघर्षानंतर मगरीला सुरक्षित पकडून जवळील एका तलावात सोडण्यात आलं.

पावसामुळे सध्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे ही मगर अन्नाच्या शोधात या घरात आली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, लक्षवेधी बाब म्हणजे ही घटना घडली त्या परिसरातील मलाताज गावातील एका तलावात १०० हून अधिक मगरी आहेत. पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढल्यानंतर या मगरी अनेकदा बाहेर येतात.

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा