India playing XI second ODI vs England : पहिला वनडे भारताने जिंकला, पण टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार शुभमन गिल आणि गुरनूर ब्रार यांच्या दुखापतीमुळे दुसऱ्या वनडेपूर्वी प्लेइंग-11चा पेच वाढला आहे. दोघांची प्रकृती कशी आहे आणि त्यांच्या जागी कोणाला संधी मिळू शकते?
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेची सुरुवात भारताने दणदणीत विजयाने केली. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. एजबेस्टनवरील पहिल्याच सामन्यानंतर टीम इंडियासमोर मोठी डोकेदुखी उभी राहिली आहे. कर्णधार शुभमन गिल आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार या दोघांच्या दुखापतीमुळे दुसऱ्या वनडेसाठी संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे. गिलला फलंदाजी करताना मैदान सोडावं लागलं, तर गुरनूरला गोलंदाजी अर्धवट सोडून बाहेर जावं लागलं.
गुरनूरला नेमकं काय झालं?
इंग्लंडच्या डावातील ४८वे षटक टाकण्यासाठी गुरनूर ब्रार धावत आला. पण रनअपमध्येच तो अचानक थांबला. उजव्या पायाच्या पोटरीत ताण आल्याने त्याला वेदना सुरू झाल्या. मेडिकल टीमने मैदानावर उपचार केले, मात्र त्याला पुढे गोलंदाजी करणं शक्य झालं नाही. तो लंगडत मैदानाबाहेर गेला.
गुरनूरची उरलेली ओव्हर अक्षर पटेलने पूर्ण केली. विशेष म्हणजे, त्याच षटकात अक्षरने आदिल रशीद आणि जोश टंग यांना बाद करत इंग्लंडचा डाव संपवला. मात्र, गुरनूरची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
भारतीय डावात शुभमन गिल शानदार लयीत होता. ७५ चेंडूत ८० धावा करत तो शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता. पण अचानक त्याच्या उजव्या पायात गोळा आला. फिजिओने मैदानात येऊन उपचार केले. मात्र त्रास कमी न झाल्याने गिलला रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडावं लागलं.
सामन्यानंतर वॉशिंग्टन सुंदरला गिलच्या दुखापतीबाबत विचारण्यात आलं. मात्र, त्यालाही याबाबत ठोस माहिती नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. त्यामुळे दुसऱ्या वनडेत गिल खेळणार का, याबाबत सस्पेन्स कायम आहे.
गिल खेळला नाही तर ईशान तयार
गिल दुसऱ्या वनडेत अनुपलब्ध राहिल्यास ईशान किशनला संधी मिळण्याची शक्यता आहे. रोहित शर्मासोबत तो सलामीला उतरू शकतो. ईशानने अफगाणिस्तानविरुद्धच्या आपल्या अखेरच्या वनडेत १२५ धावांची दमदार खेळी केली होती. सलामीवीर म्हणूनही त्याची आकडेवारी प्रभावी आहे. ९ डावांत त्याने ४९५ धावा केल्या असून त्यात एक द्विशतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
गुरनूर ब्रार फिट झाला नाही, तर भारतीय संघाला गोलंदाजीत बदल करावा लागेल. अर्शदीप सिंग आणि प्रिन्स यादव हे दोन प्रमुख पर्याय संघ व्यवस्थापनासमोर आहेत. दुखापतग्रस्त हर्षित राणाच्या जागी प्रिन्सला संघात स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे अनुभवी अर्शदीपला संधी मिळते की प्रिन्सवर विश्वास दाखवला जातो, याकडे दुसऱ्या वनडेपूर्वी सर्वांचं लक्ष असेल.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा