लक्ष्मी हेब्बाळकर यांची संधी हुकली : मंत्र्यांच्या यादीवरून नाट्यामय घडामोडी : अखेरच्या क्षणी दोघांना वगळले
गेल्या महिनाभरापासून प्रतीक्षा असलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा सोमवारी विस्तार झाला. काँग्रेस हायकमांडने 20 मंत्र्यांची यादी जाहीर केली असली तरी अखेरच्या क्षणी बेळगाव जिल्ह्यातील अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांच्यासह 19 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे नाव चर्चेत असतानाच त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे. सध्या मंत्रिमंडळात एक जागा रिक्त असून तेथे कोणाची वर्णी लागणार, याविषयी तीव्र कुतूहल निर्माण झाले आहे.
► त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर :
तीव्र नाराजी आणि यादीतील अनपेक्षित बदलामुळे गोंधळ निर्माण झालेला असतानाच सायंकाळी 4 ऐवजी 5 वाजता लोकभवनमध्ये नूतन मंत्र्यांचा शपथविधी समारंभाला सुरुवात झाली. लोकभवनमधील ग्लासहाऊसमध्ये आयोजित समारंभात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी नूतन मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी नाट्यामय घडामोडी घडल्या. आमदार गायत्री शांतेगौडा आणि मंकाळू वैद्य यांची नावे यादीतून वगळून एस. एस. मल्लिकार्जुन यांचे नाव समाविष्ट करण्यात आले. काँग्रेस हायकमांडने सोमवारी सकाळी 20 मंत्र्यांची यादी अंतिम करून ती मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे पाठविली. परंतु, मंकाळू वैद्य यांच्या जागी एस. एस. मल्लिकार्जुन यांना संधी देण्यात आली. हा बदल करून हायकमांडने 20 नावांची दुसरी यादी पाठविली. परंतु, गायत्री शांतेगौडा यांना मंत्रिपद देण्यास आक्षेप घेण्यात आल्याने नाव असूनही 19 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.
डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वातील दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारावेळी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. 7 जण पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत. सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळातील 12 जणांना वगळण्यात आले आहे. राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यापासून मंत्रिपदावर नजर असलेल्यांपैकी लक्ष्मण सवदी, बसवराज रायरे•ाr, पुट्टरंगशेट्टी यांना संधी देण्यात आली आहे. सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांपैकी शिवराज तंगडगी, जमीर अहमद खान, चेलुवरायस्वामी, एस. एस. मल्लिकार्जुन, मधू बंगारप्पा आणि संतोष लाड यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्यात आपली मंत्रिपदे कायम ठेवली आहेत.
महर्षि वाल्मिकी विकास निगममधील अनुदानाचा दुरुपयोग प्रकरणी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या बी नागेंद्र यांनी पुन्हा मंत्रिमंडळात स्थान पटकावले आहे. यापूर्वी विविध सरकारमध्ये मंत्रिपदे भूषविलले बसवराज रायरे•ाr, पी. एम. नरेंद्रस्वामी, भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद सांभाळलेले लक्ष्मण सवदी, विधानसभेचे उपाध्यक्षपद भूषविलेले रुद्रप्पा लमाणी यांना डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दिवंगत माजी मुख्यमंत्री एन. धरमसिंग यांचे पुत्र डॉ. अजय धरमसिंग, आमदार टी. रघुमूर्ती, के. एस. बसवंतप्पा, के. एम. शिवलिंगेगौडा, एच. सी. बालकृष्ण, विजयानंद काशप्पनवर, रिझवान अर्शद हे नवे चेहरेही मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले आहेत.
मंकाळू वैद्य यांचे नाव वगळले
मंत्रिमंडळ विस्ताराच्या अखेरच्या क्षणी मंत्र्यांच्या यादीत आश्चर्यकारक बदल करण्यात आला. कारवार जिल्ह्यातील भटकळचे आमदार मंकाळू वैद्य यांचे नाव मंत्र्यांच्या यादीत जाहीर करण्यात आले तरी नंतर एआयसीसीने ‘टाईपिंग मिस्टेक’ असे कारण देत यादीत दुरुस्ती केली. मंकाळू वैद्य यांचे नाव काढून टाकून त्या ठिकाणी दावणगेरे उत्तरचे आमदार एस. एस. मल्लिकार्जुन यांचे नाव समाविष्ट करण्यात आले. मल्लिकार्जुन यांनी राजीनाम्याचा इशारा दिल्याने हायकमांडने त्यांना मंत्रिमंडळात सामील केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेस गोटात कुतूहल निर्माण झाले आहे.
गायत्री शांतेगौडांना अखेरच्या क्षणी डावलले
आमदार गायत्री शांतेगौडा यांनाही अखेरच्या क्षणी धक्का देण्यात आला आहे. महिला गटातून मंत्रिपदासाठी आव्हान निर्माण झाल्याने काँग्रेस हायकमांडच्या सूचनेवरून यादीन नाव असून देखील गायत्री शांतेगौडा यांना वगळण्यात आले. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव होते. मात्र, आमदार एन. एस. बोसराजू, माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, उमाश्री यांनी आव्हान दिल्याने गायत्री यांना मंत्रिपद हुकले आहे. परिणामी मंत्रिमंडळातील एक जागा रिक्त राहिली आहे.
शपथविधी समारंभाला सिद्धरामय्या अनुपस्थित
राज्य मंत्रिमंडळ विस्तारापाठोपाठ सत्ताधारी काँग्रेस पक्षात अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. सोमवारी लोकसभवनमध्ये मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या नूतन मंत्र्यांच्या शपथविधी समारंभाला अनुपस्थित राहून माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या नाराजी व्यक्त केली. मंत्र्यांची यादी अंतिम करताना कुरूब (धनगर) समुदायातील आमदार गायत्री शांतेगौडा यांचे नाव अखेरच्या क्षणी वगळण्यात आले. हेच सिद्धरामय्यांच्या नाराजीचे प्रमुख कारण मानले जात आहे.

काँग्रेसश्रेष्ठींनी दिलेला शब्द पाळला
मागील भाजप सरकारच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्रिपद भूषविलेल्या अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांना मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले आहे. त्यांनी सोमवारी ईश्वराच्या नावे पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. प्रभावी लिंगायत नेते असणारे सवदी यांना 2023 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने त्यांनी भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षातून त्यांनी निवडणूक लढवत विजय मिळविला. या निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनानुसार काँग्रेसश्रेष्ठींनी सवदी यांना मंत्रिपद दिले आहे. सवदी हे 2004, 2008 आणि 2023 च्या निवडणुकीत अथणी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले. एक वेळ विधानपरिषद सदस्यपदही सांभाळले आहे. भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची व मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती.
सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळातील 12 जणांना वगळले
सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविलेल्या अनेकांना यावेळी मंत्रिपदे गमावावी लागली आहेत. लक्ष्मी हेब्बाळकर, एच. के. पाटील, शिवानंद पाटील, डॉ. एच. सी. महादेवप्पा, डॉ. एम. सी. सुधाकर, दिनेश गुंडूराव, के. वेंकटेश, रहीम खान, आर. बी. तिम्मापूर, एस. एन. बोसराजू, मंकाळू वैद्य, शरणबसप्पा दर्शनापूर या 12 जणांना डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. त्यांच्याऐवजी नव्या चेहऱ्यांना आणि यापूर्वीच्या इतर सरकारमध्ये मंत्रिपदे भूषविलेल्यांना संधी देण्यात आली आहे.
सभाध्यक्ष, सभापतीपदांसाठीही नावे जाहीर
नव्या मंत्र्यांच्या यादीपाठोपाठ काँग्रेसश्रेष्ठींनी विधानसभा आणि विधानपरिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची नावेही जाहीर केली आहेत. विधानसभेचे नूतन अध्यक्ष म्हणून गदग जिल्ह्यातील रोणचे आमदार जी. एस. पाटील यांची वर्णी लावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी कोडगू जिल्ह्यातील विराजपेठचे आमदार ए. एस. पोन्नण्णा यांची निवड करण्यात आली आहे. विधानपरिषद सभापतीपदी ज्येष्ठ सदस्य व प्रभावी अल्पसंख्याक नेते सलीम अहमद व उपसभापतीपदी उमाश्री यांची नेमणूक करण्यात आली आहे.
प्रथमच मंत्रिपदे मिळालेले आमदार
डॉ. अजय धरमसिंग
आमदार टी. रघुमूर्ती
के. एस. बसवंतप्पा
के. एम. शिवलिंगेगौडा
एच. सी. बालकृष्ण
विजयानंद काशप्पनवर
रिझवान अर्शद
मलाही एकदा संधी हुकली!
आमच्यात अनेकजण आमदार आहेत, सर्वांनाच संधी देणे शक्य नाही. यापूर्वी सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात मला देखील एकदा मंत्रिपदापासून वंचित रहावे लागले होते. नंतर ही संधी मिळविली. अशाच रितीने आगामी दिवसांत सर्वांना संधी देईन. त्यामुळे कोणीही निराश होऊ नये.
– डी. के. शिवकुमार, मुख्यमंत्री
शपथबद्ध झालेले 19 मंत्री
मंत्री मतदारसंघ जिल्हा
लक्ष्मण सवदी अथणी बेळगाव
मधू बंगारप्पा सोरब शिमोगा
एस. एस. मल्लिकार्जुन दावणगेरे उत्तर दावणगेरे
बी. नागेंद्र बळ्ळारी बळ्ळारी
रुद्रप्पा लमाणी हावेरी हावेरी
शिवराज तंगडगी कनकगिरी कोप्पळ
एन. चेलुवरायस्वामी नागमंगल मंड्या
बसवराज रायरे•ाr यलबुर्गा कोप्पळ
संतोष लाड कलघटगी धारवाड
एम. पी. नरेंद्रस्वामी मळवळ्ळी मंड्या
डॉ. अजय धरमसिंग जेवर्गी कलबुर्गी
टी. रघुमूर्ती चळ्ळकेरे चित्रदुर्ग
के. एस. बसवंतप्पा मायकोंड दावणगेरे
के. एम. शिवलिंगेगौडा अरसीकेरे हासन
एच. सी. बालकृष्ण मागडी बेंगळूर दक्षिण
विजयानंद काशप्पनवर हुनगुंद बागलकोट
रिझवान अर्शद शिवाजीनगर बेंगळूर शहर
जमीर अहमद खान चामराजपेठ बेंगळूर शहर
सी. पुट्टरंगशेट्टी चामराजनगर चामराजनगर
