Headlines

'राणे स्टाईलने उत्तर देण्याचे दिवस गेले':विनायक राऊत यांची सडकून टीका, मुंबईतील परिस्थितीवरून सरकारला धरले धारेवर




शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकार, भाजप आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मुंबईतील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून त्यांनी मुंबई महानगरपालिका आणि भाजपच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचबरोबर मुंबई-गोवा महामार्ग, कोकणातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प, रामरक्षा आंदोलन आणि पक्षांतराच्या राजकारणावरही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. मुंबईतील पाणी तुंबण्याला भाजपचा कारभार जबाबदार मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पावसानंतर अनेक भाग जलमय झाल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत म्हणाले की, पूर्वी सत्तेत असताना भाजप शिवसेनेवर आरोप करत होती, मात्र आज परिस्थिती उलट झाली आहे. मुंबईकर भाजपच्या कारभाराला कंटाळले असून पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे केवळ कागदावर झाली, असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या मते, मोठ्या ठेकेदारांकडून नालेसफाईच्या नावाखाली निधी खर्च झाला, मात्र प्रत्यक्षात मिठी नदी, वाकोला नाला आणि इतर प्रमुख नाले कचऱ्याने भरलेलेच राहिले. त्यामुळे पावसात संपूर्ण मुंबई तुंबली असल्याचे त्यांनी सांगितले. मॅनहोल दुर्घटना, झाडे कोसळण्यावरून प्रशासनावर निशाणा राऊत यांनी उघड्या मॅनहोलमुळे घडलेल्या दुर्घटनांचाही उल्लेख केला. महापौरांच्या दौऱ्यादरम्यान एका अधिकाऱ्याचा मॅनहोलमध्ये पडण्याचा प्रसंग घडल्याचे सांगत, यापूर्वीही अनेकांनी अशा दुर्घटनांमध्ये जीव गमावल्याचा दावा त्यांनी केला. झाडे कोसळण्याच्या घटनांवरूनही त्यांनी प्रशासनावर टीका केली. झाडांच्या फांद्यांची वेळेवर छाटणी न झाल्याने आणि धोकादायक झाडे हटवण्यात निष्काळजीपणा झाल्याने नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले. एका शालेय विद्यार्थ्याचा झाड पडून मृत्यू झाल्याची आठवण करून देत, स्वतःच्या इमारतीजवळील धोकादायक झाडाबाबत वर्षभरापूर्वी तक्रार करूनही पालिकेने दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबई-गोवा महामार्ग ‘मृत्यूचा सापळा’ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरूनही राऊत यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला लक्ष्य केले. रायगडमधील माणगाव ते इंदापूर हा पट्टा ‘मृत्यूचा सापळा’ बनल्याचा दावा करत त्यांनी संरक्षक भिंती कोसळणे, रस्ते खचणे आणि पुलांची दुरवस्था यामुळे मोठा धोका निर्माण झाल्याचे सांगितले. महामार्गाबाबत अनेक वेळा लेखी तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे सांगत, या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय आणि राज्य सरकारची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजप प्रदेशाध्यक्षांवरही टीका मॅनहोल दुर्घटनेनंतर भाजप प्रदेशाध्यक्षांच्या कथित प्रतिक्रियेवरही त्यांनी आक्षेप घेतला. अशा गंभीर घटनेवर उपहासात्मक प्रतिक्रिया देणे म्हणजे मुंबईकरांचीच चेष्टा असल्याचे ते म्हणाले. मुंबईच्या उपमहापौरांनी दिलेल्या परखड प्रतिक्रियेचे त्यांनी कौतुकही केले. सिंधुदुर्गातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न राऊत यांनी सिंधुदुर्गातील कायदा-सुव्यवस्थेवरही गंभीर आरोप केले. सिंधुदुर्गात ड्रग्ज, मटका आणि हिंसाचाराच्या घटना वाढल्याचा दावा करत त्यांनी पोलिस प्रशासन अपयशी ठरल्याचे म्हटले. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नारायण राणेही पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली. कोकणात अणुऊर्जा प्रकल्पांना ठाम विरोध कोकणातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पांवरूनही त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. जयतापूरनंतर आता देवगड परिसरातही अणुऊर्जा प्रकल्प आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, कोकणच्या विनाशाला कारणीभूत ठरणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाला शिवसेना विरोध करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याऐवजी कोकणात पर्यटन, सोलर पार्क, टेक्स्टाईल पार्क, ग्रामीण पर्यटन आणि रोजगारनिर्मिती करणारे उद्योग आणावेत, अशी मागणी त्यांनी केली. स्कूबा डायव्हिंगसारख्या पर्यटन व्यवसायातून स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो, असेही त्यांनी सांगितले. ‘राणे स्टाईलने उत्तर देण्याचे दिवस गेले’ नारायण राणे यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना विनायक राऊत म्हणाले, “राणे स्टाईलने उत्तर देण्याचे दिवस गेले आहेत. आम्हीही मेलेल्या आईचे दूध प्यायलेलो नाही.” मंत्री आणि खासदार झाल्यानंतरही राणे यांच्या बोलण्याची पद्धत बदललेली नसल्याची टीकाही त्यांनी केली. ‘आमदार-खासदार विकत घेऊन पक्ष वाढवला जातो’ सत्ताधारी पक्ष स्वतःच्या विचारांचे लोकप्रतिनिधी निवडून आणण्याऐवजी विरोधी पक्षातील आमदार-खासदारांना कोट्यवधी रुपये देऊन पक्षात घेत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. ही लोकशाहीसाठी अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे ते म्हणाले. राम मंदिरातील कथित गैरव्यवहारावर ‘रामरक्षा आंदोलन’ अयोध्येतील राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू होणाऱ्या ‘रामरक्षा आंदोलनाची’ माहितीही राऊत यांनी दिली. रामाच्या नावाने जमा झालेल्या देणग्या आणि सोन्याच्या विटांबाबत झालेल्या कथित गैरव्यवहाराविरोधात हे आंदोलन असल्याचे त्यांनी सांगितले. उद्यापासून राज्यभर आंदोलन सुरू होणार असून मुंबईतील दादर येथील हनुमान मंदिरात महाआरती, रामरक्षा, हनुमान स्तोत्र आणि हनुमान चालीसाचे सामूहिक पठण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ‘कोकण विकासाला पूरक प्रकल्प हवेत’ कोकणात बाहेरील गुंतवणूकदारांच्या फायद्यासाठी मोठे प्रकल्प आणले जात असल्याचा आरोप करत राऊत म्हणाले की, स्थानिकांच्या हिताचे पर्यटन, पर्यावरणपूरक उद्योग आणि रोजगारनिर्मिती करणाऱ्या योजना राबवल्या पाहिजेत. कोकणातील नैसर्गिक सौंदर्य, सुरक्षित वातावरण आणि स्थानिकांच्या आदरातिथ्यामुळे गोव्यापेक्षाही पर्यटकांचा कल कोकणाकडे वाढत असल्याचा दावा त्यांनी केला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत