![]()
मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आणि संपूर्ण कोकण पट्ट्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतीक्षा असली, तरी रत्नागिरी जिल्ह्यात मात्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे खेड येथील प्रसिद्ध जगबुडी नदीने पाण्याची इशारा पातळी ओलांडली असून, नदीकाठच्या परिसरात चिंतेचे वातावरण आहे. तर दुसरीकडे, याच पावसामुळे दापोली परिसरातील शेतकरी सुखावला असून भात लावणीच्या कामांना मोठा वेग आला आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, दापोली आणि गुहागर तालुक्यात आज दुपारनंतर पावसाचा जोर अचानक प्रचंड वाढला. संततधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली असून, काही मुख्य मार्गांवरील वाहतुकीवर याचा थेट परिणाम झाला आहे. खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान खात्याचा अंदाज पाहता पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास जगबुडी नदी अवघ्या काही तासांत धोक्याची पातळी गाठण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आपत्कालीन यंत्रणा परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. दापोली तालुक्यात भात लावणीची लगबग; खरीप हंगामाला संजीवनी मुसळधार पावसामुळे एकीकडे पुराचे संकट उभे ठाकले असताना, दुसरीकडे दापोली तालुक्यातील कृषी क्षेत्रासाठी हा पाऊस वरदान ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत होते आणि भात लावणीची कामे खोळंबली होती. पावसाचा जोर वाढताच बळीराजा सकाळपासूनच पारंपरिक पद्धतीने शेतात उतरला आहे. सध्या दापोली तालुक्यात सर्वत्र हिरवाईने नटलेली शेते, चिखलात गाणी गात सुरू असलेली पारंपरिक भात लावणी आणि शेतकऱ्यांची लगबग असे नयनरम्य चित्र पाहायला मिळत आहे. वेळेत झालेल्या या दमदार पावसामुळे यंदाचा खरीप हंगाम उत्तम जाण्याची आशा निर्माण झाली असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलले आहे.
Source link
रत्नागिरीत मुसळधार पावसाचा धुमाकूळ:जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी; प्रशासन हाय अलर्टवर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
