Headlines

मेक्सिको 40 वर्षांनंतर बाद फेरीत विजयी


इक्वेडोरवर 2-0 गोल्सनी मात, ज्युलियन क्विनोनेस, राउल जिमेनेझ यांनी नोंदवले गोल

वृत्तसंस्था, मेक्सिको सिटी : मेक्सिकोसाठी 40 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. विश्वचषकाच्या बाद फेरीत पराभव पचवण्याची मेक्सिकन चाहत्यांना सवय झाली होती. या टप्प्यावर मेक्सिकोच्या चाहत्यांना सात वेळा निराशा आणि दु:खाचा सामना करावा लागला होता. पण आता चित्र बदलले आहे. मंगळवारी रात्री खेळल्या गेलेल्या सामन्यात ज्युलियन क्विनोनेस आणि राउल जिमेनेझ यांनी पहिल्या सत्रात अवघ्या नऊ मिनिटांच्या अंतराने गोल केले. यामुळे मेक्सिकोने इक्वेडोरचा 2-0 असा पराभव केला आणि बाद फेरीतील चार दशकांचा दुष्काळ संपवत 16 संघांच्या फेरीमध्ये धडक मारली.

वादळी हवामानामुळे हा सामना नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिरा सुरू झाला. क्विनोनेसने 22 व्या मिनिटाला पहिला गोल केला आणि जिमेनेझने 31 व्या मिनिटाला संघासाठी दुसरा गोल नोंदवला. मेक्सिकोने 1986 मध्ये यजमानपद भूषवताना 16 संघांच्या फेरीमध्ये बल्गेरियाचा पराभव केला होता, त्यानंतर त्यांना बाद फेरीत एकदाही विजय मिळवता आला नव्हता.

मेक्सिकोचे प्रशिक्षक झेवियर अॅग्युरी हे 1986 च्या त्या संघात सुऊवातीच्या मिडफील्डर्सपैकी एक होते. ‘हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे कारण मी अशा खेळाडूंपैकी एक होतो ज्यांना बाद फेरीत पुढे जाता आले नव्हते. आम्ही आता 16 संघांच्या फेरीमध्ये आहोत आणि चाहत्यांशी आमचे एक उत्तम नाते निर्माण होत आहे. आम्ही एका कुटुंबासारखे आहोत. हे खरोखरच अद्भूत आहे’, असे अॅग्युरी म्हणाले.

1994 ते 2018 या काळात मेक्सिकोला याच टप्प्यावर सलग सात वेळा पराभवाचा सामना करावा लागला होता आणि 2022 मध्ये तर ते गट फेरीच्या पुढे जाऊ शकले नव्हते. या स्पर्धेतील तिसऱ्या गोलमुळे क्विनोनेस हा विश्वचषकाच्या इतिहासात मेसिक्कोसाठी सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत लुईस हर्नांडेझ आणि झेवियर हर्नांडेझ (प्रत्येकी चार गोल) यांच्यापाठोपाठ संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

गेल्या हंगामात सौदी प्रो लीगमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरलेला क्विनोनेस मेक्सिकोच्या आघाडीफळीतनवी ऊर्जा घेऊन आला आहे. या उर्जेची कमतरता मागील विश्वचषकांमध्ये जाणवत होती. दुसरीकडे, जिमेनेझने या स्पर्धेतील आपला दुसरा गोल केला. राष्ट्रीय संघासाठी त्याचे एकूण 47 गोल झाले असून त्याने जेरेड बोर्गेटीशी असलेली बरोबरी मोडली आहे. मेक्सिकोसाठी सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हर्नांडेझशी बरोबरी करण्यासाठी त्याला आता आणखी पाच गोलची गरज आहे. मेक्सिकोचा पुढील सामना रविवारी होईल. हा सामना इंग्लंड आणि काँगो यांच्यात होणाऱ्या सामन्यातील विजेत्या संघाविऊद्ध खेळला जाईल.

 



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत