Headlines

पुण्यात सार्वजनिक वाहतुकीला गती, उन्नत मार्गावर मेट्रोसारखी वेगवान E-RTS यंत्रणा, खाली वर्तुळाकार मार्गाने कोंडी फुटणार| Maharashtra Times


Pune Inner Ring Road: पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठे बदल होणार आहे. HCMTRअंतर्गत पुण्यात वर्तुळाकार वाहतूक मार्ग बांधण्यात येणार असून आता मेट्रोसारखी गतिमान असलेली आणखी एक यंत्रणा शहरात धावणार आहे.

सार्वजनिक वाहतुकीला गती
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: पुणे व पिंपरी-चिंचवडमधील वाढत्या वाहतूक गरजा लक्षात घेऊन एचसीएमटीआर (हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट) आणि ई-आरटीएस (इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम) या महत्त्वाकांक्षी सार्वजनिक वाहतूक प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती द्यावी; तसेच पालिकेने प्रकल्पासाठी आवश्यक प्रशासकीय, तांत्रिक व नियोजनासंदर्भातील कार्यवाही तातडीने सुरू करून प्रायोगिक प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण करावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून प्रकल्पाबाबत माहिती

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमधील वाढती लोकसंख्या, वेगाने वाढणारे शहरीकरण आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील वाढता ताण लक्षात घेऊन भविष्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान व प्रवासीभिमुख करण्याच्या दृष्टीने ‘एचसीएमटीआर’ (हाय कपॅसिटी मास ट्रान्सिट रूट) आणि वर्तुळाकार मार्ग विकास प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (२७जुलै) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते.

Maharashtra TimesPune Metro News: पुण्यात मेट्रोचे जाळे विस्तारणार ; विस्ताराचा ‘डीपीआर’ सादर, पिंपरी – चिंचवडच्या पुढील ५० वर्षाच्या वाहतुकीचा विचार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता यांच्यासह पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, ‘पीएमआरडीए’ चे आयुक्त अभिजित चौधरी, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे आदी या वेळी उपस्थित होते.

कशी असेल ई-आरटीएस प्रणाली

ई-आरटीएस (इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम) या अत्याधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या संकल्पनेची माहिती आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. ही प्रणाली मेट्रोप्रमाणेच वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी असून, रबर टायरवर धावणाऱ्या पूर्णतः इलेक्ट्रिक वाहनांवर आधारित असेल. एका वाहनामध्ये सुमारे २४०हून अधिक प्रवासी प्रवास करू शकतील अशी क्षमता या प्रणालीमध्ये असेल, असेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर ‘एचसीएमटीआर’ व शहरातील सर्व बीआरटी मार्गावर ई-आरटीएस प्रणालीचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात येणार आहे; तसेच शहरातील सर्व मेट्रो स्थानके, रेल्वे स्थानके आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांशी प्रभावी व सुलभजोडणी निर्माण करून नागरिकांना अखंड, जलद आणि प्रवाशाभिमुख प्रवासाचा अनुभव देण्याचा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचे सादरीकरणात स्पष्ट करण्यात आले.

कसा होणार फायदा?

या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास, प्रदूषणात घट होण्यास, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढण्यास; तसेच नागरिकांना अधिक सुरक्षित, जलद आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले. सादरीकरणानंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे व पवार; तसेच उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संकल्पनेचे स्वागत करून प्रकल्पास मान्यता दर्शविली.

पिंपरी-चिंचवड ई-आरटीएस महापालिकेने प्रणालीच्या आवश्यक अंमलबजावणीसाठी प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही तातडीने सुरू करावी; तसेच प्रायोगिक प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही गतीने करण्याच्या सूचना फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Maharashtra TimesPune Traffic: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ३ मोठे प्रकल्प, फडणवीसांनी कोणते आदेश दिले?

१७ किलोमीटर लांबीचा प्रायोगिक मार्ग

प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणून सुमारे १७ किलोमीटर लांबीचा प्रायोगिक मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या मार्गामध्ये गोडाउन चौक, कुदळवाडी चौक, ऑटो क्लस्टर, काळेवाडी फाटा, जगताप डेअरी चौक आणि वाकड या प्रमुख भागांचा समावेश आहे. हा प्रकल्प महामेट्रोच्या सहकार्याने सुमारे एक ते दीड वर्षांच्या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित करण्याचे नियोजन बैठकीत मांडण्यात आले.

“पिंपरी-चिंचवडच्या भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन ‘एचसीएमटीआर’ आणि ई-आरटीएस’ एकात्मिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची संकल्पना बैठकीत मांडली. मेट्रो, बीआरटी आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांना प्रभावीपणे जोडणारी, पर्यावरणपूरक, उच्च क्षमतेची आणि प्रवाशाभिमुख अशी ही प्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न आहे,” डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा