Nandurbar farmer funeral news: सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याने अनोखे आंदोलन केले आहे. त्याच्या आंदोलनाची राज्यभर चर्चा रंगली आहे. आधी अंत्ययात्रा आणि नंतर थेट विहिरीत उडी घेत त्यांनी हे आंदोलन केले आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
महेश पाटील, नंदुरबार: सरसकट कर्जमाफी आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी नंदुरबार तालुक्यातील सैताणे गावात सोमवारी एका शेतकऱ्याने अनोखे आणि लक्षवेधी आंदोलन उभारले. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांची व्यथा सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकरी प्रमोद पाटील यांनी स्वतःची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत थेट विहिरीत उडी घेत आंदोलन छेडले. राज्य सरकारच्या कर्जमाफी धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यासाठी सैताणे गावातील विठ्ठल मंदिर परिसरात शेतकरी, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिक एकत्र आले होते. आंदोलनाची सुरुवात भजन-कीर्तनाने करण्यात आली. त्यानंतर प्रमोद पाटील यांना तिरडीवर झोपवून गावातून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. या अनोख्या आंदोलनामुळे गावात मोठी गर्दी झाली होती.
अंत्ययात्रा विहिरीजवळ पोहोचताच वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले. पोलिसांनी पुढे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलनकर्त्यांनी माघार घेण्यास नकार दिला. आत्महत्येचा कोणताही विचार नसून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन असल्याचे सांगत प्रमोद पाटील यांनी विहिरीत झेप घेतली.
विहिरीतील पाण्यावर तरंगत तब्बल अर्धा तास त्यांनी आंदोलन सुरू ठेवले. या काळात त्यांनी योगासने करून आंदोलनाचा वेगळाच संदेश दिला. विहिरीभोवती जमलेल्या नागरिकांनी घोषणाबाजी करत शेतकरी मागण्यांना पाठिंबा दर्शविला.
घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही काळ पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक खडाजंगीही झाली. अखेर महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर प्रमोद पाटील विहिरीबाहेर आले.
मात्र, आंदोलन संपलेले नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी सरकारला थेट इशारा दिला. “सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याबाबत लेखी निर्णय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील. गरज पडल्यास पुन्हा विहिरीत उतरून अन्नत्याग आंदोलन छेडले जाईल,” असे त्यांनी सांगितले.
सैताणे येथील या आंदोलनाची चर्चा आता जिल्ह्याबाहेरही सुरू झाली आहे. शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून ग्रामीण भागातील वाढती अस्वस्थता या आंदोलनातून समोर आल्याची चर्चा सुरू आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा