जवळपास दशकभराच्या नात्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि जॉर्जिना रोड्रिगेज यांनी अखेर विवाह केला. ११ ऑगस्टला पोर्तुगालमधील कासकैश या ठिकाणी अत्यंत खासगी पद्धतीने ठेवलेल्या सोहळ्यात दोघांनी लग्न केले. रोनाल्डोने लग्नाच्या अंगठ्या घातलेला फोटो शेअर करत त्यांच्या लग्नाची माहिती सोशल मीडियावरुन जाहीर केली.

चाहत्यांना दिलं मोठं सरप्राईज
५ वेळा ‘बॅलन डी’ओर’ विजेता फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याची पार्टनर जॉर्जिना रोड्रिगेज अधिकृतपणे विवाहबंधनात अडकले आहेत. रोनाल्डोने स्वतः जॉर्जिनासोबतचा वेडिंग रिंग फ्लॉन्ट करतानाचा हा रोमँटिक फोटो शेअर करत, चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे.
खासगी आणि अत्यंत साधेपणाने पार पडला विवाह सोहळा
हा विवाहसोहळा पोर्तुगालची राजधानी लिस्बनजवळील ‘कासकैश’ (Cascais) या निसर्गरम्य किनारपट्टीवरील शहरात पार पडला. विशेष म्हणजे, या लग्नाला कोणताही मोठा थाटमाट नव्हता किंवा व्हीआयपी पाहुण्यांची गर्दी नव्हती. हा सोहळा अत्यंत प्रायव्हेट ठेवण्यात आला होता.
फक्त ५ मुलांच्या उपस्थितीत लग्न
रोनाड्लो अन् जॉर्जिनाच्या लग्नाच्या या खास आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार फक्त त्यांची पाच मुलं होती. ख्रिस्तियानो ज्युनियर, जुळी मुले इवा व मातेओ, अलाना मार्तिना आणि बेला एस्मेराल्डा यांच्या उपस्थितीत रोनाल्डो आणि जॉर्जिनाने आपल्या नव्या वैवाहिक आयुष्याची अधिकृतपणानं सुरुवात केली.
दोघांची अशी जुळली जोडी
दरम्यान दोघांच्या प्रेमकहाणीची सुरुवात जवळपास १० वर्षांपूर्वी, २०१६ मध्ये माद्रिद येथे झाली. रोनाल्डो तेव्हा ‘रियल माद्रिद’चा स्टार होता, तर जॉर्जिना गुच्चीच्या (Gucci) स्टोअरमध्ये सेल्स असिस्टंट होती. एका ब्रँड इव्हेंटमधील भेटीतून फुललेलं हे प्रेम स्पेन, इटली, इंग्लंड करत आता सौदी अरेबियापर्यंत अन् आता विवाहापर्यंत पोहोचलं.
जॉर्जिनाची खंबीर साथ आणि एक आदर्श आई
जॉर्जिनाने केवळ आपल्या सख्ख्या मुलींनाच नव्हे, तर सरोगसीने जन्मलेली जुळी मुले आणि ख्रिस्तियानो ज्युनियरलाही अगदी सख्ख्या आईप्रमाणेच माया लावली आहे. गेल्या अनेक वर्षांत रोनाल्डोच्या आयुष्यातील प्रत्येक सुख-दुःखात ती त्याची सर्वात मोठी ताकद बनून उभी आहे.
दोघांकडे किती संपत्ती?
ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि जॉर्जियाना रॉड्रिग्ज यांची एकत्रित अंदाजित निव्वळ संपत्ती सुमारे १.२ अब्ज ते १.४ अब्ज डॉलर्स आहे. या संपत्तीत मोठा भाग रोनाल्डोचा आहे, तो इतिहासातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. तर यामध्ये जॉर्जिनाची १० ते ३५ दशलक्ष डॉलर्स (अंदाजे) इतकी संपत्ती आहे.

