मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रशंसोद्गार : अग्निशामक दलास 18 अत्याधुनिक वाहने प्रदान
त. भा. प्रतिनिधी
पणजी : राज्याची आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा, आपत्ती सज्जता आणि सार्वजनिक सुरक्षा पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून, आज अग्निशामक दलाला 18 वाहने देण्यात आली आहेत. अग्निशामक दलाच्या ताफ्यात प्रथमच 42 मीटर उंच शिडी असणारे वाहन सामील झाले असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले. आपत्तीकाळात अग्निशामक दलाचे जवान आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत असतात, असे प्रशंसोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले.
या वाहनांचा समावेश हा अग्निशामक व आपत्कालीन सेवा संचालनालयाच्या आधुनिकीकरणातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. संपूर्ण राज्यात अग्निसुरक्षा पायाभूत सुविधा वाढवणे, आपत्ती सज्जता मजबूत करणे आणि जलद, कार्यक्षम व विश्वसनीय आपत्कालीन प्रतिसाद सेवा देण्यावर निश्चितच महत्त्वाचा टप्पा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. काल मंगळवारी सांत इनेझ येथील अग्निशामक दलाच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संचालक नितीन रायकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, वाहने खरेदी करण्यासाठी आम्हाला 15 व्या वित्त आयोगाकडून आर्थिक मदत मिळाली आहे. याबाबत आपण केंद्र सरकारचे आभार मानतो. अग्निशामक वाहनांसह आज दलाला दुचाकी आणि हॅझमॅट पद्धतीचे वाहन देखील देण्यात आले आहे.
तब्बल 42 मीटरची शिडी अग्निशामकच्या ताफ्यात
अग्निशामक दलाच्या ताफ्यात काल मंगळवारी प्रथमच 42 मीटर उंच शिडी असणारे वाहन सामील झाले आहे. हे वाहन मोठ्या इमारतींमधील बचाव कार्यासाठी उपयुक्त पडणार आहे. पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी या सर्व वाहनांचा उपयोग होणार आहे.
युवकांना सुखरुप परत आणले
काही दिवसापूर्वी धबधब्यावर अडकलेल्या युवकांना सुखरूप परत आणण्याचे काम दलाच्या जवानांनी केले आहे. दलाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासोबत आम्ही त्यांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देत आहोत.
मडगाव, केपे, फोंडा येथे उपकरणे देणार
यापुढे मडगाव, केपे, फोंडा व अन्य अग्निशामक दलाच्या केंद्रात विविध सुरक्षा उपकरणे आणि वाहने पुरवली जाणार आहेत. याशिवाय वाहतूक कोंडीत अडकू नयेत याकरिता दुचाकी देखील देण्यात येणार आहेत. असेही मुख्यमंत्री म्हणाले.
थर्ड पार्टी अग्नि सुरक्षा प्रमाणपत्र देण्यासाठी तीन एजन्सींना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. मागील काही वर्षांत तीन-चार नवीन अग्निशामक केंद्रे स्थापन झाली आहेत. यामुळे सध्या मनुष्यबळ काही प्रमाणात अपुरे पडत आहे, असे अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर यांनी सांगितले. नवीन भरतीसाठी आम्ही कर्मचारी भरती आयोगाला प्रस्ताव पाठवला आहे. लवकरच दलातर्फे दोन पाणबुडे कंत्राटी तत्त्वावर घेण्यात येणार आहेत. एक मुख्यालय तर दुसरा मडगावमध्ये तैनात करण्यात येणार आहे. 18 वाहनांची किंमत सुमारे 22.80 कोटी ऊपये आहे. यामधील 11 कोटी ऊपये 15 व्या वित्त आयोगाने दिले आहेत. वाहनांमध्ये 8 लहान बंब, 8 दुचाकी आणि प्रत्येकी एक हॅझमॅट व टर्न टेबल लॅडर यांचा समावेश आहे. असेही रायकर म्हणाले.
कारागृहाच्या सुरक्षा यंत्रणेचे सविस्तर मूल्यांकन करण्याचे निर्देश
कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, कारागृहाच्या आवारात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची अनिवार्य तपासणी आणि सध्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा सर्वसमावेशक आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
सुरक्षेला प्राधान्य देण्याचे पर्यटकांना आवाहन
सध्याच्या पावसाळ्यात धबधब्यांना भेट देताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी जनतेला केले. मुसळधार पाऊस आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे अशी ठिकाणे धोकादायक बनू शकतात, त्यामुळे खबरदारीचे उपाय आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी पर्यटकांना त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
