Headlines

अमरावती-दर्यापूर मार्गावर एसटी बस मध्येच बंद पडली.:शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना उशीर, प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम हुकला




अमरावती-दर्यापूर मार्गावर भातकुलीमार्गे जाणाऱ्या एसटी बसमध्ये बिघाड झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचायला उशीर झाला. शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीहून सकाळी ७ वाजता दर्यापूरकडे निघालेली बस मार्गावरच बंद पडली. बसची स्थिती चांगली नसल्याने हा बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे भातकुली येथे पोहोचायला बसला विलंब झाला. या विलंबामुळे भातकुलीतून पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये वेळेत पोहोचता आले नाही. परिणामी, त्यांना शाळेतील प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी होता आले नाही, ज्यामुळे त्यांच्या पहिल्या दिवसाचा उत्साह मावळला. स्थानिक प्रवासी आणि विद्यार्थ्यांच्या मते, या मार्गावर नेहमीच जुन्या आणि नादुरुस्त बसेस पाठविल्या जातात. चांगल्या गाड्या या मार्गावर धावत नाहीत, त्यामुळे अशा घटना वारंवार घडतात. महामंडळाने किमान शाळेच्या पहिल्या दिवशी तरी योग्य बस पाठवायला हवी होती, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीची दखल घेऊन भविष्यात असे प्रसंग टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. ‘लालपरी’ ही गोरगरिबांची जीवनवाहिनी असल्याने महामंडळाने आपले कर्तव्य ओळखून चांगली सेवा द्यावी, असे त्यांचे म्हणणे आहे. नागरिकांनी असेही निदर्शनास आणले आहे की, पावसाळ्यात अनेकदा एसटी बसेस बंद पडतात आणि विद्यार्थ्यांना त्या ढकलण्याची वेळ येते. अशावेळी पावसाचे पाणी उडून विद्यार्थ्यांचे गणवेश खराब होतात. विद्यार्थ्यांची ही गैरसोय कोण दूर करणार आणि बडनेरा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत