Headlines

१ कोटी १३ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ८ जण ताब्यात


चंदगड  – चंदगड तालुक्यातील हाजगोळी-सरोळी गावादरम्यान एका शेतवडीत चालणाऱ्या पोल्ट्री फार्मच्या आडून सुरू असलेला एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स निर्मितीचा कारखाना अमली पदार्थविरोधी पथकाने उद्ध्वस्त केला आहे. अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स, पुणे यांच्या पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने आखलेल्या या मोहिमेत मुख्य आरोपी इरफान सलीम खान (रा. मिरारोड, ठाणे) आणि पोल्ट्री फार्म मालक पप्पू विठ्ठल मलतवाडकर यांच्यासह एकूण आठ संशयितांना ताब्यात घेतले आहे. यात तुडये येथील दोन, हाजगोळीतील एक आणि बेळगाव परिसरातील दोन जणांचा समावेश असून नयानगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साध्या वेशात तब्बल चार दिवस या परिसरावर बारीक लक्ष ठेवले होते. पोल्ट्री फार्ममधील रात्रीच्या वेळच्या संशयास्पद हालचाली, वाहनांची ये-जा आणि पुराव्यांची खात्री पटल्यानंतर रविवारी रात्री पथकाने अचानक छापा टाकला. रविवारी रात्री सुरू झालेली ही झाडाझडती सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत सलग सुरू होती.

या धडक कारवाईत सुमारे २०८ ग्रॅम तयार एमडी ड्रग्स, ७० लिटर द्रवरूप रसायन, रासायनिक पावडर, तसेच मिक्सिंग मोटर, डिजिटल थर्मामीटर, घनतामापक, टेस्ट ट्यूब्स, फिल्टर पेपर, स्पीड कंट्रोल रेग्युलेटर आणि काचेचे जार अशी अत्याधुनिक यंत्रसामग्री जप्त करण्यात आली आहे. या जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ कोटी १३ लाख ५१ हजार ४८० रुपये इतकी आहे.

घटनास्थळी कोल्हापूरहून फॉरेन्सिक पथकाच्या दोन गाड्या दाखल झाल्या असून त्यांनी जप्त रसायने व साहित्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. हाजगोळी हे गाव कर्नाटक सीमेवर असल्याने तयार केले जाणारे ड्रग्स महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांत पुरवले जात होते का, याचा सखोल तपास वरिष्ठ आयपीएस अधिकारी अधीक्षक एम. एम. मकानदार यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत