सिंधुदुर्ग : “मराठी भाषा विभाग” व “महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ” यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा” परीक्षेत श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल, वडाचापाटच्या विद्यार्थिनींनी जिल्हा व तालुकास्तरीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली.
मालवण तालुक्यातून ग्रामीण विभागात कुमारी वैदेही वामन लाड हिने प्रथम क्रमांक मिळविला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ग्रामीण विभागातून कुमारी सिया सचिन पाताडे हिने तृतीय क्रमांक मिळवून प्रशालेचे नाव उजळवले. कुमारी नेहा सतीश पालव या विद्यार्थिनीनेही उत्तम यश संपादन केले.
या सर्व विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा दिनांक 23 जुलै 2026 रोजी मायनाक भंडारी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे पार पडला. कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी मा.श्रीमती शुभांगी साठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे मान्यवर सदस्य तसेच माध्यमिक शिक्षण विभागाच्या श्रीमती तांबे मॅडम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती राजश्री सामंत, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थिनींना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रके व रोख रक्कम प्रदान करण्यात आली.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री प्रसाद कुबल यांनी विद्यार्थिनींच्या कष्टाचे कौतुक केले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. स्पर्धेसाठी प्रशालेच्या शिक्षिका प्रतिभा केळूसकर यांचे मार्गदर्शन लाभले.
