Headlines

‘विठू माऊली २०२६’ विशेषांकाचे आज पुण्यात भव्य प्रकाशन


पुणे – महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा, वारकरी संप्रदायाच्या अखंड भक्तीचा आणि आषाढी वारीच्या सांस्कृतिक वैभवाचा दस्तऐवज ठरणाऱ्या ‘तरुण भारत’च्या ‘विठू माऊली विशेषांक’चे आज (१० जुलै) पुण्यात भव्य प्रकाशन होत आहे. एरंडवणे येथील शकुंतला जगन्नाथ शेट्टी ऑडिटोरियममध्ये सायंकाळी ५ ते ८ या वेळेत मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी सुप्रसिद्ध गायक पंडित आनंद भाटे आणि मंजुषा कुलकर्णी-पाटील यांची भक्तिमय संगीत मैफल रंगणार आहे.

आषाढी वारी हा महाराष्ट्र, गोया आणि कर्नाटकासह संपूर्ण देशातील विठ्ठलभक्तांचा सर्वात मोठा आध्यात्मिक उत्सव मानला जातो. लाखो वारकरी, शेकडो दिंड्या आणि विविध संतांच्या पालख्या दरवर्षी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. सामाजिक समता, बंधुभाव आणि भक्तीचा संदेश देणाऱ्या या वारीची परंपरा अनेक शतकांपासून अखंडपणे सुरू आहे. या महान परंपरेचे विविध पैलू अभ्यासपूर्ण स्वरूपात वाचकांसमोर आणण्याच्या उद्देशाने ‘तरुण भारत संवाद’ ने गेल्या वर्षापासून ‘विठू माऊली’ विशेषांकाचा उपक्रम सुरू केला आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या विशेषांकात पंढरपुरातील मठ आणि धर्मशाळांचा इतिहास, परंपरा आणि सामाजिक योगदान यांची माहिती देण्यात आली होती. त्या अंकाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर यंदाचा विशेषांक ‘आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या विविध संतांच्या पालख्या या विषयाला वाहण्यात आला आहे.

या विशेषांकात महाराष्ट्रातील प्रमुख संतांच्या पालख्यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातील इतर संतांच्या पालख्या, गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राबाहेरील भागांतून पंढरपूरकडे जाणाऱ्या पालख्यांचा इतिहास, त्यांची वैशिष्ट्ये, परंपरा, मार्गक्रमण, तसेच त्यांच्यासोबत चालणाऱ्या दिंड्यांची माहितीही समाविष्ट करण्यात आली आहे. वारीचा सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा जतन करणारा हा अंक संशोधक, अभ्यासक, वारकरी आणि सर्वसामान्य वाचकांसाठी महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ ठरणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती

आजच्या प्रकाशन सोहळ्यास केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी, तरुण भारत-लोकमान्य समूहाचे प्रमुख डॉ. किरण ठाकूर, ज्येष्ठ नेते आणि संत साहित्य अभ्यासक उल्हासदादा पवार, संत तुकाराम महाराज देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. माणिक महाराज मोरे, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर, संत सोपानदेव संस्थानचे विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. त्रिगुण महाराज गोसावी, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, प्रसिद्ध गायक अवधूत गांधी, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, ‘तरुण भारत’चे विभागीय संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पालख्या पुणे मुक्कामी असताना प्रकाशन

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे मुक्कामी असतानाच या अंकाचे प्रकाशन होत आहे. त्यानंतर आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेही या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळी वारकरी परंपरेचा गौरव करणाऱ्या भक्तिमय संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सुप्रसिद्ध गायक पंडित आनंद भाटे आणि गायिका मंजुषा कुलकर्णी- पाटील अभंग, संतवाणी आणि विठ्ठलभक्तीने ओतप्रोत रचना सादर करणार आहेत.

संग्रही ठेवावा असा दस्तऐवज

महाराष्ट्र, गोवा, बेळगाव, उत्तर कर्नाटक, कोकण, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि दक्षिण महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत हा विशेषांक पोहोचविण्यात येणार आहे. वारकरी संप्रदायाचा इतिहास, पालखी परंपरेचे वैभव आणि विठ्ठलभक्तीचा अमूल्य ठेवा जतन करणारा हा विशेषांक ‘विठू माऊली २०२६’ संग्रही ठेवावा असा दस्तऐवज ठरणार आहे. अंकासाठी ९९७५४०१००९ या नंबरवर संपर्क साधावा.

प्रवेश विनामूल्य

पुण्याच्या एरंडवणे येथील शकुंतला जगन्नाथ शेट्टी ऑडिटोरियममध्ये सायंकाळी ५ ते ८ या वेळेत हा सोहळा संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून कार्यक्रमासाठी प्रवेशिका आवश्यक आहे. प्रवेशिका लोकमान्य सोसायटीच्या शाखामध्ये उपलब्ध असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत