वृत्तसंस्था/मुंबई
पॅकेजिंग मशिन बनविणाऱ्या लोहिया कॉर्प या कंपनीचा समभाग बीएसई आणि एनएसईवर शेअर बाजारात दमदारपणे सुचिबद्ध झाला आहे. जवळपास 8 टक्क्यांच्या तेजीसोबत हा समभाग बाजारात खुला झाला. कंपनीने आयपीओची इशु किंमत 425 रुपये इतकी ठेवली होती. या तुलनेमध्ये कंपनीचा समभाग 8 टक्के तेजीसोबत सुचिबद्ध झाला. एनएसईवर हा समभाग 460 रुपये व बीएसईवर 461 रुपयांवर खुला झाला. सुचिबद्ध झाल्यानंतर समभागाची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली. एनएसईवर हा समभाग व्यवहारादरम्यान 507 रुपयांवर पोहोचला होता. बीएसईवर सुद्धा या उच्चांकी भावावर समभाग पोहोचला होता.
इशु किंमतीपेक्षा हा समभाग जवळपास 18 टक्के वाढला होता. लोहिया कॉर्पचा आयपीओ 23 ते 27 जुलै या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुला होता. कंपनीने या आयपीओ मार्फत अंदाजे 1101 कोटी रुपये जमविले आहेत. सदरचा आयपीओ हा पूर्णपणे ऑफर फॉर सेल अंतर्गत सादर करण्यात आला होता. आयपीओला एकंदर 7.26 पट सबस्क्रीप्शन मिळाले. पात्रताधारक, संस्थात्मक गुंतवणूकदार यांनी 9.11 पट, बिगर संस्थांत्मक गुंतवणूकदार यांनी 6.82 पट आणि रिटेल गुंतवणूकदारांनी 2.78 पट आयपीओ सबस्क्रायब केला होता. संस्थात्मक गुंतवणूकदारांचा या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला.
