![]()
अमरावती शहरातील राजकमल चौकात, महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका मॅनहोलचा खड्डा गेल्या १५ दिवसांपासून उघडा आहे. यामुळे या वर्दळीच्या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या उघड्या खड्ड्याबाबत माजी नगरसेवक बबनराव रडके यांनी पालिकेच्या बांधकाम विभागासह इतर दोन विभागप्रमुख आणि काही दुय्यम अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र, दररोज या मार्गावरून ये-जा करणाऱ्या या अधिकाऱ्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. राजकमल चौक हा शहराचा मुख्य व्यापारी आणि वाहतुकीचा केंद्रबिंदू आहे. दररोज हजारो पादचारी आणि वाहनधारक या भागातून ये-जा करतात. उघड्या मॅनहोलमुळे रात्रीच्या वेळी किंवा गर्दीच्या वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. अलीकडेच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान किमान डझनभर तरुणांना या खड्ड्यामुळे त्रास सहन करावा लागला. मनपा प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे अमरावतीकर त्रस्त झाले आहेत. काही जागरूक दुकानदारांनी पुढाकार घेऊन त्या खड्ड्याभोवती पेव्हिंग ब्लॉक लावून तो नागरिकांना सहज दिसेल अशी तात्पुरती व्यवस्था केली आहे. हा खड्डा म्हणजे एक मॅनहोल असून, त्याद्वारे वाहणारी नाली अनेक ठिकाणी अडकल्याने दुर्गंधी आणि सांडपाण्याच्या गळतीचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या जीवघेण्या खड्ड्याबाबत स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे १५ दिवस उलटूनही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. अपघात घडल्यानंतरच मनपा प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
Source link
राजकमल चौकातील खड्डा 15 दिवसांपासून उघडा:मनपा मुख्यालयाजवळ दुर्लक्ष; अपघाताची भीती
