गणेशोत्सव किंवा सुट्ट्यांमध्ये मुंबईकर जेव्हा कोकणात किंवा गावी जातात, तेव्हा घाईघाईत घरातील फ्रीज थेट बंद करून निघून जातात. मात्र, तांत्रिक माहिती नसल्यामुळे अवघ्या 24 तासांत फ्रीजमध्ये दमट वातावरणामुळे बुरशी आणि हट्टी दुर्गंधी निर्माण होते, जी गावरून परत आल्यावर साफ करणे अत्यंत कठीण आणि त्रासाचे ठरते. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

पावसाळ्यातील सुट्ट्या असोत, गणेशोत्सव असो किंवा उन्हाळी सुट्ट्या, मुंबईकरांचे पाय कोकणाकडे वळले की घराला कुलूप लागते. अशा वेळी घर बंद करताना लाईट बिल वाचवण्यासाठी किंवा सुरक्षेचा उपाय म्हणून अनेक जण घरातील फ्रीज थेट ‘बंद’ (Switch Off) करतात आणि निघून जातात. पण तुम्हाला माहीत आहे का? बऱ्याच दिवसांसाठी बाहेर जाताना फ्रीज कधी, कसा आणि कोणत्या परिस्थितीत बंद करावा, याचे काही तांत्रिक नियम आहेत. माहितीच्या अभावामुळे अनेकांचे फ्रीज खराब होतात, तर काही वेळा घरात दुर्गंधी आणि जंतूंचा प्रादुर्भाव होतो.
चूक कुठे होते? थेट बंद का करू नये?
अनेक मुंबईकर घाईघाईत ट्रेन किंवा बस पकडण्याच्या नादात फ्रीजमधील सामान तसेच ठेवतात आणि मुख्य बटण बंद करून निघून जातात. यामुळे फ्रीजमधील बर्फ वितळू लागतो. फ्रीज बंद झाल्यामुळे आतील तापमान वाढते आणि दमट वातावरणामुळे अवघ्या 24 तासांत बॅक्टेरिया आणि बुरशी तयार होते. तुम्ही जेव्हा 4-5 दिवसांनी गावरून परत येता, तेव्हा फ्रीज उघडताच अत्यंत घाणेरडी दुर्गंधी येते. ही बुरशी इतकी हट्टी असते की ती साफ करताना नाकी नऊ येतात.
3ते 5 दिवसांसाठी बाहेर जात असाल तर…
तुम्ही कोकणात केवळ 3 ते 5 दिवसांच्या छोट्या ट्रिपसाठी जात असाल, तर फ्रीज पूर्णपणे बंद करण्याची अजिबात गरज नाही. तापमान बदला: फ्रीज बंद करण्याऐवजी त्याचा कुलिंग मोड ‘किमान’ (Minimum किंवा Low) वर सेट करा. नाशवंत वस्तू काढा: दूध, उरलेली भाजी किंवा पीठ यांसारख्या लवकर खराब होणाऱ्या वस्तू फ्रीजमधून बाहेर काढा किंवा संपवून टाका. फायदे: यामुळे विजेचा वापर नगण्य होतो, आतील बर्फ वितळून पाणी बाहेर येत नाही आणि फ्रीजमध्ये दुर्गंधी सुटत नाही.
आठवडा किंवा महिनाभरासाठी बाहेर जाताना काय करावे?
तुम्ही गणेशोत्सवासाठी किंवा गावी 10 दिवस किंवा महिन्याभरासाठी जाणार असाल, तर मात्र फ्रीज चालू ठेवणे मूर्खपणाचे ठरेल. अशा वेळी खालील स्टेप्स फॉलो करा: फ्रीज पूर्णपणे रिकामा करा: फ्रीज आणि फ्रिझरमधील प्रत्येक वस्तू (मसाले, सॉसच्या बाटल्या, बर्फ) बाहेर काढा. डीफ्रॉस्ट करा: निघण्याच्या किमान 12 तास आधी फ्रीज बंद करा आणि बर्फ पूर्ण वितळू द्या. वितळलेले पाणी व्यवस्थित पुसून घ्या. स्वच्छता करा: बेकिंग सोडा किंवा लिंबाच्यापाण्याचा वापर करूनफ्रीज आतून सुती कापडाने स्वच्छ पुसून कोरडा करा. दरवाजा उघडा ठेवा (सर्वात महत्त्वाचे): फ्रीज बंद केल्यानंतर त्याचा दरवाजा पूर्णपणे बंद करू नका. दरवाजा किंचित उघडा ठेवण्यासाठी त्यामध्ये एखादा वर्तमानपत्राचा बोळा किंवा कापड अडकवून ठेवा. यामुळे हवा खेळती राहील आणि फ्रीजला बुरशी किंवा कुबट वास येणार नाही.
पॉवर फ्लक्चुएशन आणि सुरक्षेचा धोका
कोकणात किंवा ग्रामीण भागात अनेकदा वीज जाते-येते. तुम्ही मुंबईत घर बंद करून गेल्यावर जर मागे वीज पुरवठ्यात बिघाड झाला किंवा हाय व्होल्टेज आले, तर फ्रीजचे कॉम्प्रेसर जळण्याचा धोका असतो. म्हणूनच, जर तुमच्या घरात ‘स्टॅबिलायझर’ नसेल, तर जास्त दिवसांसाठी बाहेर जाताना फ्रीज बंद करणेच सुरक्षित ठरते.
‘हॉलिडे मोड’चा वापर करा
आजकालच्या अनेक मॉडर्न आणि इन्व्हर्टर फ्रीजमध्ये ‘हॉलिडे मोड’ किंवा ‘इको मोड’ दिलेला असतो. जर तुमच्याकडे असा स्मार्ट फ्रीज असेल, तर गावाला जाताना हा मोड ऑन करा. यामुळे फ्रिझर चालू राहतो आणि खालचा फ्रीजचा कप्पा कमी विजेवर चालतो, ज्यामुळे बुरशी येत नाही.
पुढच्या वेळी कोकणाची बॅग भरताना फ्रीजच्या बटणाकडे डोळे झाकून पाहू नका. ट्रिपच्या कालावधीनुसार योग्य निर्णय घ्या आणि तुमचा महागडा फ्रीज सुरक्षित ठेवा.

