![]()
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. याच वादग्रस्त प्रकरणावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ हा नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र, या चित्रपटावरून आता नवा राजकीय आणि कायदेशीर वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी या चित्रपटाच्या निर्मात्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा थेट इशारा दिला आहे. या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद या रूपाली चाकणकर यांच्यावर आधारित व्यक्तिरेखा साकारणार असल्याची माहिती आहे. कथित अशोक खरात प्रकरणात अनेक राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांची नावे समोर आली होती, ज्यात रूपाली चाकणकर यांच्यावर आर्थिक संबंधांचे आरोपही झाले होते. याच वादामुळे त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागल्याची चर्चा होती. आता याच घटनाक्रमावर चित्रपट येत असल्याने चाकणकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. चित्रपटातील भूमिकेवरून वाद आणि चाकणकरांचा आक्षेप यावर पहिली प्रतिक्रिया देताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, “जो कथित चित्रपट येत आहे, तो विषय अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. चित्रपटात एखाद्या जिवंत व्यक्तीचे पात्र साकारताना संबंधित व्यक्तीची रीतसर परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक असते. या चित्रपटासाठी माझी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे मी निर्मात्यांविरोधात नक्कीच कायदेशीर पावले उचलणार आहे.” विरोधकांना आणि युट्यूब चॅनेल्सना कायदेशीर दणका खरात प्रकरणावरून आपल्यावर आणि कुटुंबीयांवर झालेल्या आरोपांचे खंडन करताना रूपाली चाकणकर यांनी राजकीय विरोधकांवरही कायदेशीर हत्यार उपसले आहे. “या प्रकरणात माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर वाटेल तसे निराधार आरोप करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात असलेल्या माझ्या मुलालाही जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आले,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. चौघींना हायकोर्टाची नोटीस रूपाली चाकणकर म्हणाल्या, “आशा मिरगे यांनी केलेल्या आरोपांनंतर मी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती, पण त्यांनी ती स्वीकारली नाही. त्यानंतर मी थेट दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता आशा मिरगे यांच्यासह रूपाली ठोंबरे, सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया यांनाही न्यायालयाच्या नोटिसा गेलेल्या आहेत.” येत्या १० जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणी होणाऱ्या सुनावणीला आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याव्यतिरिक्त, बदनामीकारक मजकूर आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्या काही विशिष्ट युट्यूब चॅनेल्सविरोधातही न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
Source link
'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' चित्रपटावरून रूपाली चाकणकर संतप्त:अभिनेत्री दिपाली सय्यदसह दिग्दर्शकांविरोधात नोटीस काढणार
