मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील मर्डे ग्रामपंचायतीचे नाव ‘मसुरे-मर्डे’ करण्यात यावे, अशी मागणी राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे कणकवली येथे मसुरे ग्रामविकास संघ, मुंबईचे अध्यक्ष डॉ. दीपक परब यांनी निवेदनाद्वारे केली. याबाबत ग्रामविकास विभागाकडून सकारात्मक निर्णय होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्याची माहिती डॉ. दीपक परब यांनी दिली.
निवेदनात डॉ. परब यांनी म्हटले आहे की, मसुरे-डांगमोडे ग्रामपंचायतीचे विभाजन झाल्यानंतर शासन स्तरावर या ग्रामपंचायतीचे नाव ‘ग्रामपंचायत मर्डे’ असे करण्यात आले. मात्र, यासाठी स्थानिक ग्रामस्थांकडून कोणतीही मागणी करण्यात आली नव्हती. उलट, ग्रामपंचायतीच्या विभाजनावेळी मूळ ग्रामपंचायतीचे नाव बदलू नये, असा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला होता. असे असतानाही प्रशासकीय निष्काळजीपणामुळे ‘मसुरे’ हे ऐतिहासिक नाव नष्ट झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे.
यापूर्वी कांदळगाव ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन ‘महान’ ही नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात आली, तरी मूळ कांदळगाव या नावात कोणताही बदल करण्यात आला नाही. तसेच कोळंब ग्रामपंचायतीबाबतही अशीच भूमिका घेण्यात आली होती. त्यामुळे केवळ मसुरे गावाच्या बाबतीत नाव बदलून अन्याय करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाच्या या तांत्रिक चुकीचा फटका मसुरे ग्रामस्थांना बसत असून विविध शासकीय कामांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत.
कोकण विभागीय आयुक्त आणि जिल्हा प्रशासनाकडून या मागणीला कोणताही विरोध नसून, आता ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा होणे आवश्यक असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. ‘मसुरे’ हे नाव ऐतिहासिक वारसा, अस्मिता आणि गावकऱ्यांच्या भावनिक नात्याशी जोडलेले आहे. इंग्रजकालात या गावाला ‘मशहूरा’ या नावाने ओळखले जात असे. जलमार्गावरील व्यापारामुळे गावाची ओळख ‘मशहूर’ झाली आणि त्याचाच अपभ्रंश होऊन ‘मसुरे’ हे नाव प्रचलित झाल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे हे ऐतिहासिक नाव कायम ठेवण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.
यावेळी परब सहकारी पतपेढीच्या वतीने अध्यक्ष डॉ. दीपक परब यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचा सत्कार केला. या प्रसंगी भाई परब, शैलेंद्र परब आणि सुजित परब उपस्थित होते. तसेच पालकमंत्री राणे यांनी परब सहकारी पतपेढीच्या विविध उपक्रमांची, कर्जवाटप व कर्जवसुली धोरणाची, सदस्यसंख्येची, कर्जवसुलीच्या प्रमाणाची, शाखांची आणि एकूण नफ्याची माहिती घेतली. कर्जवसुलीचे प्रमाण वाढविण्याचा सल्ला देत पतपेढीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्याची माहिती डॉ. दीपक परब यांनी दिली.
