श्रावण आला की सण-उत्सवांची लगबग सुरू होते आणि मंगळागौरीचा उत्साहही वाढतो.यंदाच्या मंगळागौरीसाठी अभिनेत्री रेश्मा शिंदेच्या मराठमोळ्या लूकमधून स्टायलिश आयडिया घेता येतील.पैठणी नऊवारी, नाजूक ब्लाऊज आणि पारंपरिक दागिन्यांच्या संगमातून तुम्हीही खास लूक साकारू शकता.

पैठणी नऊवारीला द्या पहिली पसंती
मंगळागौरीच्या दिवशी पारंपरिक नऊवारी साडीला विशेष महत्त्व असते. त्यात पैठणीची निवड केली तर संपूर्ण लूकला वेगळाच राजेशाही थाट येतो. पैठणीची ओळखच तिच्या उठावदार रंगसंगती, जरीचा काठ आणि आकर्षक पदरामुळे आहे. महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेत पैठणीला असलेले महत्त्वही वेगळे आहे. मंगळागौरीसाठी हिरव्या रंगाची पैठणी नऊवारी निवडली तर ती सणाच्या वातावरणाला अगदी साजेशी दिसेल. त्यावर गुलाबी, जांभळा किंवा मॅजेंटा रंगाचा ब्लाऊज घातल्यास रंगांचा सुंदर कॉन्ट्रास्ट तयार होऊ शकतो.
ब्लाऊज साधा असला तरी चालेल, पण डिझाईन खास हवं!
भरजरी पैठणीसोबत ब्लाऊज खूप हेवी असण्याची गरज नाही. उलट साडीचा काठ आणि पदर उठून दिसण्यासाठी ब्लाऊजचे डिझाईन नाजूक ठेवले तर लूक अधिक खुलतो.यासाठी छोट्या बाह्यांचा ब्लाऊज, पफ स्लीव्ह, कोपरापर्यंतच्या बाह्या किंवा आकर्षक बॅक डिझाईन असे पर्याय वापरता येतील.ब्लाऊजच्या गळ्याभोवती पैठणीच्या काठासारखी नक्षी किंवा अगदी छोटंसं जरीकाम करून घेता येईल. तुम्हाला आधुनिक टच हवा असेल तर बोट नेक किंवा हलका स्क्वेअर नेकही छान दिसू शकतो. मात्र मंगळागौरीसारख्या पारंपरिक सणासाठी ब्लाऊजच्या डिझाईनमध्ये मराठमोळेपणा टिकवला तर तो अधिक खुलतो.
नथीपासून ठुशीपर्यंत; दागिने निवडताना हे लक्षात ठेवा
नऊवारी साडी नेसूनही दागिने योग्य नसतील तर लूक काहीसा अपूर्ण वाटू शकतो. मंगळागौरीसाठी मात्र दागिन्यांचा साज करताना प्रत्येक गोष्ट एकत्रित दिसतेय का, याकडे लक्ष द्या.नाकात पारंपरिक नथ, गळ्यात ठुशी किंवा तन्मणी, कानात कुड्या आणि हातात हिरव्या बांगड्या असा साज करता येईल. पैठणीचा रंग लक्षात घेऊन बांगड्यांची निवड केल्यास लूक अधिक आकर्षक दिसेल.
केसांचा अंबाडा आणि मोगऱ्याचा गजरा
मंगळागौरीचा लूक म्हटलं की मोगऱ्याचा गजरा आठवतोच. नऊवारीसोबत केसांचा नीटनेटका अंबाडा आणि त्याभोवती गुंफलेला गजरा तुमच्या संपूर्ण लूकला पारंपरिक पूर्णत्व देऊ शकतो.जर चेहरा लांबट असेल तर अंबाडा थोडा खाली ठेवता येईल. गोल चेहऱ्यासाठी अंबाडा किंचित उंच ठेवून पुढच्या बाजूला हलके केस सोडले तर चेहऱ्याला चांगला आकार मिळतो.
कुंकू आणि नथ लूकला देतील खास ओळख
मंगळागौरीच्या दिवशी कपाळावर उठावदार कुंकू लावल्यास नऊवारीचा लूक आणखी सुंदर दिसतो. त्यासोबत नथ असल्यामुळे चेहऱ्यावरचा मराठमोळा अंदाज लगेच जाणवतो.मेकअप मात्र फार जड करण्याची गरज नाही. हलका बेस, थोडासा ब्लश, काजळ, आयलाइनर आणि गुलाबी किंवा लालसर लिपस्टिक एवढाच मेकअप पुरेसा आहे. साडी आणि दागिने आधीच लक्ष वेधून घेणारे असल्याने मेकअपमध्ये साधेपणा ठेवला तर चेहऱ्याचे सौंदर्य अधिक उठून दिसेल
फक्त सुंदर दिसणं नाही, कम्फर्टही महत्त्वाचा
मंगळागौरीच्या रात्री फक्त पूजा नसते. पूजा झाल्यानंतर झिम्मा, फुगडी आणि इतर पारंपरिक खेळांचा आनंद घेतला जातो. त्यामुळे साडी आणि ब्लाऊज जितके सुंदर तितकेच आरामदायी असणेही महत्त्वाचे आहे.नऊवारी नीट नेसलेली आणि आवश्यक ठिकाणी व्यवस्थित पिनअप केलेली असेल तर सतत साडी सांभाळण्याची चिंता राहत नाही. ब्लाऊजचे फिटिंगही आरामदायी असावे. विशेषतः हातांची जास्त हालचाल होणार असल्याने खांद्यावर किंवा बाह्यांमध्ये अडचण निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या.

