सावंतवाडी वार्ताहर : प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘सेवा अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रलंबित विकासकामे, विविध समस्या, शासकीय कामे व मूलभूत सुविधांबाबतची निवेदने स्वीकारण्यात येणार आहेत. सोमवार, दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत काझी शहाबुद्दीन सभागृह, सावंतवाडी येथे हे अभियान होणार आहे.
या कार्यक्रमास आमदार श्री. प्रमोद जठार प्रमुख उपस्थित असणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या ज्या समस्या अथवा विकासकामे प्रलंबित आहेत, त्याबाबतची माहिती व निवेदने या अभियानाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहेत. संबंधित गावातील नागरिकांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या प्रश्नांचा प्रभावीपणे पाठपुरावा व्हावा, यासाठी त्या-त्या गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या सेवा अभियानास उपस्थित राहावे.
जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत यांनी केलेल्या आवाहनानुसार, सर्व मंडल अध्यक्ष, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांना या अभियानाची माहिती देऊन त्यांच्या प्रलंबित प्रश्नांसह दि. २४ ऑगस्ट रोजी काझी शहाबुद्दीन सभागृह, सावंतवाडी येथे उपस्थित राहण्यासाठी आवाहन करावे, असे भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी केले आहे.
