Headlines

पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ:दोन घरफोड्यांमध्ये 17 लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास




पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी 17 लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केला आहे. दत्तवाडीतील रक्षालेखा सोसायटी आणि वडगाव बुद्रुक भागातील एका सोसायटीत या घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. यापैकी एका घटनेत, प्रभात रस्त्यावर राहणाऱ्या एका व्यक्तीने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, दत्तवाडीतील रक्षालेखा सोसायटीमधील त्यांच्या बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी रोकड आणि सोन्याचे दागिने असा सुमारे पावणेअकरा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलिस उपनिरीक्षक किरण पवार या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसऱ्या घटनेत, वडगाव बुद्रुक भागातील रघुनंदन हॉल परिसरातील एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातून पाच लाख 92 हजार रुपयांचे दागिने लंपास केले. या प्रकरणी नऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे ॲक्वारा प्राईड सोसायटीत राहतात. पोलिस उपनिरीक्षक एन. शिरकुळे पुढील तपास करत आहेत. दरम्यान, हडपसरमधील वैदुवाडी परिसरात एका पादचारी तरुणाला मारहाण करून त्याच्या गळ्यातील 45 हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटनाही घडली आहे. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेंद्रकुमार सीताराम महंतो (वय 25, रा. वैदुवाडी, हडपसर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 13 ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास महंतो वैदुवाडी परिसरातून जात असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांना अडवून मारहाण केली आणि त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. सहायक पोलिस निरीक्षक जाधव या घटनेचा तपास करत आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत