Slum Rehabilitation: पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विकास कामं वेगाने सुरू आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन योजनांवर भर देऊन येत्या तीन वर्षांत घरं उभारण्याची संकल्पना आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुस्तफा आतार, पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना (एसआरए) वेग आला असून, येत्या तीन वर्षांत ५१ हजार पुनर्वसन घरे उभारण्याचे उद्दिष्ट प्राधिकरणाने निश्चित केले आहे. सध्या दोन्ही शहरांत ८७ योजनांमध्ये प्रत्यक्ष बांधकाम सुरू आहे. मंजुरी घेऊनही वर्षानुवर्षे कामे न सुरू करणाऱ्या १० बांधकाम व्यावसायिकांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पुणे शहरातील ४८६ झोपडपट्ट्यांमध्ये सुमारे १ लाख ६५ हजार, तर पिंपरी-चिंचवडमधील ७१ झोपडपट्ट्यांमध्ये ३५ हजारांहून अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. या नागरिकांना मोफत, सुविधांयुक्त घरे देण्यासाठी ‘एसआरए’ योजना राबविण्यात येत आहेत.
प्रकल्पांना चालना
राज्य सरकारने गेल्या वर्षी नियमांमध्ये केलेल्या बदलांमुळे अनेक रखडलेल्या प्रकल्पांना चालना मिळाली आहे. ‘एसआरए’कडे आतापर्यंत ३७८ योजना दाखल झाल्या असून, त्यापैकी ७१ योजना पूर्ण झाल्या आहेत. या योजनांमधून १३ हजारांहून अधिक सदनिका बांधून सुमारे ६० हजार नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. सध्या कार्यान्वित १८० योजनांमधून टप्प्याटप्प्याने ५१ हजार घरे उपलब्ध होणार आहेत. त्यामध्ये ८७ सुरू असलेल्या प्रकल्पांतूनच ३३ हजार ५४ घरे उभी राहणार आहेत. यातून झोपडपट्टीधारकांना पक्की घरे मिळणार असून, शहरांमधील बकालपणाही कमी होण्यास मदत मिळणार आहे.
सदाशिव पेठ, गणेश पेठ, लोहियानगर, पर्वती, दांडेकर पूल, वडारवाडी, कोथरूड, रामटेकडी, हडपसर आणि विश्रांतवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर ‘एसआरए’ची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी १६ मजली इमारती उभारल्या जात आहेत.
“पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या १८० ‘एसआरए’ योजना सुरू आहेत. त्यापैकी ८७ प्रकल्पांचे बांधकाम वेगाने सुरू असून, तीन वर्षांत सुमारे ५१ हजार घरे उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट आहे. रखडलेल्या प्रकल्पांबाबतही कठोर कारवाई केली जात आहे,” सतीशकुमार खडके, मुख्य कार्यकारी अधिकारी, एसआरए
दहा विकासकांवर कारवाई
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांतील काही रखडलेल्या प्रकल्पांवरही प्राधिकरणाने कठोर भूमिका घेतली आहे. मंजुरी मिळूनही तीन वर्षांपेक्षा अधिक काळ कामे सुरू न करणाऱ्या विकासकांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. लोहियानगर आणि हडपसर परिसरातील दहा विकासकांना नोटिसा देण्यात आल्या असून, समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास प्रकल्प इतर विकासकांकडे सोपविणार असल्याचे एसआरए नगररचना विभागाचे सहायक संचालक ऋषीकेश घाटे यांनी दिली.
प्रत्येक १०० व्यक्तींमागे एक बालवाडी; तसेच वेल्फेअर सेंटर.
विकासकाला प्रत्येक झोपडीमागे ४० ते ५० हजार रुपयांचे देखभाल शुल्क द्यावे लागणार.
सोसायटीसाठी उत्पन्नाची व्यवस्था अशा सुविधा करणे अनिवार्य.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा