Sharmila Dhankar Gold in Commonwealth Games : स्कॉटस्टून स्टेडियममध्ये खांद्यावर तिरंगा आणि गळ्यात लखलखणारे राष्ट्रकुल सुवर्णपदक हाती घेतलेल्या शर्मिला धनखड हिच्या चेहऱ्यावर अभिमानाचे हसू होते. सोमवारी मध्यरात्री झालेल्या पॅरा गोळाफेक एफ ५७ क्रीडा प्रकारात तिने ९.८१ मीटरची फेक करत सुवर्णकमाई केली. अशी कामगिरी करत ४० वर्षीय हरयाणवी शर्मिलाने इतिहास घडवला.

शर्मिलाचा जन्म हरियाणातील छित्रोली गावातला. दोन वर्षांची असताना तिच्या डाव्या पायाला पोलिओ झाला. वयाच्या १८व्या वर्षीच पालकांनी शर्मिलाचे लग्न लावून दिले. अन् त्यानंतर तिने अनेक वर्षे हुंड्यासाठी अतिशय कष्टदायक घरगुती हिंसाचार सहन केला. त्यातच दोन मुलींचा जन्म झाल्यावर हा छळ जास्तच वाढला. हा अपमान आणि त्रास सहन करणे अशक्य झाल्यावर शर्मिला माहेरी परतली. उदर निर्वाहासाठी शर्मिलाने घरोघरी घरकाम करण्यास सुरुवात केली. अजित सिंग याच्याशी दुसरा विवाह झाल्यानंतर तिच्या आयुष्याला सकारात्मक वळण लाभले. अजितनेच शर्मिलाला पॅरा अॅथलेटिक्सची ओळख करून दिली. त्यानेच २०२०मध्ये शर्मिलाला प्रशिक्षक टेक चंद यांच्याकडे मार्गदर्शनासाठी पाठवले.
Commonwealth Games 2026 : दीडशे रुपये रोजंदारी, ते राष्ट्रकुल रौप्य… सायकलवरून रोजचा 40 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या ऋषिकांत सिंगची संघर्षगाथा
वर्षभरात शर्मिला राष्ट्रीय विजेती झाली. पॅरा क्रीडा स्पर्धेतील एफ ५७या क्रीडा प्रकारांत तिने लौकिक मिळवला. ग्लासगोआधी शर्मिलाने फड़झा आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. २०२२च्या बर्मिंगहॅम पॅरा राष्ट्रकुलमध्ये शर्मिलाने राष्ट्रीय विक्रम केला, पण तिचे पदक थोडक्यात हुकले. त्यानंतर आशियाई पैरा क्रीडा स्पर्धा आणि जागतिक पैरा अजिंक्यपद स्पर्धेतही शर्मिलाचा सूर लागला नाही. मात्र खचणे शर्मिलाच्या स्वभावातच नाही. ग्लासगो राष्ट्रकुल तिची वाट बघत होते. इथली संधी शर्मिलाने दोन्ही हातांनी स्वीकारली.
Mirabai Chanu : ‘वेटलिफ्टिंग क्वीन’ने मुकुट राखला, मीराबाई चानूकडून राष्ट्रकुल सुवर्णपदकाची हॅटट्रिक
प्रतिकूल परिस्थिती
- तीन बहिणींमध्ये शर्मिला दुसरी. अन् एक भाऊ
- बिकट आर्थिक परिस्थिती अन् वैद्यकीय सुविधांबाबत अज्ञानामुळे वयाच्या दुसऱ्यावर्षी पोलिओग्रस्त
- अभ्यासात हुशार अन् क्रीडाक्षेत्राची ओढ असल्याने पोलिस दलात योगदान देण्याचे स्वप्न होते
- पोलिओ, प्रतिकूल परिस्थितीमुळे हे स्वप्न अपूर्ण. दहावी झाल्यानंतर पालकांनी लग्न लावून दिले
- पहिल्या पतीकडून घरगुती हिंसाचारास बळी. मानसिक, शारीरिक छळ करून दोन मुलींसह घराबाहेर काढले
सकारात्मक वळण
- माहेरी परतल्यावर दोन लेकी, आई-वडील आणि स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी घरकाम, धुणी-भांडी केली
- दुसऱ्या विवाहानंतर पती अजित सिंगमुळे खेळाडू म्हणून कारकिर्दीला सुरुवात
- वर्षभरातच राष्ट्रीय पॅरा स्पर्धांमधून चमक अन् मग आंतरराष्ट्रीय स्तरावर
- सरकारी नोकरीची अपेक्षा
- राष्ट्रकुलमधील पदक आपल्याला सरकारी नोकरी मिळवून देईल, असा विश्वास शर्मिलाने स्पर्धेला रवाना होण्याआधी व्यक्त केला होता. तिचा पती अन् कुटुंबीय शर्मिलाच्या क्रीडा कारकिर्दीसाठी बराच त्याग करत आहेत.

