Headlines

‘देशाने महान फायटर गमावला’; क्रीडा मंत्री भावुक, 38 वर्षीय वर्ल्ड चॅम्पियनचा धक्कादायक शेवट, काय घडलं?


Zolani Tete shot dead : कारमध्ये असताना दोन अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला. त्यामुळे सोबत असलेली महिलाही गोळीबारात गंभीर जखमी झाली आहे. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

zolani tete murder case south africa boxer shot dead
११ सेकंदात भल्याभल्यांना ‘नॉकआऊट’ करणारा चॅम्पियन काळाच्या पडद्याआड (AI Generated Photo)(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : क्रीडा विश्वातून अशी एक बातमी समोर आली आहे, जिने सगळ्यांचाच थरकाप उडवला आहे. रिंगमध्ये भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या एका माजी वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सरची अत्यंत निर्घृणपणे आणि प्लॅनिंग करून हत्या करण्यात आली आहे. रिंगमध्ये ११ सेकंदात प्रतिस्पर्ध्याला आस्मान दाखवणाऱ्या या चॅम्पियनवर घराबाहेरच मृत्यूने असा घाला घातला की त्याला सावरायला एक सेकंदही मिळाला नाही.

काळ घराबाहेरच दबा धरून बसला होता…

दक्षिण आफ्रिकेचा माजी वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर जोलानी टेटे (Zolani Tete) याचा हा रक्तरंजित शेवट झाला आहे. २१ ऑगस्टची ती रात्र. अवघ्या ३८ वर्षांचा जोलानी आपल्या कारने पूर्व केपमधील मदंतसाने इथल्या घरी पोहोचला. तो घराबाहेर कारमध्ये बसून गेट उघडण्याची वाट पाहत होता. पण त्याला कुठे ठाऊक होतं की मृत्यू आधीच त्याच्या घराबाहेर दबा धरून बसलाय. अचानक अंधारातून मास्क लावलेले दोन मारेकरी कारजवळ आले आणि त्यांनी जोलानीवर गोळ्यांची बरसात सुरू केली. या भ्याड आणि अचानक झालेल्या हल्ल्यात जोलानीचा जागीच मृत्यू झाला.

सोबतची महिला गंभीर

त्याच्या शेजारी बसलेली एक महिलाही या गोळीबारात गंभीर जखमी झाली असून, ती सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. गोळीबारानंतर मारेकरी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले.

Maharashtra TimesDuleep Trophy 2026-27 : एकाला स्वतःला सिद्ध करायचंय, दुसऱ्याला टीम इंडियात परतायचंय; दुलीप ट्रॉफीत कोण दाखवणार दम?

११ सेकंदांचा तो ‘रेकॉर्ड’ आणि दहशत

‘लास्ट बॉर्न’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या जोलानीची बॉक्सिंग रिंगमध्ये एक वेगळीच दहशत होती. २००७ आणि २००८ मध्ये WBF फ्लायवेट आणि २०१७ व २०१९ मध्ये WBO बॅंटमवेट वर्ल्ड टायटलवर त्याने आपलं नाव कोरलं होतं. २०१७ मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेच्याच सिबोनिसो गोन्या याला अवघ्या ११ सेकंदांत ‘नॉकआऊट’ करत इतिहास रचला होता. वर्ल्ड टायटलच्या इतिहासातील हा सर्वात वेगवान नॉकआऊट मानला जातो. हा विक्रम आजही अबाधित आहे.

अपूर्ण राहिलं कमबॅक

जोलानीच्या करिअरला २०२२ मध्ये ग्रहण लागलं होतं. स्टॅनोजोलॉल (Stanozolol) या उत्तेजक द्रव्याच्या सेवनामुळे त्याच्यावर ४ वर्षांची बंदी घालण्यात आली होती. विशेष म्हणजे, २९ जुलै २०२६ रोजी त्याची ही बंदी संपली होती. तो पुन्हा एकदा रिंगमध्ये उतरण्यासाठी आणि दमदार ‘कमबॅक’ करण्यासाठी घाम गाळत होता. पण, रिंगमध्ये उतरण्याआधीच अज्ञात हल्लेखोरांनी त्याचा कायमचा गेम केला.

Maharashtra TimesAUS vs BAN : बांगलादेशच्या खेळाडूचा रडीचा डाव, कॅच पकडतानाच मध्येच आला, पण कांगारूंनी पुढच्या ओव्हरमध्ये जिरवली

या घटनेमुळे दक्षिण आफ्रिकेसह संपूर्ण क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. दक्षिण आफ्रिकेचे क्रीडा मंत्री गेटन मॅकेंजी यांनीही “देशाने आपला एक महान फायटर गमावला,” अशी भावनिक प्रतिक्रिया देत हळहळ व्यक्त केली आहे. स्थानिक पोलीस आता या थरारक हत्येमागील मास्टरमाइंडचा कसून शोध घेत आहेत.