आज बाजारात पनीर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या किमतीत मिळते. काही ठिकाणी 200 ते 250 रुपये किलो तर काही ठिकाणी त्याहूनही कमी दरात पनीर विकले जाते. मात्र, अन्नसुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो एवढ्या कमी किमतीत मिळणारे पनीर खरोखर शुद्ध आहे का? अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पनीरच्या गुणवत्तेबाबत बोलताना ग्राहकांना साधे गणित समजावून सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, शुद्ध दूध वापरून 1 किलो पनीर तयार करण्यासाठी लागणारा खर्चच जास्त आहे. मग बाजारात अत्यंत स्वस्त दरात मिळणारे पनीर कोणत्या प्रकारचे आहे, हा प्रश्न ग्राहकांनी विचारला पाहिजे.

म्हणूनच बाजारात मिळणाऱ्या अत्यंत स्वस्त पनीरकडे ग्राहकांनी केवळ “स्वस्त मिळत आहे” या दृष्टीने पाहू नये. कारण कमी किमतीत उत्पादन विकायचे असेल तर त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतात. काही वेळा भेसळयुक्त किंवा कमी दर्जाच्या पदार्थांचा वापर करून उत्पादनाचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पनीरमध्ये भेसळ असल्यास त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आरोग्याबाबत काळजी घेणाऱ्या लोकांनी पनीर खरेदी करताना अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. दिसायला पांढरे आणि आकर्षक असलेले प्रत्येक पनीर शुद्ध असेलच असे नाही. (फोटो सौजन्य :- @iStock, @tukaram_ias)
1 किलो पनीरसाठी किती दूध लागते?
पनीर बनवण्यासाठी मुख्य घटक म्हणजे दूध. साधारणपणे 1 किलो चांगल्या प्रतीचे पनीर तयार करण्यासाठी 5 ते 6 लिटर दूध लागू शकते.
समजा बाजारात चांगल्या दर्जाचे दूध 60 ते 70 रुपये लिटर दराने मिळत असेल तर
5 लिटर दूध × 60 रुपये = 300 रुपये
6 लिटर दूध × 60 रुपये = 360 रुपये
यामध्ये दूधाचा खर्चच 300 ते 360 रुपयांच्या आसपास जातो. त्यानंतर गॅस, वीज, मनुष्यबळ, पॅकिंग, वाहतूक आणि विक्रेत्याचा खर्च धरला तर 1 किलो पनीरची वास्तविक किंमत आणखी वाढते.
मग स्वस्त पनीरमध्ये काय असते?
जर एखादे पनीर खूपच कमी दरात विकले जात असेल तर ग्राहकांनी सावध राहणे गरजेचे आहे. काही वेळा अशा उत्पादनांमध्ये दुधाचे प्रमाण कमी असू शकते किंवा दर्जाहीन घटक वापरले जाऊ शकतात.बाजारात काही ठिकाणी बनावट किंवा भेसळयुक्त पनीर आढळल्याच्या घटना समोर येतात. अशा पनीरमध्ये स्टार्च, वनस्पतीजन्य चरबी किंवा इतर पदार्थ मिसळले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे फक्त कमी किंमत पाहून पनीर खरेदी करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
घरी पनीर बनवणे हा उत्तम पर्याय
बाजारातील गुणवत्तेबाबत शंका असेल तर घरच्या घरी पनीर बनवणे हा सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. घरचे पनीर ताजे, शुद्ध आणि आपल्या नियंत्रणात असते.
साहित्य
2 लिटर फुल क्रीम दूध
2 ते 3 चमचे लिंबाचा रस किंवा व्हिनेगर
स्वच्छ कापड (मलमलचे कापड)
कृती
1. दूध उकळा
एका भांड्यात 2 लिटर दूध घेऊन ते चांगले उकळून घ्या.
2. दूधात लिंबाचा रस टाका
गॅस कमी करून त्यात हळूहळू लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घाला. दूध फाटून पाणी आणि पनीर वेगळे होईल.
3. गाळून घ्या
फाटलेले दूध स्वच्छ मलमलच्या कपड्यात गाळा. उरलेला पनीरचा भाग कपड्यात राहील.
4. पाणी काढा
कपड्याला बांधून काही वेळ टांगून ठेवा, जेणेकरून अतिरिक्त पाणी निघून जाईल.
5. आकार द्या
पनीरवर वजन ठेवून 1 ते 2 तास दाबून ठेवा. त्यानंतर चौकोनी तुकडे करून वापरता येईल.
चांगले पनीर बनवण्यासाठी टिप्स
- जास्त चव आणि मऊपणासाठी फुल क्रीम दूध वापरा.
- दूध फाडताना लिंबाचा रस हळूहळू घाला.
- पनीर जास्त वेळ दाबून ठेवल्यास ते घट्ट होते; कमी वेळ ठेवल्यास ते मऊ राहते.
- तयार पनीर पाण्यात ठेवून फ्रिजमध्ये 2–3 दिवस साठवता येते.
ग्राहकांनी पनीर घेताना काय तपासावे?
- पनीर खरेदी करताना काही साध्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात
- रंग पहा: शुद्ध पनीर साधारण पांढरे किंवा फिकट क्रीम रंगाचे असते. खूप चमकदार किंवा वेगळ्या रंगाचे पनीर टाळावे.
- घट्टपणा तपासा: चांगल्या पनीरचा पोत मऊ पण घट्ट असतो. रबरासारखे जास्त कडक पनीर संशयास्पद असू शकते.
- वास तपासा: ताज्या पनीरला दूधासारखा सौम्य वास असतो. विचित्र वास आल्यास वापर टाळावा.
- विश्वासार्ह ठिकाणाहून खरेदी करा: परवानाधारक विक्रेत्याकडून पनीर घेणे सुरक्षित ठरते.

