Headlines

गोवा वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी मांडवीतील 9 ठिकाणे निश्चित


त. भा. प्रतिनिधी

पणजी : गोवा वॉटर मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 9 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्याचा अहवाल तयार करण्याचे काम कोची मेट्रो रेल लिमिटेड या कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजे खर्च रु. 3000 कोटी असून 4 महिन्यांत अहवाल देण्याची सूचना कंपनीला करण्यात आली आहे.

नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई व कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लोकनाथ बेहरा यांनी पर्वरी सचिवालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याच्या वॉटर मेट्रो प्रकल्पाला मान्यता दिली असून पहिला टप्पा प्राधान्याने हाती घेण्यात यावा, अशी सूचना केली आहे. गोव्यातील सुमारे 30 ते 35 हजार लोक दररोज फेरीबोटीतून प्रवास करतात. रोरो फेरीबोटी सुरू झाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढली असून ती प्रतिदिन 40 हजारच्या वर गेली आहे. गोव्यात वॉटर मेट्रो प्रकल्प झाल्यानंतर प्रतिदिन सुमारे एक लाख लोक त्यातून प्रवास करतील, असा अंदाज फळदेसाई यांनी वर्तविला आहे.

या प्रकल्पाबाबत बोलताना बेहरा म्हणाले की, केरळ-कोचिनमधील जलमार्गापेक्षा गोव्यातील जलमार्ग वॉटर मेट्रोसाठी सुलभ असून पर्यावरणासाठी पूरक आहेत. रस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी कमी करणे आणि पर्यटानास नवी संजीवनी देणे यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. याकरीता लागणाऱ्या बोटी किती प्रवासी क्षमतेच्या असाव्यात हे प्रकल्प अहवालानंतर ठरविण्यात येणार आहे. कोचिनमध्ये 150 प्रवासी क्षमतेच्या बोटी आहेत. तेवढे प्रवासी भरले की दरवाजे आपोआप बंद होतात. म्हणजे जादा भार व अपघात होण्याचा धोका नाही.  कोचिनमध्ये एकही अपघात झाला नसल्याचा दावा बेहरा यांनी केला आहे.

पंतप्रधान मोंदींकडून गोव्याला पहिली पसंती!

प्रथम टप्प्यात दिवाडी, चोडण, वाशी, नार्वे, सारमानस, हळदोणे, पणजी, बेती, दुर्भाट अशी 9 ठिकाणे वॉटर मेट्रोसाठी ठरविण्यात आली असून तेथे टर्मिनस उभारण्यात येणार आहेत, असे फळदेसाई यांनी स्पष्ट केले.

अनेक राज्यांकडून वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी प्रस्ताव केंद्राकडे आले होते. गोवा हे पर्यटन राज्य असल्याने केंद्र सरकारने व प्रामुख्याने पंतप्रधानांनी गोव्यात प्रथम पसंती दिली, असे फळदेसाई म्हणाले. रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून सुटण्यासाठी जलमार्ग वाहतूक महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

वाहतूक कोंडीतून होणार सुटका!

कोचिनमध्ये वॉटर मेट्रोसाठी मासिक पास पद्धत आहे. त्यामुळे प्रतिएकेरी मार्गाचा तिकीट दर रु. 40 आहे. मात्र पास घेतल्यास रु. 12 एवढा स्वस्त पडतो. म्हणून वॉटर मेट्रो गोव्यात झाल्यावर पास पद्धतीमुळे ती सेवा कमी खर्चाची होऊन वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याचे बेहरा म्हणाले.

सदर प्रकल्पाकरीता इलेक्ट्रिक बोटींचा वापर अनिवार्य असून त्या अर्धा ते एका ताराभरात चार्ज होतात. गोवा शिपर्याड लि. कंपनी विविध प्रकारच्या बोटींची बांधणी करते. त्या कंपनीस या बोटी तयार करता येणे शक्य आहे, असे बेहरा यांनी नमूद केले. गोव्यात या प्रकल्पाचे जाळे 100 कि.मी.पर्यंत विणले जाणार असून आणखी काही ठिकाणे कालांतराने निश्चित होतील. काही ठिकाणी तरंगती जेटी बांधण्यात येणार असून अहवाल तयार झाल्यावर त्यांची निश्चिती होणार आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत