Headlines

कसा आहे सनी देओल, प्रीती झिंटा यांचा बटवारा १९४७ सिनेमा?


मुंबई टाइम्स टीम
फाळणीच्या इतिहासात रक्तपात, हिंसा अनेक पानं आहेत; मात्र त्या सगळ्याच्या पलीकडे माणसाच्या मनावर उमटलेल्या जखमांची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘बटवारा १९४७’ करतो. असगर वजाहत यांच्या गाजलेल्या नाटकावर आधारित हा चित्रपट फाळणीला केवळ ऐतिहासिक घटना न मानता, तुटलेल्या नात्यांची आणि माणुसकीच्या कसोटीची कहाणी म्हणून मांडतो.
इम्रान हाश्मीचा बॉक्स ऑफिसवर डंका, Awarapan 2 ची दमदार सुरुवात; सनी देओलच्या Batwara 1947 ला टाकणार मागे

कथेचा केंद्रबिंदू आहे, लाहोरमधील एक जुनं घर. फाळणीनंतर सिकंदर मिर्झा ( सनी देओल ) या घरात आश्रयाला येतो; मात्र तिथं आधीपासून राहणारी वृद्ध हिंदू महिला ‘माई’ ( शबाना आझमी ) त्याला आव्हान देते. सनी देओलनं साकारलेला सिकंदर हा त्याच्या नेहमीच्या आक्रमक व्यक्तिरेखांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. आवाजातील आक्रमकतेऐवजी डोळ्यांतली असहाय्यता आणि मनातील कोंडी तो प्रभावीपणे व्यक्त करतो. शबाना आझमी यांची माई संयम, वेदना आणि ममत्व यांचं मिश्रण आहे. दोघांमधील हळूहळू विकसित होणारं नातं चित्रपटाचा सर्वात भावस्पर्शी भाग ठरतं. प्रीती झिंटाची व्यक्तिरेखाही फाळणीनंतर आयुष्य पुन्हा उभं करणाऱ्या स्त्रियांच्या संघर्षाचं प्रतिनिधित्व करते. तिच्या भूमिकेत आक्रोशापेक्षा जगण्याची जिद्द अधिक जाणवते.
Tukaram Mundhe: अनेकदा प्रामाणिकपणाची खूप मोठी किंमत मोजावी लागते, तुकाराम मुंढेंची आता लवकर बदली नको; टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हिची पोस्ट

चित्रपटाची दृश्यभाषा भव्यतेपेक्षा जवळीक साधणारी आहे. घराच्या चार भिंतींमध्ये निर्माण होणारा ताण, असुरक्षितता आणि बदलत्या काळाची चाहूल प्रभावीपणे टिपली आहे. या वातावरणाला ए. आर. रहमान यांचं संगीत भावनिक खोली देतं. अनेक प्रसंगांमध्ये संवादांपेक्षा संगीतच पात्रांच्या मनातील वेदना अधिक स्पष्ट करतं. मात्र चित्रपटाचा संथ वेग हा त्याचा मोठा अडथळा ठरतो. विशेषतः पूर्वार्धात कथा वातावरणनिर्मितीत अधिक वेळ घालवते, त्यामुळे काही ठिकाणी कथानकाचा प्रभाव कमी होतो. १९४०च्या दशकातील लाहोरची डिजिटल निर्मितीही काही प्रसंगांत अपेक्षित अस्सलपणा निर्माण करू शकत नाही. तरीही ‘बटवारा १९४७’ हा फाळणीवरचा नेहमीचा रक्तरंजित पट न ठरता, त्या काळातील माणसांच्या भावविश्वाकडे पाहणारा प्रयत्न आहे. द्वेषभावनेला कोणत्याही एका धर्माचा चेहरा न देता, संपलेल्या माणुसकीबद्दल हा चित्रपट ठळकपणे बोलतो. काही त्रुटींमुळे चित्रपट परिपूर्ण ठरत नसला, तरी त्यातील भावनिक प्रामाणिकपणा मात्र मनात ठसतो.

सिनेमा : बटवारा १९४७

निर्मिती: आमिर खान, अपर्णा पुरोहित
दिग्दर्शक : राजकुमार संतोषी
कथा, संवाद : राजकुमार संतोषी, असगर वजाहत
कलाकार: सनी देओल, प्रीती झिंटा , शबाना आझमी, करण देओल , अली फजल, अभिमन्यू सिंह
छायांकन : संतोष सिवन
संकलन : श्याम साळगावकर
संगीत : ए. आर. रहमान
दर्जा:★★★



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत