ओटवणे प्रतिनिधी : मांडव फातरवाडीतील कमी दाबाच्या विज पुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पेरणे येथील ट्रान्सफॉर्मर न हलविता तात्काळ नवीन ट्रान्सफार्मर मंजूर करून मांडवफातरवाडीतील विजेचा प्रश्न सोडवावा अशी मागणी माजगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य विक्रांत सावंत यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली.
मांडवफातरवाडीतील कमी दाबाच्या विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी नवीन ट्रान्सफार्मर बसवण्याची ग्रामस्थांची अधिक वर्षांपासून मागणी आहे. मात्र सद्यस्थितीत नवीन ट्रान्सफार्मर बसविणे शक्य नसल्याने महावितरणने पेरणे स्टॉप येथील ट्रान्सफार्मर
मांडवफातरवाडी येथे बसवण्याचे निश्चित केले. त्या दृष्टीने ठेकेदाराने मांडवफातरवाडीत विद्युत खांब उभारले. महावितरण नवीन ट्रान्सफार्मर ऐवजी पेरणे येथील ट्रांसफार्मर बसवत असल्याची माहिती मिळताच माजी काँग्रेसचे माजी सावंतवाडी तालुकाध्यक्ष रवींद्र म्हापसेकर यांनी तात्काळ हे काम रोखले. आणि या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी केली. तसेच पेरणे नजिक करमळगाळूवाडीतील ग्रामस्थांचीही हा ट्रान्सफार्मर न हलवण्याची मागणी कायम आहे.
त्यामुळे एका वाडीचा ट्रान्सफार्मर दुसऱ्या वाडीत हलविण्याच्या महावितरणच्या या प्रकाराविरोधात जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रशासनाची कानउघडणी केली. पेरणे येथील ट्रान्सफार्मर आहे त्याच जागी कायम ठेवून मांडवफातरवाडीसाठी स्वतंत्र नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करून द्यावा अशी त्यांनी मागणी केली.
