Headlines

एक फोटो, दोनच शब्द; वैभव सूर्यवंशीच्या पोस्टमागचे गूढ काय? डेब्यूबद्दल सस्पेन्स वाढला


Vaibhav Sooryvanshi News : भारत-इंग्लंड दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी वैभव सूर्यवंशीच्या इंस्टाग्राम स्टोरीने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. त्याच्या एका पोस्टमुळे आज त्याचे टीम इंडियात पदार्पण होणार का, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

vaibhav sooryvanshi debut news today
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : वैभव सूर्यवंशी टीम इंडियासाठी पहिला सामना नेमका कधी खेळणार? गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनात हाच प्रश्न आहे. 15 वर्षीय वैभवची भारतीय टी-20 संघात निवड झाली, पण आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याला संधी मिळाली नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातही तो बाकावरच बसला. आता मात्र त्याच्या एका इंस्टाग्राम स्टोरीने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. संजू सॅमसनला सलग अपयश येत असतानाही टीम मॅनेजमेंटने त्याच्यावर विश्वास कायम ठेवला. त्यामुळे वैभवला अद्याप पदार्पणाची संधी मिळालेली नाही. पण दुसऱ्या टी-20पूर्वी वैभवने केलेल्या एका पोस्टची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

एका स्टोरीने रंगली चर्चा

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार आहे. या सामन्यापूर्वी वैभवने इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तो जल्लोष करताना दिसत आहे. मागे ‘Final’ असा बोर्ड दिसतो, तर त्याने त्यावर ‘New Chapter’ असे लिहिले आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी आज वैभवचं पदार्पण होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Maharashtra TimesIndia vs England ODI Series : रोहित-विराटला रोखण्यासाठी इंग्लंडने टाकला मोठा डाव; भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघ घोषित

फोटोमागचं कारण काय?

वैभवने शेअर केलेला फोटो अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील आहे. इंग्लंडविरुद्धच्या त्या लढतीत त्याने फक्त 80 चेंडूत 175 धावांचा धडाका उडवला होता. त्या खेळीत त्याने 15 चौकार आणि 15 षटकार ठोकत भारताला शानदार विजय मिळवून दिला होता. आता वरिष्ठ संघातही त्याच धडाक्याची चाहत्यांना अपेक्षा आहे.

ब्रँड डील?

वैभवच्या ‘New Chapter’ पोस्टमुळे फक्त पदार्पणाच्याच चर्चा सुरू नाहीत. काही चाहत्यांचा अंदाज वेगळाच आहे. ही पोस्ट एखाद्या मोठ्या ब्रँडसोबतच्या नव्या कराराची चाहूल तर नाही ना, अशीही चर्चा रंगली आहे. खरं कारण मात्र अजूनही गुपितच आहे. वैभवने याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे ही पोस्ट टीम इंडियातील पदार्पणासाठी होती की नव्या ब्रँड डीलसाठी, याचं उत्तर आता सामन्याच्या नाणेफेकीनंतरच मिळणार आहे.

पण प्रशिक्षकांनी दिले वेगळे संकेत

वैभवच्या पोस्टमुळे पदार्पणाच्या चर्चा सुरू असल्या, तरी गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी घाई करू नये, असे संकेत दिले आहेत. दुसऱ्या टी-20पूर्वीच्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या सलामी जोडीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. संजूने विश्वचषक विजेत्या संघात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे सध्या संघ त्याच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.

तरीही मॉर्केल यांनी वैभवसारखा युवा खेळाडू संधीच्या अगदी जवळ असल्याचे मान्य केले. त्यामुळे आज नाही तर लवकरच वैभव सूर्यवंशीला टीम इंडियाकडून पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा