Headlines

इम्रान खानसाठी गावसकर-कपिल देव यांच्यासह 21 माजी कर्णधार एकवटले; पाकिस्तानच्या पीएमना पाठवलं 3 मागण्यांचं पत्र, कारण काय?


Imran Khan Health Pakistan : इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत सुनील गावसकर, कपिल देव यांच्यासह २१ माजी कर्णधारांनी पाकिस्तान सरकारला पत्र लिहिले आहे. या पत्रातून तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

Imran Khan News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांना भिडणारे खेळाडू मैदानाबाहेर मात्र माणुसकीची भिंत कशी उभी करतात, याचं एक मोठं उदाहरण आता समोर आलं आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि १९९२ मध्ये पाकिस्तानला विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार इम्रान खान सध्या तुरुंगात आहेत. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असल्याच्या बातम्या येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, भारताचे सुनील गावसकर आणि कपिल देव यांच्यासह जगभरातील तब्बल २१ माजी आंतरराष्ट्रीय कर्णधारांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना थेट पत्र लिहिलं आहे. या पत्रातून इम्रान खान यांच्यावर तातडीने योग्य ते वैद्यकीय उपचार व्हावेत, अशी जोरदार मागणी या दिग्गजांनी केली आहे. याबद्दचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

इम्रान खान हे जागतिक क्रिकेटमधील एक महान अष्टपैलू खेळाडू मानले जातात. २०१८ ते २०२२ या काळात त्यांनी पाकिस्तानचं पंतप्रधानपदही सांभाळलं. पण २०२३ पासून ते भ्रष्टाचाराच्या आणि इतर राजकीय प्रकरणांमध्ये अडियाला तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. नुकतंच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण तिथे कोणतीही नीट तपासणी न करता अवघ्या काही तासांत त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आलं, असं सांगितलं जातं.

Maharashtra TimesYashasvi Jaiswal Controversy : यशस्वीला राग महागात पडणार? लाइफटाइम बॅनचा धोका, पण टीम इंडियाच्या कोचकडून बचाव, काय म्हणाले?
दरम्यान, या २१ दिग्गजांनी स्पष्ट केलंय की, हे पत्र लिहिण्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही. इम्रान खान हे त्यांचे जुने सहकारी आणि मैदानावरचे प्रतिस्पर्धी आहेत. क्रिकेटमधले हे बंध देशांच्या सीमा आणि राजकीय वादांच्या पलीकडचे आहेत. विशेष म्हणजे, सुरुवातीला १४ माजी कर्णधारांनी हे पत्र लिहिलं होतं, आता त्यात आणखी ७ नावांची भर पडून ही संख्या २१ वर पोहोचली आहे.

कोर्टाचे आदेशही धाब्यावर

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्या खासगी डॉक्टरांच्या उपस्थितीत एका ‘मेडिकल बोर्डा’मार्फत त्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सरकारी अधिकाऱ्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली. काही तासांतच इम्रान यांना मेडिकली फिट घोषित करून तपासणी पूर्ण होण्याआधीच पुन्हा तुरुंगात डांबण्यात आलं. अधिकाऱ्यांच्या या धक्कादायक कृतीवर माजी कर्णधारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Maharashtra TimesVaibhav Sooryavanshi Wicket : वैभवला ८ धावांतच गार केलं, बॉक्सिंगमध्ये गोल्ड जिंकणारा हा गोलंदाज आहे तरी कोण? क्रिकेटमध्ये एन्ट्रीची भन्नाट कहाणी!

पत्रातून केलेल्या ३ प्रमुख मागण्या

या माजी कर्णधारांनी पाकिस्तान सरकारसमोर ३ महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या आहेत.

सविस्तर तपासणी

सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या मेडिकल बोर्डाला (ज्यात इम्रान यांचे खासगी डॉक्टरही असतील) त्यांच्या प्रकृतीची स्वतंत्र तपासणी करू द्यावी. विशेषतः त्यांच्या उजव्या डोळ्याची दृष्टी जाण्याची जी चर्चा आहे, त्याची पारदर्शकपणे चौकशी व्हावी.

कुटुंबीयांची भेट

न्यायालयाच्या आदेशानुसार, इम्रान खान यांच्या कुटुंबीयांना कोणत्याही प्रशासकीय अडचणीविना दर आठवड्याला त्यांना भेटण्याची परवानगी द्यावी.

तातडीचे उपचार

मेडिकल बोर्ड जे काही उपचार सुचवेल, ते कोणताही वेळ न घालवता त्वरित उपलब्ध करून द्यावेत.

Maharashtra TimesDevdutt Padikkal : 66 वर टीम इंडिया अडखळली, पडिक्कलनं पुन्हा शतक ठोकलं; 8 वर्षांत कुणालाच जमलं नव्हतं ते कोलंबोत करून दाखवलं!

गावसकर आणि कपिल देव यांचाही पुढाकार

या ऐतिहासिक आणि माणुसकीच्या दृष्टीने लिहिलेल्या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या २१ दिग्गजांमध्ये भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर, विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव आणि दिलीप वेंगसरकर यांची नावं प्रामुख्याने आहेत. याशिवाय ॲडम गिलख्रिस्ट, ॲलन बॉर्डर, ॲलिस्टर कुक, अर्जुन रणतुंगा, क्लाइव्ह लॉईड, स्टीव्ह वॉ, इयान चॅपेल, नासेर हुसेन आणि डेव्हिड गोवर यांसारख्या दिग्गज नावांनीही इम्रान खान यांच्यासाठी आवाज उठवला आहे. थोडक्यात सांगायचं तर, क्रिकेटच्या मैदानातील खिलाडूवृत्ती आता एका जुन्या सहकाऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी राजकीय मैदानातही पाहायला मिळत आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा