![]()
राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि लगतच्या भागातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, विविध पावसाळी दुर्घटनांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. उद्याही राज्याच्या अनेक भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला योग्य ते आदेश जारी केले असून, या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून अनेक जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला मंगळवार, दिनांक 7 जुलै 2026 रोजी मुसळधार पावसाचा तसेच सोसाट्याचे वारे वाहतील, असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालयांना उद्या, मंगळवार, दिनांक 7 जुलै 2026 रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे. तथापि, आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच, प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या, 7 जुलै रोजी ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करून मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह जोरदार वाऱ्यांचा इशारा दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचणे, झाडे कोसळणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची गंभीर दखल घेत, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या (7 जुलै) जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयांना अधिकृतपणे सुट्टी जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. नाशिकच्या पाच तालुक्यातील शाळांना सुट्टी हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला उद्या अतिवृष्टीचा इशारा दिला असून, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि दिंडोरीसह ग्रामीण भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षिततेचा उपाय म्हणून नाशिक ग्रामीण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि दिंडोरी या पाचही तालुक्यांतील सर्व शाळा व महाविद्यालयांना अधिकृतपणे सुट्टी जाहीर केली असून, या भागांतील आठवडे बाजारही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच, केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर नाशिक महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळादेखील उद्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे बंद राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पालघरमध्येही असणार शाळा बंद पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, हवामान विभागाने उद्याही जिल्ह्याच्या अनेक भागांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेत, जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत पत्रक जारी करून पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर केली आहे. यासोबतच, कोकण पट्ट्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळाही उद्या विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आणि आंबेगावातील शाळा बंद दुसरीकडे, पुणे जिल्ह्याच्या काही विशिष्ट भागांमध्येही हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून केवळ मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आणि आंबेगाव या सह्याद्री घाट परिसरातील तालुक्यांमधील शाळा उद्या बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, जिल्ह्यातील इतर तालुके आणि पुणे शहरात पावसाचा मोठा धोका नसल्याने येथील सर्व शाळा उद्या नेहमीप्रमाणे सुरूच राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Source link
हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा:विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई, ठाणे, पालघरसह पुण्यातील घाटमाथ्यावरील शाळाही राहणार बंद
