या लेखमालेचं हे आजचं शेवटचं वळण. या वळणावर मला गुरूतुल्य व्यक्तींची आठवण येतेय. त्यांच्यापैकी एक अमोल पालेकर . अमोलजी उत्तम गुरू आहेत हे मला ‘दायरा’ चित्रपटाच्या वेळी कळलं. १९९६मध्ये हा चित्रपट आला, ज्याचं शूटिंग आम्ही ओडिशात केलं होतं. त्यात माझी ‘मॅडम’ ही व्यक्तिरेखा होती. अमोलजींनी सांगितलं होतं, की कुणीही मेकअप करायचा नाहीये. मला पान खाण्याची सवय दिली होती. पान खाऊन ओठ लाल होतात हे दाखवण्यासाठी अमोलजी मला भरपूर विडे खायला सांगायचे. मी काहीतरी गुणगुणत विडा तयार करते आहे असं चित्रपटाचं पहिलं दृश्य माझ्यापासून सुरू होतं. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप वाहवा मिळाली. अमोलजींसह आमचं सगळं युनिट ओडिशात मुक्कामी असल्यामुळे त्यांची विचार करण्याची पद्धत मला पाहता आली, अभ्यासता आली.
गाण्याचा परिचय मला करून दिला तो आमच्या सोलापूरच्या पंचवाडकर सरांनी. मग मनोहर कुलकर्णी यांच्याकडे भावगीत शिकत होते. राम जालिहाळ, पं. प्रभुदेव सरदार यांच्याकडे शिकण्याचं भाग्य लाभलं. जेव्हा दारव्हेकर मास्तरांचं ‘ कट्यार काळजात घुसली ’ हे नाटक आलं तेव्हा अभिषेकी बुवांनी मला सांगितलं, ‘तुम्ही गाणं शिकायला हवं.’ खरं म्हणजे ‘कट्यार’च्या निमित्तानं मी अभिषेकी बुवांकडे शिकत होतेच. प्रयोगांदरम्यान, दौऱ्यादरम्यान वसंतराव देशपांडेंचा सहवास लाभला. ती एक चालतीबोलती संगीतशाळाच होती. तरीही अभिषेकी बुवांनी मला पं. सी. आर. व्यास यांच्याकडे गाणं शिकायला जाण्यास सांगितलं आणि एका गुढीपाडव्याला ते मला व्यासांकडे घेऊन गेले. व्यासबुवांनी मला मुक्तहस्ते संगीत दिलं. माझा गळा गाता ठेवलाच, शिवाय मला तानांची ओळख करून दिली. अडीच-तीन वर्षं मी व्यासबुवांकडे शास्त्रीय संगीत शिकले.
दरम्यान, अभिषेकींना जाणवलं होतं की हिला गझलांची आवड आहे. अभिषेकींकडे एक दिवस त्रिवेदी म्हणून आले होते. त्रिवेदींना अभिषेकींनी सांगितलं, ‘या मुलीची बेगमांसाहेबांची भेट करून द्या’. आठेक दिवसांनी त्रिवेदींचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं, ‘बेगम आयी है’. मग आम्ही बेगमसाहेबांना भेटायला मरिन लाइन्सला सी ग्रीन हॉटेलवर गेलो. बेगम अख्तर हे माझं दैवत होतं. अत्यंत प्रसन्न आणि राजसी व्यक्तिमत्त्व होतं त्यांचं. त्रिवेदीजींनी सांगितलं, ‘ये ड्रामा में काम करती है’. त्या म्हणाल्या, ‘अच्छा, तो कुछ सुनाओ’. मी ‘लागी करेजवा कटार’ गाऊन दाखवलं. मला म्हणाल्या, ‘तुम्हारे गले में तासीर (आकर्षण) है. गाना सिखती हो?’ मी सांगितलं, ‘ड्रामे के सिलसिले में जितना सिखना होता उतना सिखती हूँ’. भेटीनंतर मग जिथे कुठे अख्तरीबाईंचा कार्यक्रम असेल तिथे त्रिवेदी मला न्यायला लागले. हळूहळू बेगमसाहेबांच्या मागे तानपुरा साथीला बसण्याइतपत माझी प्रगती झाली. त्या मध्येच कधी म्हणायच्या, ‘गाओ बेटी’. ‘कट्यार’च्या दौऱ्यावर मग वसंतराव बेगमसाहेबांचं गाणं उलगडून मला सांगायचे. बाईंच्या गळ्याची जातच वेगळी होती. बाईंनी ‘कट्यार काळजात घुसली’ नाटक तीनदा पाहिलं. एकदा पहिल्या रांगेतच त्रिवेदीजी त्यांना घेऊन बसले होते. नाटकाचा प्रयोग झाल्यावर त्रिवेदी मला म्हणाले, ‘तुम लागी करेजवा कटार गा रही थी और बेगमसाहिबा के आँखों में हमने खुशी के आसूँ देखे’.
एकदा पुण्याला आमचा ‘कट्यार’चा प्रयोग होता. दुसऱ्याच दिवशी कलेक्टर बंगल्यावर बेगमसाहेबांचं गाणं होतं. आम्ही तिथं गेलो. बेगमसाहेबांबरोबर त्यांचे खास तबलिये महम्मद अहमदखाँ साहेब आलेले होते. त्या स्वतः पेटी वाजवायच्या. तिथे गेल्यावर अचानक भाई (पुलं) म्हणाले, ‘वसंता तू तबल्यासाठी बस, मी पेटी वाजवतो आणि ही तानपुऱ्यावर बसेल’. अशी स्वर्गीय मैफल झाली त्या दिवशी.
पुढे एकदा एका मंदिराच्या जीर्णोद्धार निधी संकलनासाठी ‘संगीत संशयकल्लोळ’ करायचं ठरलं. न भूतो न भविष्यति असा तो प्रयोग झाला. प्रयोगाच्या दिवशी सकाळी अचानक मला वसंतराव म्हणाले, ‘चल तुला बेगमकडे घेऊन जातो.’ मी म्हणाले, ‘अहो, संध्याकाळी प्रयोग आहे.’ ते म्हणाले, ‘माझ्याबरोबर चल’. आम्ही सी ग्रीन हॉटेलवर बेगमसाहेबांना भेटायला गेलो. गेल्यावर मला बुवा म्हणाले, ‘बेगमला साष्टांग नमस्कार कर’. मला कळेचना. मी केला नमस्कार. बेगमसाहेबांनाही काही कळेना. मग वसंतराव बेगम अख्तरांना म्हणाले, ‘देखो, ही मुलगी ‘कट्यार’मध्ये काम करताना तू पाहिली आहेस; पण आज ती ‘संशयकल्लोळ’मध्ये काम करणार आहे आणि तिला खूप पदं गायची आहेत. इसलिए तुम्हारे दुवा की उसे जरुरत है’. त्या म्हणाल्या, ‘हमारी दुवाँ तो हमेशा इसके साथ है’. मग वसंतराव म्हणाले, ‘हिच्यासमोरच तुला सांगतो, इसे गाना सिखाओ’. त्या म्हणाल्या, ‘क्यूँ नहीं सिखाएंगे. हमारे साथ लखनऊ आए, हमारे हाथों गंडा बंधवाए, हमारे साथ रहे, फिर हम जरुर सिखायेंगे’.
एक मोठ्ठी संधी मला खुणावत होती, जी मी घेतली असती तर एक वेगळीच फैय्याज तुम्हाला दिसली असती. पण माझी भावंडं त्यावेळी शिकत होती, त्यांची लग्नं व्हायची होती, माझी नाटकं सुरू होती. बरं, तिकडे जाऊन मी शिकले असते तरी मला कार्यक्रम मिळायला हवेत, माझं गाणं आवडायला हवं, माझ्या आवाजाची तुलना बेगमसाहेबांच्या आवाजाची झाली तर… एक ना दोन. अनेक प्रश्न होते, त्यामुळे मी जाऊ शकले नाही. भाईंना, वसंतरावांना याचं फार वाईट वाटलं. पणशीकर, घाणेकर तर म्हणालेही, ‘त्या शिकवायला तयार आहेत पण ही मुलगी जायला तयार नाहीये’. काशिनाथ घाणेकर मला म्हणाले होते, ‘तुला घरी किती पैसे पाठवावे लागतात ते सांग. मी तेवढे पैसे दरमहिना जातील यासाठी बँकेत दोनतीन वर्षांसाठी एफडी ठेवून देतो’. पुलंनीहा मला आर्थिक मदत करायची तयारी दाखवली होती. पण माझ्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या काय आहेत ते मलाच माहीत होतं. ती खंत माझ्या मनात राहीलच.
मराठी रंगभूमीची सेवा यथामती, यथाशक्ती करू पाहणाऱ्या प्रत्येक कलावंताला अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळावं ही सुप्त इच्छा असतेच. इतर कलावंतांच्या चर्चेत माझंही नाव दोनदा त्या पदासाठी चर्चेत येऊन गेलं होतं. सोलापुरात २००८मध्ये झालेल्या नाट्य संमेलनाच्या वेळी आपलं नाव अध्यक्षपदासाठी घेतलं जावं अशी माझी – मी सोलापुरची असल्यामुळे फार इच्छा होती. पण त्यावेळी रमेश देव नाट्य संमेलनाध्यक्ष झाले. त्यानंतर सात वर्षं माझं नाव चर्चेत नव्हतं. एक दिवस मोहन जोशींचा मला फोन आला. ते म्हणाले, मी एक पत्र पाठवतोय, त्याला तुम्ही उत्तर द्या. मी त्यांना त्याबद्दल विचारलं. ते म्हणाले, ‘तुमचं नाव अध्यक्षपदासाठी सुचवतोय, त्याला तुमचं संमतीपत्र द्या, मी माणूस पाठवतोय’. मी त्यांना नकार दिला. पण त्यांनी काही ऐकलं नाही. मी त्यांच्या आग्रहाखातर त्या पत्राला स्वीकृती देऊन सही केली. मी बिनविरोध निवडून आल्याचं मला कळलं. अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणात मी म्हटलं होतं, की ‘बाल, हौशी, कामगार, प्रायोगिक, समांतर, व्यावसायिक रंगभूमी आणि लोककला हे महत्त्वाचे नाट्यबिंदू आहेत. हे सगळे नाट्यबिंदू एकत्र येऊन एक सघन, सुस्पष्ट, सुस्थिर रेषा निर्माण झालेली आहे, जिला आपण मराठी रंगभूमी म्हणतो. यातला एक बिंदू जरी निसटला, तुटला किंवा दुबळा झाला तरी तो मराठी रंगभूमीला कमकुवत करेल. म्हणूनच या सगळ्या नाट्यबिंदूंना सबळ, परिपूर्ण, अर्थपूर्ण करणे हे प्रत्येक मराठी रसिकांचे, रंगकर्मींचे आद्य कर्तव्य आहे.’
या रंगभूमीची सेवा करण्याचं भाग्य माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या, सोलापुरासारख्या छोट्या नगरातून मुंबईत आलेल्या मुलीला मिळालं यासाठी मी नटेश्वराची शतशः आभारी आहे. या मालिकेच्या निमित्ताने तुमच्याशी संवाद साधता आला हेही महत्त्वाचं आहे.

