![]()
अयोध्येतील भव्य राम मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या दानामध्ये (देणगी आणि दागिने) झालेल्या कोट्यवधींच्या अपहारावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप सरकारवर कडाडून टीका केली आहे. “प्रभू रामचंद्रांचे नाव घेऊन सत्तेवर बसलेल्यांना या अपहाराविषयी काहीच कसे वाटत नाही?” असा थेट सवाल करत, राज ठाकरे यांनी एका विस्तृत सोशल मीडिया पोस्टद्वारे भाजपमधील अंतर्गत राजकारणावरही निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजप नेत्यांच्या मौनावर सवाल राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या विषयावरील मौनावर तीव्र आक्षेप नोंदवला. “रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी पंतप्रधानांनी गाभाऱ्यात एकट्याने पूजा केली. जर देवावर तुमचा विशेषाधिकार असेल, तर त्याच देवाच्या हुंडीतल्या अपहाराबद्दल बोलण्याची आणि लोकांना आश्वस्त करण्याची तुमची जबाबदारी नाही का?” असा थेट प्रश्न त्यांनी विचारला आहे. “दुसऱ्या पक्षाचे खासदार, आमदार पळवण्याची इतकी सवय झाली आहे की, देवाच्या दारात झालेल्या भक्तांच्या दानाच्या पळवापळवीचेही या नेत्यांना काही वाटेनासे झाले आहे,” असा टोला त्यांनी लगावला. 2024 च्या निवडणुकीत अयोध्येत भाजपने मारलेली धडक आणि तिथे मिळालेला नकार, यामुळेच रामाला पुन्हा वनवासात ढकलले जात आहे का, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. भाजपमधील सुप्त संघर्ष आणि योगी आदित्यनाथ यांची कोंडी या अपहारामागे भाजपमधील अंतर्गत राजकारण असू शकते, असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. “पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षांना खीळ घालण्यासाठी त्यांच्याच पक्षातील विरोधक हा मुद्दा नक्की उचलतील आणि त्यांची कोंडी करतील,” असे ठाकरे म्हणाले. गृहमंत्री अमित शहा यांच्यावर थेट हल्लाबोल करत राज ठाकरे म्हणाले की, “अमित शहा सध्या विरोधी पक्षांची घरे कशी फोडता येतील आणि आपण पंतप्रधानपदाच्या खुर्चीत कसे बसू, याची धुरकट स्वप्ने पाहत आहेत. त्यामुळे रामाच्या घरात काय घडतंय, याला त्यांच्या लेखी काही किंमत नाही.” दान विश्वस्तांच्या घशात जातंय! भक्तांच्या भावनांचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले की, अयोध्येचे मंदिर हे देशातील कोट्यवधी हिंदूंचे, साधू-संतांचे आणि प्राण गमावलेल्या करसेवकांचे आहे. महिलांनी दिलेले स्त्रीधन आणि घामाच्या पैशातून दिलेले दान देवाला न जाता विश्वस्त आणि पुजाऱ्यांच्या खिशात जात आहे. “मूर्तीमध्ये प्राण फुंकले जातात असे म्हणतात, मग मूर्तीच्या हातातील शस्त्रांनी या नराधमांचा बंदोबस्त का केला नाही? की मूर्तीत दगडच फुंकला आहे?” असा संतप्त सवाल त्यांनी केला. “देवी-देवतांची पूजा करा, पण या विश्वस्तांची आणि या मार्गाने राजकारण करणाऱ्यांची पूजा करू नका व कोणतेही दान यांच्या पदरात टाकू नका,” असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. नेमके काय आहे अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण? अयोध्येतील राम मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून दररोज मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने आणि धनादेश दानपेटीत (हुंडीत) जमा केले जातात. मात्र, नुकतेच या देणगीच्या मोजणीत आणि नोंदींमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि अपहार झाल्याचे समोर आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत एका विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली होती. एसआयटीने आपल्या प्राथमिक अहवालात या अपहाराला पुष्टी दिली आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या दानपेट्यांची मोजणी आणि व्यवस्थापन पाहणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी आणि संबंधितांनी संगनमत करून हा निधी हडपल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत काही आरोपींना अटकही केली आहे. श्रद्धेने अर्पण केलेल्या दानाचा असा गैरवापर झाल्याने देशभरातील रामभक्तांमध्ये संतापाची लाट असून, ट्रस्टच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच ज्वलंत मुद्द्याला हात घालत राज ठाकरे यांनी आता थेट भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला धारेवर धरले आहे.
Source link
सिंहासनाच्या मोहापायी रामाला पुन्हा वनवासात ढकललं!:अयोध्या राम मंदिरातील दानचोरीवरून राज ठाकरेंची मोदी-शहांवर टीका
