Headlines

सह्याद्रीची कभिन्न भिंत – tail baila is iconic and thrilling adventure destination in sahyadris located in mulshi region of pune district


-राणी दुर्वे

हिमालयाचे सौंदर्य वादातीत. त्याच्या इतका उत्तुंग पर्वत जगात दुसरा नाही हेही खरे! एकूणच हिमालय म्हणजे नयनसुख हे जरी खरे असले तरी पायाला आधार मात्र सह्याद्रीच्या कणखर खडकाचा आणि हाताला आश्वासक स्पर्श त्या खडबडीत, राकट, कभिन्न भिंतीचा. ‘कभिन्न’ म्हटले की ‘काळा’ शब्द आपोआप मनात उमटतोच. मराठी मनाला सह्याद्री अधिक जवळचा. स्वभावत:च दोघांत खडबडीतपणाचे साम्य. टणक, कणखर, राकट, धैर्यशील, आश्वासक, बेलगाम, फटकळ आणि असे बरेच काही दोघांनाही लागू पडते.

गाडी लोणावळा स्टेशनात थांबते. गर्दीतून वाट काढत राजमाचीच्या दिशेने जाण्यासाठी गावाबाहेर पडावे तर सुरुवातीच्या चार-सहा घरांच्या फणसराईसारख्या एक-दोन वस्त्या मागे पडल्या की पुढे कुठेतरी डोंगरात एक भव्य तासलेली नैसर्गिक अशी दगडाची लांबच लांब भिंत लागते. राजमाचीच्या दिशेने चालताना उजव्या हाताला काही वेळ ती भिंतच सोबत करत राहत असे. भिंतीच्यामागे तितकाच मोकळा आभाळविस्तार. धुंवांधार पावसात पाण्याच्या धारा तिच्या अंगावरुन कोसळत तर कधी पौर्णिमेच्या रात्री चालताना चांदण्यात न्हालेली ती भिंत अधिकच सौंदर्यवान दिसे. पावसात पाऊसधारा, चांदण्यात चांदणधारा. भिंतीचे कभीन्नपण तेच! सह्याद्रीची ही ‘ कभिन्न भिंत ’ आयुष्यातल्या एका प्रदीर्घ काळासाठी पावलांना सोबत करून राहिली आहे.

तसा महाराष्ट्र हा दगडांचा देश. महाराष्ट्राचा हा दगड म्हणजे भूगोलाच्या भाषेत डेक्कन ट्रॅप. दक्षिणी कातळ. काही कोटी वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या जागी दोन-तीन हजार फूट खोल भाग होता. पृथ्वीच्या हालचालींमुळे भेगा पडून लाव्हारसाच्या नद्या वाहू लागल्या. लाव्हा थंड झाला, त्याची माती झाली, पुन्हा लाव्हा पसरला. असे होत होत थराथरांनी वर चढणारा हा महाराष्ट्राचा काळाभोर कातळ तयार झाला. यातील एकेका थराची उंची साधारण दहा फूटांपासून पन्‍नास फूटांपर्यंतही आहे. या काळ्या बेलाग कड्यांमुळे सह्याद्रीचे एकूणच रूप रौद्र आणि रांगडे झाले. कभिन्न काळे, उभे धारदार आणि ताठ मानेचे कडे, अभेद्य आणि दुर्लघ्यच असे बुलंद सुळके सह्याद्रीत ठायी ठायी दिसतात. भारतातल्या पर्वतांमध्ये हिमालयाच्या खालोखाल विस्तार सह्याद्रीचाच. तापीतीरापासून थेट कन्याकुमारीपर्यंत सह्याद्रीची रांग पसरलेली. कळसूबाई हे सह्याद्रीचे अत्युच्च शिखर. आठवते, कॉलेजच्या दिवसातही कोणी कळसूबाई शिखरावर जाऊन आला आहे असे कळले की त्याच्याविषयी आदराने दबकून जायला व्हायचे. मग कधीतरी तेही पायाखालचे झाले. भंडारदारा, कळसूबाई परिसरात अलीकडे जाणे झाले तर फिरून एकवार लक्षात आले इथले वनसौंदर्य. भंडारदारा धरणाचे अमापपण. सह्याद्रीतले सौंदर्य प्रत्येक प्रदेशागणिक आगळे. कोकण वेगळा, घाटमाथा वेगळा. नाणेघाटाचे सौंदर्य वेगळे आणि तळकोकणचे सौंदर्य वेगळे. त्यातूनही सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्या, कडेकपारीत तर सगळी रौद्रता!

याच नैसर्गिक घडणीचे स्वातंत्र्याच्या मुहूर्तमेढीत शिवाजीराजांना साहाय्य झाले. या जंजाळातील सह्याद्रीचे कानेकोपरे सैन्याला अवगत. हा प्रदेश त्यांनी अक्षरश: पादाक्रांत करून व्यापून टाकलेला. म्हणूनच त्यांच्या गनिमी मोहिमा एवढ्या यशस्वी झाल्या. जावळीच्या जंगलातून एकदा पार आर्थर सीटवर महाबळेश्वरला चढायचे होते. दिवसभर जावळीमधून जात असताना मनोमन नवल दाटून येत होते की आत्ता हा रस्ता इतका अंधारा आणि निबिड तर महाराजांच्या वेळी जावळी काय असेल ? अर्थातच अलीकडचे माहीत नाही – जावळीचे घनदाटपण आहे की कमी झाले; कारण आता सगळ्याच गड-किल्ल्यांवर गर्दीच उसळते. मी सांगत आहे त्याकाळी रात्रीस पोचायचो तर राजमाचीत शुकशुकाट असायचा, वेशीवर कुत्रे भुंकून स्वागत करायचे आणि गावातली एक-दोन घरे तरी आमची वाट पहात जागी असायची.

महाराष्ट्रात आहेत तसे व तितके गड-किल्ले भारतात इतरत्र कुठे फारसे नाहीत. सह्याद्रीतल्या या गड-किल्ल्यांच्या विपुलतेचे कारणही पुन्हा सह्याद्रीच! सततच्या राजकीय उलाढालींमुळे या भागाला संरक्षणाची आवश्यकता तर होतीच पण त्याला साजेशी चिकाटीची कणखर, काटक आणि हार मानणार नाहीत अशी लढाऊ वृत्तीची माणसेही सह्याद्रीत होती. घोरपडीला दोर लावून चढणारी. माणसांसाठी सह्याद्री घडला की सह्याद्रीमुळे माणसे; नकळे! किल्ल्यांच्या कातळांना काही ठिकाणी दोरही लावता येणार नाही अशा प्रकारे राजांनी मुद्दाम तासून घेतले आहेत, तर काही गडांना नैसर्गिक कातळ भिंती आहेत. त्यातलाच एक सरसगड.

असेच दोनेक वर्षांपूर्वी अष्टविनायकातील पालीला गेले होते. पालीपासून थोड्या अंतरावर असलेले सिद्धेश्वर हे दुर्वे कुटुंबियांचे मूळ गाव. आता कोणी तिथे राहिले नाही. जुने घरही पडून गेले, सगळेच तसे पांगले; पण काही किरकोळ जमिनी पडून आहेत म्हणून बोलावून घेतले होते. आमचीच नाही, तर सभोवार सगळ्याच जमिनी पडीक. कोणे एकेकाळी नांदत्या असलेल्या, नांदत्या असताना पाहिलेल्या त्या जमिनी कसण्याचे काम आता कोणीच करत नाही. मैलोन् मैल पडीक, भेगाळलेल्या जमिनी आणि त्यातही ज्या जमिनीवर पीक उभे पाहिले होते ती आपलीच जमीन बंजर बघणे दु:खदायक होतेच पण जमिनी पहाता पहाता मी पूर्ण मागे वळले तर काळ्या पहाडांचा सह्याद्रीतला कातीव सरसगड उभा होता. मनातली विषादाची रेष ओलांडून मी पुन्हा नवलांत पाऊल टाकले. तळ्यात-मळ्यात. अरेच्चा ! हा गड ह्या जमिनीच्या पार्श्वभूमीवर इतका सुंदर आणि पूर्ण मूठ उघडलेला दिसतो हे माहीतच नव्हते. लहानपणी जेव्हा शेते हिरवी होती तेव्हा सरसगड पाहण्याची नजर नव्हती. आता ती नजर आहे तर शेते उजाड आहेत ! पण तरीही पाठीमागचा सरसगड भक्कम उभा राहिला आणि त्याने मला ओढून बाहेर काढले.

पालीच्या गावातून एकाच कोनातून दिसणारा तो गड इथून आपल्या पूर्ण उघडलेल्या मुठीने मला दर्शन देत होता. वस्तुत: पालीमधील अष्टविनायक आणि देवळामागे उभा असलेला सरसगड अंगणात उभे असल्याप्रमाणे ओळखीचे! सरसगडावर कधीकाळी जाऊनही आले आहे. खालून त्याच्या बेचक्यातल्या पायऱ्या कळत नाहीत. गडावर जाण्यासाठी उत्तर आणि दक्षिण, दोन्हीकडून वाट आहे. हा किल्ला त्याच्या कातळमाथ्यामुळे लक्ष वेधून घेतो. फार नाही, दीड-दोन तासांची चढाई. मध्यावर पोचलो की घळीत पायऱ्या खोदलेल्या दिसतात. वर पोहोचल्यावर, डावीकडे गडाचा कातळमाथा आहे. तो गडाचा बालेकिल्ला. तेथेच खाली पाण्याची टाकी आहेत. काहीसे अस्फुट असेही स्मरते की काही गुहाही आहेत. बालेकिल्ल्यावर महादेवाचे एक देऊळ आहे. महाभारतकालीन पांडवांच्या कथा भारतात सर्वत्र रुजलेल्या असतात. या गडाचे सुळके म्हणजे म्हणे भीमाची पाच बोटे. तोच उघडलेला पंजा इथून शेतजमिनिवरून स्पष्ट दिसत आहे. या गडाच्या माथ्यावरून सह्याद्रीच्या रांगांमधील अनेक किल्ले दिसतात. समोरच सुधागड आहे. अशी मी क्षणांत सरसगड चढून –उतरून आले. जमिनीच्या नापिकीचे दु:ख जरा शीतल झाले.

सह्याद्रीच्या कातळभिंतीनेच माझी पाठराखण केली.
राजमाचीचा लोणावळ्याकडचा रस्ता पायाखालचा होताच, पण हाच राजमाची गड लोणावळ्याऐवजी अनेकदा कोंदिवड्याहूनही चढलेला. तर कधी मुंबईहून लोणावळ्याकडे जाणारी गाडी बोगद्यातून बाहेर आली की ठाकूरवाडीजवळ थांबण्याची वाट पहावी. गाडी थंबली की टपकन उडी मारून उतरावे. पाठीशी सॅक आवळून घ्यावी आणि राजमाचीच्या दिशेने झपाझप चालायला लागावे. संध्याकाळची झांजर वेळ. एक घळ ओलांडली, दुसरी घळ ओलांडली असे वनं ओलांडत जावे तर पुढे उभी दगड-धोंड्याची चढणवाट लागावी. आता पायाखालचा उजेड पुसला गेला आहे.

दगडांतून ठेचकाळत उभ्या चढीचा तो डोंगर पार करत राहावे. थकून जावे. थोडे थांबून अजून किती चढायचे आहे याचा अदमास घ्यावा. इतका काळोख का असावा तेच समजत नाही. कधीतरी पार गळपटून गेल्यावर एकदाचा अखेरीचा चढ दिसतो आहे. तिथवर पोहोचावे तर राजमाचीच्या पठाराची दगडी चौकट. ही दगडात कोरली गेलेली नैसर्गिक खिडकी. खिडकीपाशी आलो म्हणजे राजमाचीत पोहोचलो. आता पुढे चढ नाही. सरळ सोपी वाट उलगडत जाते गावापाशी. खिडकीच्या चौकटीचा खडबडीत आधार घेत उभे रहावे आणि डोळे विस्फारुन जावेत. झगझगीत प्रकाश. वाटभर हरवलेला प्रकाश इथे होता तर! समोर पौर्णिमेचे परातीएवढे मोठे चंद्रबिंब. नुसता कोसळलेला चंद्रप्रकाश आणि त्यात पठारभर पसरलेली पिवळी फुले. चंद्रप्रकाश पिवळा होतो. ते शेत तिळाचे होते की सोनकीच्या फुलांचे ते ताटवे पसरलेले होते काय की जाणे; पण सह्याद्रीच्या कभिन्न कातळाला माझ्या मनात आहे महिरप सोनकीच्या पिवळ्या फुलांची! त्यावर पसरलेला भरपूर चंद्रप्रकाश. खिडकीच्या कातळचौकटीचा हाताला आधार. गावात पोहोचल्याची आश्वासक जाणीव आणि डोळ्यांना अपार नजरसुख. वाटते, लोणावळ्याकडची कभिन्न कातळभिंत हे कौतुक पहायला येतही असेल कधीतरी उठून राजमाचीच्या खिडकीत.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत