बायको गोड बोलून नवऱ्याला नकळत त्याच्या गळी गोष्ट उतरवते. तसं साहित्यातही घडतं.

बा. भ. बोरकर यांच्या कवितेतील ओळ आहे – ‘पण चित्रांची विचित्र वीणा अजून करते दिडदा दिडदा.’ ही पंक्ती अगदी लागू होते माउलींच्या ‘ ज्ञानेश्वरी ’ला. त्यातील ओव्या मनात रुंजी घालत राहतात. जशी ही तेराव्या अध्यायातील ओवी. ‘पाण्याचा थेंब पडला तर दिवा तडतडतो, वाऱ्याने विझतो, घरास लागला तर काडीदेखील उरू देत नाही. आणि कुठे थोडासा प्रकाश करतो तर तेवढ्यानेही उष्मा करावयास लागतो, दिव्याच्या या गुणांप्रमाणे ज्याच्या अंगात गुण भरले आहेत (तो अज्ञानी)’
‘जीवनें शिंपिला तिडापिडी (तडतडतो)। वीजिला (वाऱ्याने) प्राणसांडी।
लागला तरी काडी। उरों नेदी॥’
ज्ञान, ज्ञानी यांच्याविषयी खूप बोललं जातं. पण अज्ञानी माणसाविषयी श्रीकृष्णमुखाने अशा अद्भुत पद्धतीने बोलणारे ज्ञानदेव. प्रश्न पडतो या ओवीतील नादसौंदर्य अनुभवावं की विचारांची खोली गाठावी? खरं तर दोन्ही. संस्कृतमध्ये ‘कान्ता संमिततया उपदेश’ अशी एक कल्पना आहे.
ज्ञानदेव तेच कार्य करत आहेत; ते अशा सुंदर लेखन-शैलीतून. या ओवीचा विषय आहे अज्ञानी माणसांची वागणूक. ती कशी असते? जणू दिव्याप्रमाणे. आता पाहा ज्ञानियांची प्रतिभा. अंधाराचा नाश करणारा म्हणून ‘दिवा’ ही प्रतिमा नेहमी वापरतात. पण ज्ञानियांनी ती, याच्या उलट अर्थासाठी वापरली आहे; अज्ञानी व्यक्तीसाठी. हे ज्ञानदेवांच्या प्रतिभेचं वैशिष्ट्य. नवे नवे उन्मेष दाखवतात, नवे आयाम देतात श्रोत्यांच्या दृष्टीला. दिव्याकडे कोणी या दृष्टीने पाहिलं आहे का? मुळीच नाही.
पाण्याच्या थेंबानं तडतडणारा दिवा म्हणजे स्तुतीनं उडणारा अज्ञ म्हणता येईल. वाऱ्यानं विझणारा याचा अर्थ थोड्याशा संकटानेदेखील खचून जाणारा अज्ञानी. घराला लागला तर काडी उरू न देणारा. म्हणजे कसा? आपण विचारमंथनासाठी सोडू या ही कल्पना. कोडं सगळं उलगडलं तर काय गंमत! ज्ञानदेवांनी यात उपरोधाचा मार्मिक वापर केला आहे. अज्ञानी व्यक्तीच्या ठिकाणी दिव्याप्रमाणे हे गुण असतात, असं ते म्हणतात. वस्तुतः हे आहेत दुर्गुण. अशा उपरोधातून, तिरकस लेखनशैलीतून या उपदेशाची, विचारांची धार अधिकच वाढते. ती माणसांच्या मनात ठसते, बिंबते. नंतरही रेंगाळत राहते.. दिडदाऽदिडदाऽऽऽ.

