![]()
संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी ‘श्री राम कथा बोध’ ऑनलाइन स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या 100 विजेत्यांचा सत्कार समारंभ नुकताच दादर येथील प्राचार्य बी. एन. वैद्य सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. देशभरातून आलेल्या विजेत्यांसह नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे सभागृह खचाखच भरले होते. समारंभाला मैत्री व परिवारचे संस्थापक व मार्गदर्शक पूजनीय दादा श्री तसेच इस्कॉनचे विश्वस्त प्रभू माधवानंद दास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विजेत्यांना मार्गदर्शन करताना पूजनीय दादा श्री म्हणाले, “प्रत्येकाच्या हृदयातील श्रीराम जागृत झाले, त्यांच्या विचारांचे आणि मूल्यांचे आचरण जीवनात सुरू झाले, तरच देशात खऱ्या अर्थाने रामराज्याची स्थापना होईल.” समाजपरिवर्तनासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनात रामायणातील आदर्श आत्मसात करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. प्रभू माधवानंद दास यांनी भारतीय संस्कृती आणि धर्मग्रंथांचे महत्त्व विशद करताना सांगितले की, “आपली संस्कृती, जीवनमूल्ये आणि धर्मग्रंथ यांवर दृढ श्रद्धा असणे आवश्यक आहे. श्रीमद् रामायण हा काल्पनिक ग्रंथ नसून आदर्श जीवनाची दिशा देणारा आणि मानवी मूल्यांचे तत्त्वज्ञान मांडणारा कालातीत ग्रंथ आहे.” भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला इंडियन एज्युकेशन सोसायटी शाळा समूहाचे विश्वस्त श्री सतीश नायक, सुप्रसिद्ध उद्योजक प्रवीणभाई मेहता, कन्या फॅशन उद्योग समूहाचे संचालक गोविंदभाई पटेल, विश्व हिंदू परिषदेचे राजेंद्र पवार, बाबुभाई पटेल यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेतील प्रथम 100 विजेत्यांचा अयोध्येतील श्रीराम मंदिरातील बालरामाची प्रतिमा आणि प्रसाद देऊन गौरव करण्यात आला. या सन्मानामुळे विजेत्यांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद आणि समाधान दिसून येत होते. देशभरातून तब्बल दोन लाख स्पर्धकांनी या अभिनव ऑनलाइन स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यापैकी पैकीच्या पैकी गुण प्राप्त करणाऱ्या प्रथम 100 स्पर्धकांची निवड करून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. भारतीय संस्कृती, रामायणाचा अभ्यास आणि जीवनमूल्यांविषयी युवकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सादर करण्यात आलेल्या रामायणावरील नृत्यनाटिकेने उपस्थितांची मने जिंकली. प्रभू श्रीरामांच्या जीवनातील प्रसंगांचे प्रभावी आणि कलात्मक सादरीकरण प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उचलून धरले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती अलका गोडबोले यांनी केले, तर सूत्रसंचालन राजश्री माने यांनी अत्यंत प्रभावी आणि नेटकेपणाने पार पाडले. संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे भारतीय संस्कृती, रामायण आणि जीवनमूल्यांविषयी नव्या पिढीमध्ये जागरूकता निर्माण होण्यास निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
Source link
'श्री राम कथा बोध' स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात:देशभरातील 2 लाख स्पर्धकांमधून अव्वल ठरलेल्या 100 विजेत्यांचा दादरमध्ये गौरव
