![]()
शिवसेना पक्षाच्या मालकीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर कडाडून हल्ला चढवत, “शिवसेना कोणाची याचा निकाल महाराष्ट्राच्या जनतेने आधीच दिला आहे. आम्ही 40 आमदारांसह बाहेर पडलो आणि जनतेने आम्हाला 60 आमदारांपर्यंत पोहोचवून आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले,” असे ठाम शब्दांत सांगितले. एकनाथ शिंदे म्हणाले, “जनतेच्या न्यायालयात आमचा विजय आधीच झाला आहे. त्यामुळे शिवसेना कोणाची, याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेने लोकशाहीच्या माध्यमातून स्पष्टपणे दिले आहे. आता न्यायालयीन प्रक्रियेवरही आमचा पूर्ण विश्वास आहे.” विरोधकांच्या सातत्याने करण्यात आलेल्या ‘घटनाबाह्य सरकार’च्या आरोपांचा समाचार घेताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या निकालाचा उल्लेख केला. “सरकार संविधानाने आणि कायद्याने घालून दिलेल्या प्रक्रियेनुसार स्थापन झाले असून ते घटनाबाह्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तरीही विरोधक तीच जुनी आणि फाटलेली कॅसेट पुन्हा पुन्हा वाजवत आहेत,” असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. विरोधकांची भूमिका दुटप्पी पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, “विरोधकांची भूमिका दुटप्पी आहे. निकाल त्यांच्या बाजूने लागला तर न्यायालयाचा गौरव करायचा आणि निकाल विरोधात गेला की न्यायालयालाच शिकवण्याचा प्रयत्न करायचा. न्यायव्यवस्थेवर आरोप, निवडणूक आयोगावर टीका आणि घटनात्मक संस्थांवर अविश्वास दाखवणे, ही त्यांची कायमची राजकीय संस्कृती आहे.” आम्ही कोणावरही वैयक्तिक टीका करत नाही “आम्ही कोणावरही वैयक्तिक टीका करत नाही. आम्ही जनतेच्या विश्वासावर आणि न्यायदेवतेवर श्रद्धा ठेवतो. सत्य, संविधान आणि जनमत या तिन्ही गोष्टी आमच्या बाजूने असल्याने आम्ही निर्धास्त आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना कोणाची, या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू असली तरी राजकीय आणि जनाधाराच्या कसोटीवर शिवसेनेवर जनतेनेच शिक्कामोर्तब केले आहे, असा ठाम दावा करत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या भूमिकेवर जोरदार प्रहार केला. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा पक्षांतर पूर्वी घटनात्मक गुन्हा, आज सन्मानाचा बिल्ला!:सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, ठाकरे गटाचा निवडणूक आयोगावर घणाघात; आता पुढील आठवड्यात सुनावणी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सलग दुसऱ्या दिवशी अत्यंत महत्त्वाची आणि वादळी सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर उद्धव ठाकरे गटाचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोग (ECI) आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. आजच्या सुनावणीदरम्यान पक्षांतरबंदी कायदा, पक्षाची अंतर्गत लोकशाही, निवडणूक आयोगाचे अधिकार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा दाखला देत कोर्टात जोरदार युक्तिवाद झाला. आता याप्रकरणी पुढच्या आठवड्यात पुढील सुनावणी होणार आहे. येथे संपूर्ण बातमी वाचा
Source link
'शिवसेना कोणाची? जनतेनेच निकाल दिला':विरोधकांवर एकनाथ शिंदे यांचा घणाघात, विरोधकांची 'जुनी कॅसेट' सुरू असल्याचा टोला
