दुलीप ट्रॉफीच्या पदार्पणात वैभव सूर्यवंशीला बाद करणारा बिश्वोरजीत कोंथौजम चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी त्याने बॉक्सिंगमध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं.

वैभवचा आक्रमक अवतार अन् बिश्वोरजीतचा ‘पलटवार’
ईस्ट झोनकडून डावाची सुरुवात करण्यासाठी अनुभवी अभिमन्यू ईश्वरनसोबत १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरला होता. वैभवने आपल्या डावाची सुरुवात अत्यंत आक्रमक अंदाजात केली. त्याने क्रीजवर येताच बिश्वोरजीतच्या गोलंदाजीवर दोन खणखणीत चौकार वसूल केले. पहिला चौकार आत येणाऱ्या चेंडूवर मिड-विकेटच्या दिशेने, तर दुसरा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह लगावत मिळवला. मात्र, बिश्वोरजीतने या मारहाणीनंतर खचून न जाता लगेचच जोरदार पलटवार केला. त्याने पॉइंटच्या वरून कट शॉट खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या वैभवला थेट गलीमध्ये उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. वैभव आपल्या पहिल्या डावात अवघ्या ६ चेंडूंत २ चौकारांच्या मदतीने केवळ ८ धावा करून तंबूत परतला.
बॉक्सिंग रिंग ते क्रिकेटची खेळपट्टी…
बिश्वोरजीत कोंथौजमसाठी क्रिकेटपर्यंतचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, क्रिकेट हे त्याचे पहिले प्रेम नव्हतेच. २०२५ मध्ये ‘इम्फाळ रिव्ह्यू ऑफ आर्ट्स अँड पॉलिटिक्स’ला (IRAP) दिलेल्या एका मुलाखतीत या ३० वर्षीय गोलंदाजाने खुलासा केला होता की, त्याने आपल्या करिअरची सुरुवात एक ‘बॉक्सर’ म्हणून केली होती. २०१४-१५ च्या हंगामात त्याने अरुणाचल प्रदेशमध्ये आयोजित एका बॉक्सिंग स्पर्धेत सहभाग घेत ‘सुवर्णपदक’ जिंकले होते.
पण नशिबात काहीतरी वेगळेच लिहिले होते. त्या स्पर्धेतून परतल्यानंतर बिश्वोरजीतच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याला बॉक्सिंगपासून लांब राहावे लागले. त्याच काळात त्याच्या परिसरात एक स्थानिक क्रिकेट स्पर्धा सुरू होती. मणिपूर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव लैशराम रोरेन यांची नजर त्याच्यावर पडली आणि त्यांनीच बिश्वोरजीतला वेगवान गोलंदाज म्हणून करिअर करण्याचा मोलाचा सल्ला दिला. तिथूनच त्याच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी मिळाली आणि त्याने बॉक्सिंगची रिंग सोडून क्रिकेटच्या खेळपट्टीवर आपले वर्चस्व गाजवायला सुरुवात केली.
देशांतर्गत क्रिकेटमधील रेकॉर्डब्रेक कामगिरी
२०१८-१९ चा देशांतर्गत हंगाम बिश्वोरजीतच्या करिअरचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. याच वर्षी बीसीसीआयने मणिपूर क्रिकेट असोसिएशनला पूर्ण मान्यता दिली. बिश्वोरजीतने या संधीचे सोने करत २०१८-१९ च्या रणजी ट्रॉफी हंगामात अवघ्या ८ सामन्यांत तब्बल ३० विकेट्स घेत मणिपूरसाठी सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम रचला. यानंतर २०२५ मध्ये त्याने आणखी एक इतिहास रचला. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये ५० विकेट्स पूर्ण करणारा तो नॉर्थ ईस्ट झोनचा पहिलाच क्रिकेटपटू ठरला.
इंग्लंडमध्ये इतिहास रचणारा मणिपूरचा पहिला खेळाडू
२०२५ मध्ये या उजव्या हाताच्या मध्यमगती गोलंदाजाने आणखी एक मोठी झेप घेतली. त्याने इंग्लंडमधील प्रतिष्ठित ‘टायनेमाऊथ क्रिकेट क्लब’सोबत (Tynemouth Cricket Club) करार केला आणि इंग्लंडच्या क्लबकडून खेळणारा तो मणिपूरचा पहिला क्रिकेटपटू बनला. या आंतरराष्ट्रीय अनुभवाचा फायदा आपल्या गोलंदाजीत सुधारणा करण्यासाठी आणि मणिपूरच्या युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी करणार असल्याचे त्याने तेव्हा स्पष्ट केले होते.
Yashaswi Jaiswal : 3 चौकार खाल्ले, विकेट घेताच श्रीलंकन गोलंदाज डिवचू लागला; यशस्वी थेट अंगावर धावला, कोलंबोत काय घडलं?
कधीकाळी बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तरुण आज क्रिकेटच्या मैदानावर भल्याभल्या फलंदाजांना घाम फोडत आहे. दुलीप ट्रॉफीच्या या मोठ्या मंचावर वैभव सूर्यवंशीसारख्या अत्यंत प्रतिभावान फलंदाजाची विकेट घेणे, हा बिश्वोरजीतच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासातील आणखी एक सुवर्ण अध्याय बनला आहे.

