सावंतवाडी प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला असून सर्वत्र विठ्ठलनामाचा गजर आणि भक्तीचा उत्साह अनुभवायला मिळत आहे. या पावन पर्वाचे औचित्य साधून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी, बांदा शाखेतर्फे सुप्रसिद्ध गायक श्री. गणेश मेस्त्री (Z मराठी ‘सा रे ग म प’ फेम तसेच Sony TV ‘Indian Idol’ फेम) यांच्या “अभंगवाणी” या बहारदार भक्तिमय संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.अभंग, भारूड आणि विठ्ठलभक्तीने भरलेल्या या कार्यक्रमातून उपस्थित रसिकांना भक्तिरसाचा अविस्मरणीय अनुभव घेता येणार आहे. श्री. गणेश मेस्त्री यांनी आपल्या सुमधुर गायकीने महाराष्ट्रातील संगीतप्रेमींच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले असून त्यांच्या स्वरांतून सादर होणारे विठ्ठलभक्तीपर अभंग हा या कार्यक्रमाचा प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
या भक्तिमय कार्यक्रमात श्री. गणेश मेस्त्री यांना अनुभवी साथी कलाकारांची साथ लाभणार आहे. हार्मोनियमवर मयूर पिंगुळकर, कीबोर्डवर बाळकृष्ण (पपू) नाईक, तबल्यावर सिद्धेश कुंटे, पखवाजवर गौरव पिंगुळकर तसेच तालरक्षक म्हणून अमेय परब हे कलाकार आपल्या सुरेल आणि दमदार वादनाने कार्यक्रमाची रंगत अधिक खुलविणार आहेत. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व निवेदन ॲड. सिद्धी परब करणार आहेत.
हा कार्यक्रम शनिवार, दिनांक १८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता आनंदी मंगल कार्यालय, कट्टा कॉर्नर, बांदा येथे संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाला सार्वजनिक नवरात्र उत्सव सांस्कृतिक कला, क्रीडा व समाज विकास मंडळ, कट्टा कॉर्नर, बांदा यांचे सहप्रायोजक म्हणून सहकार्य लाभले आहे.या भक्तिमय सांगीतिक सोहळ्यास बांदा व परिसरातील नागरिक, वारकरी, संगीतप्रेमी तसेच सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
