Glenn Maxwell Vini Raman Baby Girl News : ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि त्याची पत्नी विनी रमन पुन्हा आई-बाबा झाले आहेत. विनीने मुलीला जन्म दिला असून, या जोडप्याने आपल्या लेकीचे नाव माइया मॅक्सवेल ठेवले आहे.

मॅक्सवेलला कन्यारत्न
ऑस्ट्रेलियाचा स्टार आणि अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि त्याची भारतीय वंशाची पत्नी विनी रमन (Vini Raman) यांच्या घरी एका चिमुकल्या परीचे आगमन झाले आहे. विनीने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून, या जोडप्याने आपल्या दुसऱ्या अपत्याचे आनंदाने स्वागत केले आहे. त्यांनी आपल्या या गोड मुलीचे नाव ‘माइया मॅक्सवेल’ (Maia Maxwell) असे ठेवले आहे.
“आमच्या स्वप्नातील मुलीचे आगमन झाले आहे, माइया मॅक्सवेल.”
मंगळवारी या जोडप्याने इन्स्टाग्रामवर एका खास पोस्टद्वारे आपल्या कुटुंबात या चिमुकल्या परीच्या आगमनाची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. मुलीचा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “आमच्या स्वप्नातील मुलीचे आगमन झाले आहे, माइया मॅक्सवेल.”
दिग्गजांकडून अभिनंदनाचा वर्षाव
मॅक्सवेल दांपत्याने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच जगभरातील त्यांचे सहकारी क्रिकेटपटू, फ्रँचायझी आणि असंख्य चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. माइयाच्या जन्मापूर्वी, ११ सप्टेंबर २०२३ रोजी विनीने एका मुलाला जन्म दिला होता, ज्याचे नाव ‘लोगन मॅव्हरिक मॅक्सवेल’ असे आहे. आता या कुटुंबात एका नव्या सदस्याची भर पडल्याने मॅक्सवेल कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला आहे.
मैत्री, प्रेम अन् लग्नाची स्टोरी
ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमन यांची पहिली भेट डिसेंबर २०१३ मध्ये झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या नात्याचे रूपांतर प्रेमात झाले. २०१७ मध्ये त्यांनी आपले नाते अधिकृतपणे जगासमोर आणले. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये या जोडप्याने साखरपुडा केल्याची घोषणा केली आणि अखेर २७ मार्च २०२२ रोजी मेलबर्नमध्ये ते विवाहबंधनात अडकले.
दोन वेगवेगळ्या रितीरिवाजांनी केले होते लग्न
मेलबर्नमध्ये त्यांनी दोन वेगवेगळ्या रितीरिवाजांनुसार आपला विवाहसोहळा पार पाडला होता. यात एक पारंपारिक ख्रिश्चन विवाह आणि दुसरा भारतीय तमिळ ब्राह्मण पद्धतीचा विवाहसोहळा पार पडला. या तमिळ ब्राह्मण सोहळ्यादरम्यान मॅक्सवेलने पारंपारिक सोनेरी रंगाची शेरवानी परिधान केली होती, ज्याची भारतात आणि सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली होती.

