Headlines

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला एनसीडीसीकडून ५ हजार कोटींचे कर्ज मंजूर:सहकारी संस्था व शेतकऱ्यांसाठी खेळते भांडवल उपलब्ध होणार




महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) कडून ५ हजार कोटी रुपयांचे खेळते भांडवली कर्ज मंजूर झाले आहे. केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या अखत्यारितील एनसीडीसीने हे कर्ज ‘डायरेक्ट फंडिंग स्कीम’ अंतर्गत दिले आहे. एवढ्या मोठ्या रकमेचे कर्ज मिळवणारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही देशातील पहिली सहकारी बँक ठरली आहे. एनसीडीसीने १० ऑगस्ट २०२६ रोजी या कर्जाचे मंजुरीपत्र जारी केले. या कर्जाचा कालावधी ५ वर्षांचा असून, त्याची परतफेड १० सहामाही हप्त्यांमध्ये केली जाईल. बँकेला गरजेनुसार कर्जाची उचल एक किंवा अधिक हप्त्यांमध्ये करता येईल. परतफेड केलेल्या मुद्दलाच्या ठरावीक मर्यादेपर्यंत ‘रिफंड अँड विथड्रॉवल’ सुविधाही उपलब्ध असेल, ज्यामुळे बँकेच्या खेळत्या भांडवलाच्या व्यवस्थापनात लवचिकता येईल. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी या निर्णयाला सहकार क्षेत्रासाठी ऐतिहासिक पाऊल म्हटले आहे. त्यांच्या मते, केंद्र आणि राज्यातील सहकारी वित्तसंस्थांमधील हा मोठा सहभाग सहकार क्षेत्रावरील विश्वास दर्शवतो. हा निर्णय केंद्र सरकारच्या ‘सहकारातून समृद्धी’ या संकल्पनेला आर्थिक बळ देणारा असून, राज्यातील सहकारी वित्तव्यवस्थेला बळकटी देईल. या निधीचा वापर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक तिच्या सभासद संस्था आणि राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना पुढील कर्जपुरवठ्यासाठी करेल. यामुळे साखर कारखाने, सूत गिरण्या आणि इतर सहकारी संस्थांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण होतील. त्यांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांना यामुळे गती मिळेल. जिल्हा मध्यवर्ती बँका आणि प्राथमिक सहकारी पतसंस्थांना भक्कम वित्तपुरवठा मिळाल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल. त्यांना पीककर्ज आणि इतर शेतीकामांसाठी वेळेवर व पुरेसा कर्जपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होईल.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत