Headlines

बांगलादेशच्या खेळाडूचा रडीचा डाव, कॅच पकडतानाच मध्येच आला, पण कांगारूंनी पुढच्या ओव्हरमध्ये जिरवली


Australia Vs Bangladesh : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यामध्ये बांग्लादेशचा संघ ६४ धावांवर ऑलआऊट झाला. मिचेल स्टार्क याने जबरदस्त गोलंदाजी करत ६ विकेट काढल्या. या सामन्यामध्ये हेजलवुड आणि तस्कीन अहमद यांच्यामध्ये झालेला एक प्रकार सध्या चर्चेत आला आहे.

AUS vs BAN
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर सामना सुरू असताना अनेकदा अशा काही नाट्यमय घडामोडी घडतात, ज्यांची चर्चा संपूर्ण जगभर होते. असाच काहीसा प्रकार आता ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश ( Australia vs Bangladesh ) यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहायला मिळाला आहे. डार्विनमधील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला धूळ चारून इतिहास रचणाऱ्या बांगलादेशला दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी कांगारूंनी आस्मान दाखवले. मात्र, या सामन्यात खेळापेक्षा जास्त चर्चा रंगली ती जोश हेझलवूड आणि तस्किन अहमद यांच्यात भर मैदानात झालेल्या जोरदार धडकेची.

काय घडलं नेमकं?

मॅके येथे सुरू असलेल्या या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. अवघ्या ३८ धावांत त्यांचे ८ गडी तंबूत परतले होते. त्यावेळी तस्किन अहमद मैदानात होता. डावाच्या २८ व्या षटकात तस्किनने हवेत एक उंच फटका मारला. चेंडू खेळपट्टीच्या जवळच हवेत होता आणि गोलंदाज जोश हेझलवूड ( Josh Hazlewood ) हा सोपा झेल घेण्यासाठी चेंडूच्या दिशेने धावला. मात्र, त्याच वेळी धाव घेण्यासाठी धावणारा तस्किन अहमद थेट हेझलवूडला येऊन धडकला. या जोरदार धडकेमुळे हेझलवूडच्या हातातून झेल निसटला. या प्रकारानंतर हेझलवूड चांगलाच संतापलेला पाहायला मिळाला.

Maharashtra TimesGautam Gambhir : पत्रकाराच्या त्या प्रश्नावर गौतम गंभीरने झटकले हात, कॅप्टन गिलकडे दाखवलं बोटं; नेमका कोणता?

पंचांनी काय निर्णय दिला?

या प्रकारानंतर ऑस्ट्रेलियन छावणीत संतापाची लाट उसळली. हेझलवूड आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी तस्किनने ही धडक जाणूनबुजून दिल्याचे म्हणत पंचांकडे ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड ( Obstructing the field ) अंतर्गत बाद देण्याची जोरदार मागणी केली. मात्र, पंचांनी हे अपील फेटाळून लावले. पंचांच्या मते, धाव घेताना तस्किन खाली पाहत होता आणि त्याचे चेंडूकडे लक्ष नव्हते, त्यामुळे त्याने जाणीवपूर्वक हा अडथळा आणलेला नाही.

पंचांनी तस्किनला जीवदान दिले तरी, त्याला या संधीचे सोने करता आले नाही. पुढच्याच षटकात पॅट कमिन्सने त्याला अवघ्या एका धावेवर माघारी धाडले.

‘ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड’चा नियम काय सांगतो?

मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या (MCC) नियम ३७ (Rule 37) अंतर्गत बाद होण्याचा हा एक दुर्मिळ प्रकार आहे. या नियमानुसार, जेव्हा एखादा फलंदाज आपल्या शब्दांनी, कृतींनी किंवा धावण्याच्या पद्धतीमुळे जाणूनबुजून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला किंवा खेळाडूला अडथळा आणतो किंवा त्यांचे लक्ष विचलित करतो, तेव्हा पंचांकडून त्याला बाद (Out) दिले जाते.

Maharashtra TimesWasim Jaffer : ‘वनडे आणि टी-20 टीममध्ये यायचं असेल तर एकच गोष्ट कर’; ऋषभ पंतला माजी खेळाडूने काय सल्ला दिला?

स्टार्कचा कहर अन् बांगलादेशची दाणादाण

पहिल्या कसोटीतील ऐतिहासिक विजयानंतर हवेत उडणाऱ्या बांगलादेशला ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत जमिनीवर आणले. बांगलादेशचा संपूर्ण डाव अवघ्या ३४ षटकांत ६४ धावांवर संपुष्टात आला. स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने पहिल्या २२ चेंडूंमध्येच ५ बळी घेत बांगलादेशची दाणादाण उडवली. त्याने एकूण ६ विकेट्स घेतल्या. तर, पॅट कमिन्सने ३ आणि हेझलवूडने १ विकेट घेत त्याला उत्तम साथ दिली. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियानेदिवसअखेर ८ बाद १६५ धावांपर्यंत मजल मारत पहिल्याच दिवशी १०१ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा