Headlines

पडेगाव कचरा प्रकल्प म्हणजे दुसरे डम्पिंग ग्राउंड:अंबादास दानवेंचा विधान परिषदेत हल्लाबोल, मंत्री पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश




छत्रपती संभाजीनगर येथील पडेगाव घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात क्षमतेपेक्षा अधिक कचरा टाकला जात असून, वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया न झाल्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात डम्पिंग ग्राउंड बनल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी विधान परिषद सभागृहात केला. या प्रकल्पाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच साठलेला कचरा कालबद्ध पद्धतीने हटविण्याची मागणी दानवे यांनी राज्य सरकारकडे केली. प्रकल्पाची क्षमता मर्यादित असतानाही मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. त्यामुळे कचऱ्याचे प्रचंड ढिगारे निर्माण झाले असून मिथेन वायू, विषारी वायूंचे उत्सर्जन आणि दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. वारंवार कचऱ्याला आग लागण्याच्या घटनांमुळे वायू प्रदूषणाची समस्याही अधिक गंभीर बनली असल्याचे अंबादास दानवे यांनी सभागृहात सांगितले. पडेगाव परिसरातील नागरिकांची विशेष आरोग्य तपासणी झाल्याचा दावा चुकीचा आहे. त्या भागासाठी स्वतंत्र आरोग्य सर्वेक्षण आणि वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशी मागणी दानवे यांनी केली. पडेगाव व चिकलठाणा येथील कचरा प्रकल्पांवर शासनाने सुमारे ६७ कोटी रुपये खर्च केले असूनही अपेक्षित परिणाम दिसत नाही. कचऱ्यापासून खतनिर्मिती, प्लास्टिक प्रक्रिया आणि इतर उपक्रमांचा कोणताही पारदर्शक हिशेब नसल्याचा आरोप दानवे यांनी केला. वायू व जलप्रदूषणाची नियमित तपासणी व्हावी, तसेच लिचेट (कचऱ्यातून तयार होणाऱ्या दूषित द्रव) प्रक्रिया यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत आहे की नाही, याचीही चौकशी करावी. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पडेगाव प्रकल्पातील प्रदूषणाचा मोठा परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त कचरा टाकणे तातडीने थांबवावे, साठलेला कचरा वैज्ञानिक पद्धतीने हटवावा आणि संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी दानवे यांनी सभागृहात केली. पंकजा मुंडे यांचे उत्तर अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, “अंबादास दानवे यांनी अत्यंत महत्त्वाचा विषय सभागृहात उपस्थित केला आहे. आपला पहिला मुद्दा असा होता की, पडेगाव येथे क्षमतेपेक्षा अधिक कचरा टाकला जात आहे का? जर क्षमतेपेक्षा अधिक कचरा तेथे टाकला जात असल्याचे आढळले, तर त्याची निश्चित चौकशी करण्यात येईल. याबाबत आजच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत तपासणी करण्याच्या सूचना देण्यात येतील. पंकजा मुंडे म्हणाल्या, ” दुसरा मुद्दा म्हणजे हा प्रश्न कधीपर्यंत मार्गी लागणार? याचे उत्तर थोडे व्यापक आहे. शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता कचरा व्यवस्थापनाचा ताण वाढला आहे. केवळ कचरा एका ठिकाणी नेऊन टाकणे म्हणजे कचरा व्यवस्थापन नव्हे, तर त्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया होणे आवश्यक आहे.” पंकजा मुंडे म्हणाल्या की, “सध्या पडेगाव, हर्सूल, चिखलठाणा आणि नारेगाव या चार ठिकाणी कचरा साठवला जातो. दररोज येणाऱ्या ताज्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र, 1984 पासून साचलेल्या जुन्या कचऱ्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. हर्सूल आणि चिखलठाणा येथील जुना कचरा पूर्णपणे हटविण्यात आला आहे. आता नारेगाव आणि पडेगाव येथील जुना कचरा शिल्लक आहे. या जुन्या कचऱ्यात रासायनिक प्रक्रिया होऊन मिथेन वायू तयार होतो. त्यामुळे काही वेळा आग लागते आणि ती जमिनीखाली धुमसत राहिल्याने पूर्णपणे विझविण्यास वेळ लागतो. अशा घटना दुर्दैवी आहेत.” पंकजा मुंडे म्हणाल्या की, “महानगरपालिकेने या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचे आम्हाला कळविले आहे. प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांना डोळ्यांची जळजळ, घशात खवखव आणि त्वचेचे त्रास होऊ शकतात. हवामानातील बदलासारखी इतर कारणे असली तरी प्रदूषण हे त्यामागील महत्त्वाचे कारण असल्याचे नाकारता येणार नाही.” पंकजा मुंडे म्हणाल्या की, “कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी ओला आणि सुका कचरा वेगळा केला जातो. सुक्या कचऱ्यातील पुनर्वापरयोग्य वस्तू वेगळ्या करून उर्वरित रिफ्यूज सिमेंट उद्योगांना दिला जातो. ओल्या कचऱ्यावर विंड्रो (Windrow) कंपोस्टिंग प्रक्रियेद्वारे कंपोस्ट तयार केले जाते. त्यानंतर विविध आकारांच्या चाळण्यांमधून त्याची प्रक्रिया करून उर्वरित अवशेषांची शास्त्रोक्त पद्धतीने सॅनिटरी लँडफिलमध्ये विल्हेवाट लावली जाते.” पंकजा मुंडे म्हणाल्या की, “दररोज निर्माण होणाऱ्या ताज्या कचऱ्यावर तातडीने प्रक्रिया होणे आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात अशा समस्या निर्माण होणार नाहीत. सध्या दोन ठिकाणी काम व्यवस्थित सुरू आहे आणि 27 जूनपर्यंत ते पूर्ण होईल, असा विश्वास आहे. त्यानंतर या तक्रारी मोठ्या प्रमाणात कमी होतील. या संदर्भात मी स्वतः पुढील आठवड्यात महानगरपालिकेत विशेष बैठक घेणार आहे. ज्या ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक कचरा टाकला जात आहे का, प्रक्रिया योग्य पद्धतीने होत आहे का, याची मी स्वतः पाहणी करेन. आवश्यक वाटल्यास चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.”



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत