![]()
हिंगोली जिल्ह्यात निपुण भारत अभियानांतर्गत शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांसाठी गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना दर्जेदार मार्गदर्शन देण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे 60 हजार विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेण्यात येणार असून, त्यातून निवड करण्यात येणाऱ्या चार हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, नवोदय व एनएमएमएस परीक्षांची विशेष तयारी करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली निपुण भारत अभियानांतर्गत शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) विपूल भागवत, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आसावरी काळे, सर्व गट शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) येथील अधिव्याख्याते तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांमधील गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी गणित व इंग्रजी विषयांवर आधारित चाळणी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेतून चार हजार विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा आणि राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रभावी सरावासाठी पाच हजार प्रश्नांचा प्रश्नसंच तयार करण्यात आला असून, चालू शैक्षणिक वर्षात त्याचा नियमित सराव घेण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात निपुण 3.0 अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची सवय निर्माण करणे आणि त्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. या बैठकीत चाळणी परीक्षेच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होतील, यासाठी सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये स्वच्छतागृहांची उपलब्धता आणि प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. पूर्ण झालेल्या स्वच्छतागृहांची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करावा, अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत तसेच मुलींसाठी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक स्वच्छतागृहांचे प्रस्ताव तयार करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. ज्या ठिकाणी जागेची अडचण आहे, ती तात्काळ दूर करून आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
Source link
निपुण भारत अभियानांतर्गत 60 हजार विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा:चार हजार गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांचे विशेष मार्गदर्शन – जिल्हाधिकारी
