Headlines

दोन्ही शिवसेना अभिजीत दीपकेंच्या प्रेमात!:शिरसाट, बच्चू कडूंपाठोपाठ चंद्रकांत खैरेंचीही भेट; उद्धव ठाकरेंचा थेट फोन, 'मातोश्री'वर येण्याचं आमंत्रण




नीट पेपरफुटीप्रकरणी दिल्लीच्या जंतरमंतरवर सलग 36 दिवसांचे आक्रमक आंदोलन करून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडणारे कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत. दिल्लीतील ऐतिहासिक आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगरमधील आपल्या राहत्या घरी परतलेल्या अभिजीत दीपके यांची भेट घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची रीघ लागली आहे. विशेष म्हणजे, शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट हे दोन्ही पक्ष अभिजीत दीपके यांच्या प्रेमात पडल्याचे चित्र दिसत आहे. मंत्री संजय शिरसाट, आमदार बच्चू कडू यांच्यापाठोपाठ आता ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी दीपके यांची भेट घेतली. याच भेटीदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिजीत दीपके यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांना थेट ‘मातोश्री’वर येण्याचे आमंत्रण दिले आहे. ‘मातोश्री’वरून थेट फोन; उद्धव ठाकरेंकडून लग्नाचीही विचारपूस गुरुवारी (30 जुलै) माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी बजाजनगर येथील निवासस्थानी जाऊन अभिजीत दीपके आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. भेटीदरम्यान चंद्रकांत खैरे यांनी मोबाईलवरून उद्धव ठाकरे यांच्याशी अभिजीत दीपके यांचा संवाद घडवून आणला. उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या यशस्वी लढ्याबद्दल अभिजीत यांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच, त्यांच्या आई-वडिलांशीही आपुलकीने चर्चा केली. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरेंनी अभिजीत यांच्या कौटुंबिक बाबींसह लग्नाबाबतही विचारपूस केली. उद्धव ठाकरे यांनी अभिजीत यांना मुंबईत ‘मातोश्री’वर भेटीला येण्याचे आमंत्रण दिले. यावर, “मला सर्वांनाच भेटायला आवडेल, मी नक्कीच मातोश्रीवर येईन,” असा प्रतिसाद अभिजीत दीपके यांनी दिला. दीपके यांच्या घरी नेत्यांची मांदियाळी अभिजीत दीपके छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाल्यापासून त्यांच्या घरी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. संजय शिरसाट यांची पहिली भेट- दिल्लीतील आंदोलन यशस्वी होताच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दीपके यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई-वडिलांची भेट घेतली होती. बच्चू कडूंकडून पेढा भरवून अभिनंदन- शिवसेना आमदार बच्चू कडू यांनीही दीपके यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांना पेढा भरवून लढ्याच्या यशाबद्दल अभिनंदन केले. चंद्रकांत खैरेंकडून सत्कार- बच्चू कडूंपाठोपाठ चंद्रकांत खैरे यांनीही भेट घेत अभिजीत यांचा सत्कार केला. “दिल्लीत छत्रपती संभाजीनगरचे नाव गाजवत विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी दिलेला हा लढा शहराच्या इतिहासात अभिमानाने नोंदवला जाईल,” अशा शब्दांत खैरेंनी भावना व्यक्त केल्या. जुन्या आठवणींना उजाळा आणि राजकीय चर्चांना उधाण भेटीदरम्यान अभिजीत दीपके यांच्या आई-वडिलांनी चंद्रकांत खैरे यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या मदतीची आठवण सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. आंदोलनादरम्यान उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी जंतरमंतरवर जाऊन दीपके यांच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला होता. आता घरी परतल्यानंतर शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटांचे प्रमुख नेते एकामागून एक दीपके यांच्या भेटीला पोहोचत असल्याने, आगामी काळात अभिजीत दीपके नेमकी काय राजकीय भूमिका घेतात आणि ‘मातोश्री’वर कधी जातात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा… सहकार मंत्र्यांच्याच जिल्ह्यात सावकारांचा सुळसुळाट, पण खात्याला माहितीच नाही!:अवैध सावकारकीसह मायक्रो फायनान्सवरून बच्चू कडूंचा सरकारवर हल्लाबोल “अवैध सावकारकी आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांनी गोरगरीब व शेतकऱ्यांची अक्षरशः लूट चालवली आहे. अनेक जण जामीनदार झाले म्हणून कोट्यवधींच्या जमिनी सावकारांनी बळकावल्या आहेत. हा प्रकार एकाच जिल्ह्यात नव्हे, तर राज्याच्या सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर सुरू असूनही खात्याला किंवा मंत्र्यांना याची साधी माहितीच नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे,” असा जोरदार हल्लाबोल शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. खासगी सावकारी प्रकरणाची पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महसूल व पोलीस प्रशासनाला आणि सहकार मंत्र्यांना थेट इशारा दिला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत