दोडामार्ग : शहरातील सुरुचीवाडी येथे नगराध्यक्षांच्या भावासह दोघांना चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देऊन पसार झालेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गोव्यातून शिताफीने ताब्यात घेतले. चेतन दयानंद कोरगावकर (वय 36, रा. सांताक्रूझ, ओल्ड गोवा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
28 जून रोजी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांचे बंधू रोहन सुभाष चव्हाण हे त्यांच्या घरी असताना घरासमोरील कंपाऊंडमध्ये एक अनोळखी तरुण मद्यपान करत उभा होता. त्याच्यासोबत असलेली तरुणी तेथे लघुशंका करत असल्याचे रोहन चव्हाण यांच्या निदर्शनास आले. हा परिसर निवासी असल्याने त्यांनी त्या दोघांना अशाप्रकारचे गैरवर्तन करू नये, अशी समज दिली.याचा राग आल्याने संबंधित तरुणाने रोहन चव्हाण यांच्याशी वाद घालत आपल्या स्विफ्ट कारमधून (जीए-07/ई-6051) चाकू काढला. त्यानंतर रोहन चव्हाण व त्यांच्यासोबत असलेले शुभम मुळगावकर यांच्या दिशेने धाव घेत अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तो आपल्या मैत्रिणीसह घटनास्थळावरून पसार झाला.
